💥 #हे_कठीण_असले_तरी_अशक्य_मात्र_नाही 💥
प्रशिक आनंद, नागपूर.
संविधाननिष्ठ मित्रांनो,
स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या मानवी मूल्यांच्या आधारावर आपणांस आपले जीवन सदैव व्यतीत करावेसे वाटत असेल, हुकूमशाहीच्या विळख्यातून आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावेसे वाटत असेल, मुलाबाळांचे आयुष्य धोक्यात असता कामा नये अशी मनोमन तळमळ असेल तर संसदीय लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी आजच धडपड करायला आपण सुरुवात केली पाहिजे. होय उद्याही नव्हे, परवाही नही, तर आजच ! प्रत्येक मायबापांनी त्यांच्या अपत्यांच्या सर्वांगीण विकासासाठी देशात सदैव पोषक वातावरण राहावे म्हणून आपले कर्तव्य न विसरता परिश्रम करणे, चळवळीत शक्य त्या मार्गाने, शक्य त्या परीने सक्रिय असणे क्रमप्राप्त ठरते. काळ वेगाने पुढे सरकतो आहे. आपले हितशत्रू संसदीय लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी कधीचेच कार्यान्वित झालेले आहेत. संसदीय लोकशाहीचा जीव आपल्याला गुदमरतांना पावलोपावली दिसतो आहे. हितशत्रू अगदीच सज्ज आहेत. तेव्हा दिवसागणिक मृतप्राय होत जाणाऱ्या संसदीय लोकशाहीस वाचविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संघटनेच्या शिरावर ही जबाबदारी दिली आहे ती ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ ही संघटना तिच्या संविधानाची काटेकोर अंमलबजावणी करून तिची पुनर्बांधणी करणे ही काळाची गरज आहे.
ही संघटना बाबासाहेबांनी तमाम भारतीयांसाठी दिलेली आहे. ती काही कुण्या एकाच्या बापाची खाजगी मालमत्ता नव्हे. जे कोणी आपल्याला घटनेच्या अंमलबजावणीसाठी अडवणूक करतील, आडकाठी आणतील त्यांचा खरपूस समाचार घेतलाच पाहिजे. बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे, मरणाच्या तयारीनेच आता समरांगणात उतरण्याची ही समाजावर ओढवलेली आणीबाणीची वेळ आहे. मेंढरांसारखे मागे पळू नका. बाबासाहेबांच्या प्रत्येक शब्दाला जागून शंभर वर्षे शेळी बनून जगण्यापेक्षा एकच दिवस जगा, पण वाघासारखे जगा. लक्षात असू द्या, “अन्यायाचा प्रतिकार करताना प्रसंगी तुम्हाला मरण आले तरी चालेल. कारण तुमची भावी पिढी तुमच्या मृत्यूचा बदला घेईल परंतु अन्याय सहन करून मराल तर तुमची भावी पिढी तुमच्या प्रमाणेच गुलाम होईल.” तेव्हा आपण शूरवीरांचे वारसदार आहोत हे आपण विसरता कामा नये. बाबासाहेबांनी आपल्याला अगदीच स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “आपला उद्धार करायला आपणच कंबर कसली पाहिजे. हे काम एका-दोघांचे नाही. यात अनेक लोकांनी आपल्या छातीचा कोट करून आपली माणुसकी स्पृश्य लोकांपुढे सिद्ध करून घेतली पाहिजे. या कामात अनेकांचे बळी पडतील आपल्या पूर्वजांनी रणांगणात आपल्या मनगटातील जोर समशेरीच्या तडाख्यांनी सिद्ध केलेला आहे, आता आपण आपल्या बुद्धिवैभवाने आजच्या सामाजिक दंगलीत आपली श्रेष्ठ जागा पटकावली पाहिजे.” तेव्हापासून उत्तरोत्तर आजची सद्यपरिस्थिती पाहता, ही सामाजिक दंगल आता संपुष्टात आली असून सगळे आलबेल वातावरण आहे असे कोणी म्हणू शकेल काय? दिवसेंदिवस या देशातील वातावरण अधिकाधिक अराजकतेकडे वाटचाल करणारे आपणांस वाटत नाही काय? या दूषित सामाजिक वातावरणात ही पिढी जगणार तरी कशी?
