Sunday , June 15 2025
Home / Engg. Suraj Talvatkar / …… आमचं कौटुंबिक जीवन

…… आमचं कौटुंबिक जीवन


संग्रहकर्ता: इंजि. सुरज तळवटकर.

…… आमचं कौटुंबिक जीवन खारट तुरट आणि गोड अनुभव घेत असताना मी बाळंत झाले. साहेबांना आणि सर्वांना साहजिकच आनंद झाला. साहेबांनी नव्या मुलाचे नाव ‘राजरत्न’ ठेवले. त्याचा चेहरा अगदी त्याच्या वडिलांसारखाच होता. हाताचे पंजे आणि पायाची बोटे पण त्यांच्यासारखीच दिसत होती.
आमची सांपत्तिक परिस्थिती आता थोडीफार सुधारली होती. त्यामुळे लहान बाळाची निगा राखावी म्हणून आम्ही घरात एक नर्स ठेवण्याचं ठरवलं. परंतु सिमेंटच्या चाळीत आणि मुख्य म्हणजे महाराच्या घरात काम करायला कोणी हिंदू नर्स तयार होईना. शेवटी एक ख्रिस्ती नर्स मिळाली. ती आठवड्यातून दोन वेळा मला आणि राजरत्नला पाहत असे आणि औषधपाणी देऊन जात असे.
साहेब घरी आले म्हणजे राजरत्नला खेळवीत बसत. त्याला अंगाखांद्यावर घेऊन चाळीतील लोकांबरोबर ते गप्पा मारीत. मुलाला खेळविण्याचे प्रकार तर मुलखावेगळेच होते. ते छोट्या राजरत्नला म्हणायचे, ‘तू सिंहाचा बच्चा आहेस, तू लढवय्या वंशज आहेस, तू सम्राटाचा राजरत्न आहेस, तू पराक्रम केला पाहिजे.’ वगैरे वगैरे.
परंतु मधून मधून यशवंत आणि राजरत्न आजारी पडत. अशावेळी साहेब स्वतःहून त्यांच्या औषधपाण्याची व्यवस्था करीत.
राजरत्न दीड वर्षाचा होईपर्यंत मी त्याच्या गळ्यात आणि दंडाला ताईत आणि दोरे बांधले होते. इतके करूनही त्याला एक दिवस फणफणून ताप आला. त्याला डबल न्यूमोनिया झाला होता. साहेब, मी लक्ष्मीबाई आणि शंकरदादा रात्रभर जागलो, पण त्याचा ताप काही केल्या उतरेना.
दुसऱ्या दिवशी ताप थोडा उतरलेला पाहून साहेब अकरा वाजता कोर्टात गेले. परंतु साहेब गेल्यावर राजरत्नला पुन्हा ताप चढला. मी घाबरले आणि लगेचच शंकरदादाला कोर्टात पाठवून दिले. साहेबांना बोलावणे पाठविले. पण साहेब येण्यापूर्वीच राजरत्न हे जग सोडून गेला.
साहेब घरी आले. घरातील वातावरण पाहताच त्यांनी हंबरडा फोडला आणि भिंतीवर डोके आपटून ते मोठमोठ्याने रडू लागले. त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून इतर चाळीतील मंडळी आमच्या घरी जमा झाली. झाला प्रकार त्यांना कळताच ती मंडळी साहेबांचे सांत्वन करू लागली.
सारं काही आटोपून मंडळी स्मशानातून परत आली. साहेबांचा चेहरा रडून लाल झाला होता. त्यांचा बालमित्र मालू त्यांना म्हणाला, ‘अरे, आम्ही तुला उपदेश करावा का, तू आम्हाला करावा? आमच्या डोईवर जेवढे केस आहेत त्याच्या लाखोपट तुझ्या मनात विचार आहेत. आम्ही तुला काय सांगायचं, गप्प रहा आता.’
माझी तीन मुलं आणि एक मुलगी अशी एकूण चार गोजीरवाणी, सुंदर, भाग्याची, आणि वंशाला भूषणभूत होतील अशी मुलं जमिनीत गाडून आम्ही नवरा बायकोने आतापर्यंत संसार केला. राजरत्नच्या मृत्यूने नियतीने आमच्यावर वज्राघात केला आहे. राजरत्न गेला आणि आमच्या आयुष्याचे जीवनाचे सहारा वाळवटं झाले. आमची मुलं परमेश्वराच्या दरबारात गेली, पण आमची जीवनज्योत मालवली गेली. आता सर्वत्र अंधार आहे. आमचं दुःख आम्ही विसरू शकत नाही. आकाशात एकापाठोपाठ ढग येतात, तसे दिवस येत असतात. हेच दिवस आता कसे तरी ढकलायचे आहेत.
अशा अर्थाचे पत्र साहेबांनी त्यांच्या दत्तोबा पवार नावाच्या मित्राला लिहिले होते.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर कौटुंबिक जीवन: आठवणी
अॅड.हरिभाऊ पगारे

About republicantimes.in

Check Also

धम्मावरती बोलू काही (४)

मागील भागाहून पुढे____ आलारकालाम हा ध्यानमार्गा अंतर्गत येणाऱ्या तिन्ही प्रकारच्या पंथात/शिक्षण पद्धतीत प्रभुत्वसंपन्न (अधिकारिता संपन्न/master) ...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: