मागील भागाहून पुढे____
आलारकालाम, उद्दक रामपुत्त व योगी यांच्याकडून सांख्य तत्वज्ञान, ध्यान मार्ग, समाधी मार्ग याचे शिक्षण घेऊन त्या मार्गांना सिद्धार्थाने अजमावून पाहिले होते. परंतु वैराग्य मार्ग मात्र न आजमावता त्याने भृगु ऋषीचा आश्रम सोडला होता. त्याला असे वाटले की, हा देखील मार्ग आता आजमावून पाहिला पाहिजे आणि स्वतः अनुभव घेतला पाहिजे की जेणेकरून त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची ताकद या मार्गामध्ये आहे वा नाही यावर त्यास पुढे अधिकारवाणीने बोलता येईल. वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी गया नगरीतील उरुवेला येथे, गया नगरीचा राज-ऋषीच्या आश्रमात सिद्धार्थाने वास्तव्य केले व निरंजना नदीच्या काठी असलेले निर्जन व एकांतस्थळ निवडले. याच दरम्यान सिद्धार्थाची, शाक्य-कोलीय यांच्यात समेट घडून आल्याची सुवार्ता देणाऱ्या त्या पाच परिव्राजकांशी उरुवेला येथे भेट झाली असता वैराग्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनाही सोबत घेण्याची ते सिद्धार्थास विंनती करतात. त्यांची विनंती मान्य करून पुढे सिद्धार्थाचा वैराग्य मार्गाच्या अनुभवाचा प्रवास सुरु होतो. अधिकाधिक कठोर तपश्चर्या व आत्मक्लेशास तो आरंभ करतो. शरीराला अतोनात वेदना देणाऱ्या निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून, वैराग्याच्या अगदीच पराकोटीला जाऊन, शरीराला परकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागतो. त्याचे शरीर अतिशय कृश होईस्तोवर, शरीराचा सापळा होईस्तोवर तो तपश्चर्या करतो. अत्यंत टोकाची उग्र व भीषण स्वरूपाची तपश्चर्या व आत्मक्लेशाचा वैराग्य मार्ग सहा वर्षांपर्यंत अंगिकारूनही सिद्धार्थास त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तेव्हा तो स्वतःशीच विचार करू लागतो, “हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा परीपूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा अजिबात नाही.”
तेव्हा सिद्धार्थाच्या मनात विचारचक्र सुरू होते ज्याचे विवेचन करतांना बाबासाहेब लिहितात की, सिद्धार्थास असा प्रश्न पडतो की,
“शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय? ज्याअर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते, त्याअर्थी विचारांवर ताबा ठेवणे हेच योग्य होय. विचाराखेरीज शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे. जर केवळ शरीराचाच विचार करावयाचा असता तर अन्नशुद्धीने श्रेष्ठत्व लाभले असते, पण मग कर्त्यामध्ये श्रेष्ठत्व असते; पण त्याचा काय उपयोग? ज्यांची शक्ती नष्ट झाली आहे, भूक, तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे, थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही त्याला नवा ज्ञानप्रकाश प्राप्त होऊ शकत नाही. जे ध्येय मनाच्या साहाय्याने गाठावयाचे आहे ते, ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तो ते कसे गाठू शकेल? खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते.”
अशाप्रकारे वैराग्याची कसोटी ही त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास असमर्थ आहे याची सिद्धार्थास जाणीव होते. त्या वेळी उरूवेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहात होता. सुजाता नावाची त्याला मुलगी होती. सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता की, जर का तिला मुलगा झाला तर दरवर्षी ती त्या वृक्षास काही तरी देऊ (offerings) करून नवस फेडेल. पुत्रप्राप्तीची सुजाताची इच्छा पूर्ण होते तेव्हा त्या झाडाखाली नवस फेडण्यास स्वच्छ जागा तयार करण्यासाठी ती पन्ना नावाच्या आपल्या दासीस वटवृक्षाकडे पाठविते. त्या वटवृक्षाखाली सिद्धार्थ गौतम तपश्चर्या करतांना बसलेला पाहून पन्नाला वाटते की, येथे तर साक्षात वृक्षदेवच अवतरला आहे. ही बातमी सुजातास कळविल्यानंतर, सुजाता स्वत: शिजविलेले/तयार केलेले अन्न एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढते. ते अन्न वाढलेले पात्र घेऊन तो नदीकाठी जातो. सुप्पतिट्ठ नावाच्या घाटावर आंघोळ करून मग त्या अन्नाचे तो ग्रहण/भक्षण करतो. याप्रमाणे त्याची वैराग्यमार्गाची, आत्मक्लेशाची कसोटी संपते. तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा सिद्धार्थ गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले ते पाच तपस्वी परिव्राजक त्याच्यावर रागावतात आणि तिरस्काराने ते त्याला सोडून जातात.
सततचे प्रयत्न करूनही, कठीणातील कठीण मार्गाचा अवलंब करूनही सिद्धार्थाच्या प्रश्नाचे उत्तर मात्र त्याला अद्यापही गवसलेले नसते !
(५) क्रमशः
www.republicantimes.in या वेबसाईटवर सर्व भाग उपलब्ध आहेत.