तेव्हा यांवर उपाययोजना करावयाची असेल तर मित्रांनो, आपण संघटित झालोच पाहिजे, आपण कळपाने राहिलो पाहिजे, आपली संघटना सशक्तपणे उभारली पाहिजे आणि आपली लढाई रक्ताचा एक थेंबही न सांडवता, बुद्धास अभिप्रेत असलेल्या मानसिक क्रांतीची आहे, बुद्धिवैभवाने ती सिद्ध करण्याची आहे हे सदोदित लक्षात ठेवून विचारांची लढाई विचारांनीच करावयाची आहे. विषमतावादी विचारधारेला समतावादी विचारधारेनी सुरुंग लावण्याची आहे. तेव्हा आपल्या समाजातील सुशिक्षितांचे, बुद्धिजीवी वर्गाचे कर्तव्य कोणते आहे हे आपण ओळखले पाहिजे. सुशिक्षितांच्या कर्तव्याची त्यांना जाणीव करून देतांना बाबासाहेब म्हणतात, “ज्यांच्या मनात कर्तव्यबुध्दी व परोपकारबुध्दी पूर्णपणे जागृत झाली असेल, त्यांनी आपल्या समाजाचा, जीवनकलहात टिकाव लागण्यासाठी रात्रंदिवस निरपेक्ष बुध्दीने झटले पाहिजे. अशा प्रकारचे विचार समजले असून ते जर स्वस्थ राहतील, तर त्यांच्या माथ्यावर आपल्या दडपून गेलेल्या बांधवास विपन्नावस्था आणिल्याची आणि त्यांचा नाश केल्याची भयंकर जबाबदारी येणार आहे. म्हणून सुशिक्षित बांधव हो ! तर तुम्हास इतरांकडून व पुढील संततीकडून बरे म्हणवून घ्यावयाचे असेल व आज तुमची जी स्थिती आहे ती दूर करुन तुमच्या मुलांची व नातवडांची स्थिती अधिक वाईट होवू नहे अशी तुम्हास वास्तविक इच्छा असेल तर ज्या दुर्गतांनी व दुराचारांनी आपल्या लोकांच्या बुध्दिचा, कीर्तीचा व परिस्थितीचा घात चालविला आहे, त्यांचे यथाशक्ती निर्मूलन करणे हे आपले कर्तव्य आहे व ते आपण केले पाहिजे.” बाबासाहेबांचे हे विचार आपल्या मनस्तिष्कावर कोरून ठेवण्याइतके आजही किती प्रासंगिक आहेत मित्रांनो ! या देशातील आपल्या पूर्वजांनी, खासकरून पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य बांधवांनी (महाराष्ट्राच्या बाबतीत विशेषतः पूर्वाश्रमीचे महार- आजचे धर्मांतरित बौद्ध) बाबासाहेबांनी दिलेला आदेश जसा इमाने इतबारे पाळला की जेणेकरून पुढच्या पिढीचा उद्धार होऊ शकला, स्वाभिमानाचे आयुष्य आपल्याला जगता येणे शक्य झाले, आजही तो आदेश आपण जसाच्या तसाच पाळण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे व संघटनशक्ती निर्माण केली पाहिजे. मात्र कोणत्याही परिवर्तनवादी संघटनेस गरज असते ती तत्वांची !
बाबासाहेबांनी आपल्या संघटनेची उभारणी आधीच भक्कम अशा वैश्विक मानव कल्याणाच्या सप्त-तत्वज्ञानावर करून ठेवली आहे. रिपब्लिकन पार्टीसाठी लिहिलेली तत्वे, धोरण व कार्यक्रम आपल्यापुढे दिशादर्शक म्हणून बाबासाहेबांनी आखून दिले आहेत. परंतु अडचण अशी आहे की नुसत्या तत्वज्ञानास काय अर्थ राहणार जर का ते व्यवहारात त्यांच्या अनुयायांना उतरविता येत नसतील तर? नुसते तत्वज्ञानात गुरफटून राहण्यात काय हशील? विचारांना कृतीची जोड नसेल तर विचार वांझ ठरतात ते उगाच उपदेशलेले विधान नव्हे. तेव्हा सकस विचारांना, मानव मुक्तीच्या तत्वज्ञानास अंमलात आणण्यासाठी ताकदीची संघटना निर्माण करणे गरजेचे असते. याबाबत विवेचन करतांना बाबासाहेब म्हणतात, “कित्येक लोकांना असे वाटते की तत्वांची माळ गोविली की, आपला कार्यभाग झाला व आपण जिंकलो. पण हा भ्रम आहे. निव्वळ तत्वांची उभारणी करुन चालत नाही. कारण तत्वांची उभारणी झाल्याबरोबर त्यांचा परिणाम जगाच्या राहाटीवर आपोआप होत नाही. तो परिणाम घडवून आणावा लागतो. म्हणून परिणामाच्या दृष्टीने तत्वे मांडण्यापेक्षा ती अंमलात आणण्यास योग्य अशी संघटना तयार करणे आवश्यक, त्याहीपेक्षा अगत्याचे आहे. जोपर्यंत संघटना तयार झाली नाही तोपर्यंत ज्या तत्वांसाठी आपण झगडत आहोत ती तत्वे आपल्या प्रतिपक्षाला कबूल जरी असली तरी ती पुराणातली वांगी पुराणातच ठेवण्यात येतील व आपले म्हणणे अरण्यरुदनाप्रमाणे शुष्क ठरेल. ज्याप्रमाणे नशीबाचा गाडा हाकण्यास यत्न-सारथी असावा त्याप्रमाणे तत्वांचा इष्ट परिणाम घडवून आणण्यास संघटनाही असावी लागते.”
