मागील भागाहून पुढे____
आलारकालाम हा ध्यानमार्गा अंतर्गत येणाऱ्या तिन्ही प्रकारच्या पंथात/शिक्षण पद्धतीत प्रभुत्वसंपन्न (अधिकारिता संपन्न/master) होता. ध्यानमार्गाचे हे तिन्ही तंत्र (आनापानसती, प्राणायाम, समाधी) आलारकालाम याने सिद्धार्थ गौतमास शिकविले. या मार्गाचा अभ्यास करून त्याद्वारे मनाची एकाग्रता टप्याटप्याने साधून एकूण सात पायऱ्यापर्यंतची (सात सिद्धी) गहन एकाग्रता गाठता येत असे. सिद्धार्थ गौतमाने हे तंत्र आत्मसात करून त्यावर पूर्ण प्रभुत्व मिळविल्याविल्यावर “आणखी काही शिकण्यासारखे आहे काय?” असे आलारकालाम यांना विचारले असता त्यांनी “नाही. मित्रा, माझ्याजवळ शिकविण्यासारखे जे होते ते एवढेच.” असे उत्तर दिले. तेव्हा सिद्धार्थाने आलारकालामांचा निरोप घेतला.
पुढे उद्दक रामपुत्त नावाच्या योग्याविषयी सिद्धार्थ गौतमाने ऐकले होते. तेव्हा त्याजकडे त्याने प्रस्थान केले. ज्याची (उद्दक रामपुत्तची) अशी ख्याती होती की ध्यानविधीत आलारकालामांपेक्षा त्यांनी एक पायरी पुढची गाठली आहे. त्यामुळे त्या आठव्या पायरीचा ध्यानविधी शिकण्याचा आणि समाधीची सर्वोच्च आठवी पायरी अनुभवण्याचा सिद्धार्थाने विचार केला. उद्दक रामपुत्ताच्या आश्रमात जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊन सिद्धार्थाने ध्यानविधीची आठवी पायरीही आत्मसात केली व समाधीच्या सर्वोच्च पायरीचा पूर्णतः अनुभवही घेतला. तरीही सिद्धार्थास त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते. तेव्हा याव्यतिरिक्त, ध्यानमार्गाबाबत पुन्हा काही शिकण्यासारखे आहे काय असे उद्दक रामपुत्तास सिद्धार्थाने विचारले असता, “नाही. मित्रा, तुला शिकविता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही.” असे त्यास उत्तर मिळाले. मात्र सिद्धार्थास त्याच्या प्रश्नाचे उत्तर अद्यापही गवसले नव्हते त्यामुळे अधिकाधिक मार्गांना चाचपडून पाहिले पाहिजे, त्यांना अजमावून पाहिले पाहिजे, त्यांचा अनुभव घेतला पाहिजे असे सिद्धार्थास वाटत होते.
सिद्धार्थ गौतमाने जसे आलारकालाम व उद्दक रामपुत्त या कोशल देशातील प्रसिद्ध व्यक्तींविषयी ऐकलेले होते तसेच मगध देशातही एक ध्यानमार्ग संपन्न, निष्णात योगी आहे असे त्याने ऐकले होते. तेव्हा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण घेण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला. तेथे गेल्यावर त्याला असे आढळून आले की, त्या योग्याची ध्यान मार्गाची प्रक्रिया ही, पूर्वीच्या ध्यान मार्गातील आनापानसती, प्राणायाम व समाधी यात जसे श्वासोच्छ्वास-प्रक्रियेच्या नियंत्रणावर आधारलेली होती तशी ही श्वासोच्छ्वास (श्वास आत घेणे व बाहेर सोडणे) करण्याची नव्हती तर ‘श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया थांबवून मनाची एकाग्रता साधण्याची’ होती. ती अत्यंत दुःखदायक प्रक्रिया होती. तरीदेखील ती आत्मसात करण्यात सिद्धार्थ गौतम यशस्वी झाला. समाधी मार्गाद्वारे ‘मनाची एकाग्रता साधण्याचे गौतमाचे शिक्षण’ अशाप्रकारचे होते. मात्र त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर अद्यापही काही गवसले नव्हते.
(४) क्रमशः
www.republicantimes.in या वेबसाईटवर सर्व भाग उपलब्ध आहेत.
Beautiful Story… Keep it up…