नववीतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न
शाळांकडून मागवली पटाची माहिती
मुंबई – शाळेचा दहावीचा निकाल 100 टक्के लागण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या शाळा “ढ‘ विद्यार्थ्यांना नववीतच अनुत्तीर्ण करतात. ही गळती रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शाळांकडून त्यांचा 2013-14 ते मार्च 2016 पर्यंतचा नववी आणि दहावीचा पट, तुकड्या, निकालाची टक्केवारी हा तपशील सरकारने मागविला आहे.
दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण आणि नववीच्या विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण यात मोठी तफावत असल्याचे लक्षात आल्यानंतर ही पावले उचलण्यात आली. नववीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना निकालानंतर 30 दिवसांत शिक्षकांनी नववीच्या किमान अध्ययन क्षमता प्राप्त करून घेण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. जुलैपर्यंत हे सर्व विद्यार्थी नववीतून दहावीत जातील. या पद्घतीने कार्यवाही करावी, अशा सरकारच्या सूचना आहेत. पण शाळा या सूचनांचे पालन करत नाहीत. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामुळे आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करता त्यांना किमान अध्ययन क्षमता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे शिक्षण हक्क कायद्यानुसार बंधनकारक आहे. तसे न केल्यानेच हे विद्यार्थी नववीत मागे राहतात.
गेल्या वर्षी मुंबईतील शाळांचा नववीचा निकाल 83.78 टक्के आणि दहावीचा निकाल 92.62 टक्के होता. ज्या शाळांत नववीत 50 हून अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते, त्या शाळांची बैठक घेऊन मी त्यांना नोटीस बजावली होती.
– बी. बी. चव्हाण, शिक्षण उपसंचालक, मुंबई