तेव्हा सुशिक्षित, बुद्धिजीवी बांधवांनो ह्याकडे लक्ष द्या. विशेषतः बाबासाहेबांच्या अनुयायांनो ही जबाबदारी आपल्याच खांद्यावर येऊन पडली आहे याची जाण असू द्या. संघटनबांधणीकडे दुर्लक्ष करू नका. नुसत्या भाषणबाजीने फार तर प्रबोधन होऊ शकेल पण संघटनबांधणी ही बाब त्याही पलीकडची आहे. नुसते शिकविण्यावर (Educate) चेतविण्यावर (Agitate) भर देऊन आपणांस थांबता येणार नाही तर शिकविलेल्या, चेतविलेल्या समाजबांधवांना संघटित करण्याच्या (Organise) कार्यात पुढाकार घेतला पाहिजे आणि हा कृतीकार्यक्रम बाबासाहेबांनी आपल्या मूळ राजकीय संघटनेच्या वतीने राबविण्यास सांगितले आहे. भाषणांचे, प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजन करतांना याची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. असे होत नसेल तर त्या कार्यक्रमांतून संघटनबांधणीस पूरक वातावरण तयार होऊच शकणार नाही. समाजाची आजची उद्ध्वस्त परिस्थिती हा त्याचाच परिणाम होय. तेव्हा जितक्या लवकर आपणांस याची जाणीव होईल तितक्या अधिक ते आपल्या हिताचे होईल. बाबासाहेब म्हणतात, “अस्पृश्य लोक (SC) जर एकसंघ अशा एका जातीत संघटीत झाले तर आपण राजकारणात काही स्थान प्राप्त करु शकतो. आपले मजबूत व एकसंघ संघटन करण्यासाठी आपण दहा वर्षेपर्यंत थांबू नये. ही संघटना आतापासूनच बांधली पाहिजे. ही संघटना आजच आपण बांधली पाहिजे. होय, उद्याही नव्हे, परवाही नव्हे तर आजच ! जर या दहा वर्षाच्या अवधीत आपण आपली संघटना दृढ आणि मजबूत पायावर उभी करुन कार्यरत केली नाही तर या दहा वर्षानंतर ‘मनुस्मृती-राज’ स्वीकारण्याचे दुर्देव आपल्या नशिबी येईल. वस्तुत: अशी संघटना आधीच आपणाजवळ आहे.” वरील बाबासाहेबांचे विधान हे आपल्यासाठी दिशादर्शक आहे. त्या विधानाकडे आपण कदापिही दुर्लक्ष करता कामा नये मित्रांनो. बाबासाहेबांनी दिलेली आपली संघटना आपण उद्याही नव्हे, परवाही नव्हे तर आजच बांधली पाहिजे. सार्वजनिक जीवनात संघटनशक्तीस अनन्यसाधारण महत्व आहे. दि. ३० सप्टेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपली तेव्हाची संघटना ‘श्येड्युल्ड कास्ट्स फेडरेशन’ (SCF) बरखास्त करून ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ (RPI) या नव्या संघटनेस जन्म दिला.
