🌺 राखीव जागेस नकार 🌺
संग्रहकर्ता: इंजि. सुरज तळवटकर.
१९५७ साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. संयुक्त महाराष्ट्रातर्फे निवडणूक लढण्याचे ठरले. त्यावेळी शे.का.फे. हा संयुक्त महाराष्ट्र समितीचा घटक पक्ष होता. रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेचे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड निवड समितीचे अध्यक्ष होते.
मध्य मुंबईची जागा लढवायला कुणी तयार नव्हते. १९५२ च्या निवडणुकीत ही राखीव जागा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी लढली होती. त्यात त्यांना अपयश आले होते. दादासाहेब गायकवाड यांनी जी.के.माने यांना विचारणा केली. यावेळी माने म्युनिसिपल काॅर्पोरेशनचे सभासद होते. त्यांनी जागा लढवायला नकार दिला. दादासाहेबांनी त्यांना पुन्हा पुन्हा विचारणा केली. तेव्हा त्यांनी या जागेसाठी भय्यासाहेब आंबेडकरांचे नाव सुचविले. भय्यासाहेबांची संमती प्राप्त करण्याची कामगिरी दादासाहेबांनी जी.के.माने यांच्यावरच सोपविली.
मानेंनी भय्यासाहेबांना भेटून दादासाहेबांचा संदेश त्यांना कळविला. ‘मध्य मुंबईची जागा आपणच लढवावी. अगदी योग्य वेळी निश्चितच यश मिळेल. आपण बाबासाहेबांचे सुपुत्र आहात. जनता वाटेल ते करून तुम्हांस निवडून आणेल.’ यावर भय्यासाहेब शांत राहिले. थोड्या वेळानंतर ते म्हणाले, “अरे, मी बाबासाहेबांचा मुलगा आहे. तात्पुरत्या फायद्यासाठी हे विसरू म्हणतोस? बाबासाहेबांनी हिंदू धर्माला सोडचिठ्ठी देऊन १४ आॅक्टोबर १९५६ ला बौध्द धर्म स्वीकारला. आता पुरते चार महिने झाले नाहीत आणि तू मला महार जातीचा उमेदवार म्हणून मिरवायला सांगतोस! आंबेडकरी जनतेच्या भावनेपुढे लोकसभेच्या जागेची काय किंमत आहे?”
हे उत्तर ऐकून माने साहेब अवाक् झाले. हे उदाहरण आजही दलित नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आहे. थोड्या स्वार्थासाठी नको त्या कारवाया करणाऱ्या पुढाऱ्यांनी थोडी जना-मनाची लाज बाळगली पाहिजे. भय्यासाहेबांनी आपण डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र आहोत हे आपल्या त्यागी वृत्तीने दाखवून दिले.
पुढे या जागेवर गोपाळराव माने उभे राहिले आणि ३,०३,८७५ मते मिळवून निवडून आले. या निवडणुकीत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनला भरघोस यश मिळाले. आठ खासदार व सतरा आमदार निवडून आले. स्वार्थापलीकडे बघू शकणारी दृष्टी भय्यासाहेबांकडे होती. तसेही राजकारणातील छक्के-पंजे सरळ मनाच्या भय्यासाहेबांना पचनी पडणारे नव्हते. म्हणूनच राखीव जागेवर निवडून येण्याची संधी त्यांनी स्वतःहून गमावली. भारतीय बौध्द महासभेचे कार्य करण्यात व सारा भारत बौध्दमय करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यात त्यांनी स्वतःला धन्य मानले.
सूर्यपुत्र यशवंतराव आंबेडकर या पुस्तकातून.