बाबासाहेबांनी जन्मास घालून दिलेल्या या रिपब्लिकन पार्टीचा गौरवशाली सुवर्ण इतिहास मात्र कालांतराने पक्षातील मतभेदामुळे, गटबाजीमुळे, निर्णायक भूमिकेच्या अभावामुळे, पक्षांतर्गत घटनात्मक लोकशाहीस पायदळी तुडविल्यामुळे उत्तरोत्तर ढासळल्याचे आपण बघतोच आहे. मात्र असे मतभेदाचे, गटबाजीचे प्रसंग बाबासाहेबांच्या हयातीतही उद्भवल्या गेल्याचे आपल्या दृष्टीस पडते. सन १९४२-१९४६ या काळात Labour member : Viceroy’s Executive Council, नंतर १९४६ ते १९४९ या काळात संविधान लिहिण्याची जबाबदारी आणि सप्टेंबर १९५१ पर्यंत स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, नंतर १९५२ च्या निवडणुका इत्यादी दहा वर्षांचा कार्यकाळ अतिव्यस्ततेत गेल्यामुळे ‘श्येड्युल्ड कास्ट्स फेडरेशन’ (SCF) मध्ये मतभेद, गटबाजी सुरू झाली होती. तेव्हा अशा बिकट प्रसंगी पक्षाच्या पुनर्बांधणीची उपाययोजना बाबासाहेबांनी दि.२६ ऑक्टोबर १९५४ साली झालेल्या आपल्या तेव्हाच्या राजकीय पक्षाच्या (SCF) अधिवेशनात सुचविल्याचे आपण गंभीरपणे लक्षात घेतले पाहिजे. बाबासाहेब म्हणतात, “माझे शेड्युल्ड कास्टस फेडरेशनकडे गेली १० वर्षे दुर्लक्ष झाले. या १० वर्षांच्या गैरहजेरीत शेड्युल्ड कास्टस फेडरेशनमध्ये पुष्कळ मतभेद निर्माण झाले आहेत. यापूर्वी असले मतभेद नव्हते. प्रत्येक माणसाने फेडेरेशनमध्ये गटबाजी सुरु केली आहे. प्रत्येकाने आपापले लहानलहान गट निर्माण केले आहेत. एकाचे वर्चस्व दुसऱ्यास नको आहे. यामुळे आपले लोक अजून तरी राजकारणात पक्के मुरले नाहीत. राजकारण म्हणजे काय याची त्यांस पूर्णपणे जाणीव नाही. आपल्या समाजात आपापसात फार मतभेद असतात. ते मतभेद ताबडतोब नष्ट होत नाहीत. त्या मतभेदाची झाडे त्यांच्या पोटात वाढू लागतात. त्यांचे मतभेद त्यांच्या मुलांच्याही पोटात वाढतात. अशा रीतीने हे मतभेद वाढत जातात. हा गुणधर्म आपल्या लोकांत जास्त प्रमाणात आहे. कॉंग्रेससारख्या पक्षातसुद्धा मतभेद आहेत. त्याबरोबरच त्यांच्याजवळ काही सद्गुणही आहेत, असे अनुभवाने म्हणावे लागते. त्यांचा एक गुण फार महत्वाचा आहे आणि तो म्हणजे बहुमताने ठरलेले ते सर्व मान्य करतात. मग त्या गोष्टीचे विरोधकसुद्धा खोट्याचे समर्थन करू लागतात. हि कृती राजकारणात फार आवश्यक आहे. माझ्या मताप्रमाणे जर कारभार चालला तरच मी संस्थेत राहीन, अशी प्रवृत्ती फार वाईट असते. हम करे सो कायदा नको.” पुढे बाबासाहेब या मतभेदातून, गटबाजीतून बाहेर पडून नव्या दमाने पक्षाच्या पुनर्बांधणीचा मार्ग सुचवितांना म्हणतात “प्रत्येक अस्पृश्य माणूस (SC) हा दलित फेडरेशनचा सभासद आहे. तो जरी तसे म्हणाला नाही तरी तसे आम्ही समजणार. अशा रीतीने प्रत्येक गावातील लोकांनी आपल्या गावातील पाच लोक निवडून द्यावे. याप्रमाणे सर्व तालुक्यातील गावाची पाच माणसे प्रमाणे लोकांनी आपले अध्यक्ष, सेक्रेटरी यांची निवड करावी. यामुळे तक्रार राहण्याचे कारण नाही. हि निवड सर्वांनाच बंधनकारक राहील. जे पैसे जमतील ते बँकेमध्ये ठेवण्यात येतील.” बाबासाहेबांच्या या विधानावरून आजघडीला आम्ही आपल्या पक्षाच्या बाबतीत असणारे मतभेद व गटबाजी पाहता, त्यातून बाहेर पडण्यासाठी रिपब्लिकन पार्टीची पुनर्बांधणी ही तिच्या संविधानाची तंतोतंत अंमलबजावणी करून, त्यांनी सुचविलेल्या मार्गास प्राणप्रिय आदेश मानून स्वीकारल्यास, आपला पूर्वइतिहास राहिलेला बलाढ्य पक्ष प्रचंड ताकदीनिशी परत एकदा या भारतभूमीवर उभा झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु यासाठी कंबर कसून किमान महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीचे अस्पृश्य गणल्या गेलेल्या व नंतरच्या काळात धर्मांतराद्वारे स्वाभिमानाची बौद्ध ओळख स्वीकारलेल्या समाजाने, अग्रक्रमाने नेमका बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाचा आदेशपर अवलंब करून, ‘जरी कोणी नाही म्हणत नसतील तरी ते रिपब्लिकन चळवळीचे नैतिकदृष्ट्या जन्मजात वारसदार व सभासद’ ठरत असल्याची त्यांना जाणीव करून देऊन वाटचाल केल्यास, संघटनेबाबत असलेल्या दुःखातून आपली दुखमुक्ती होणार हे निश्चित आहे.
देशातील सद्यपरिस्थितीतील वातावरण बघता, हातातून निसटून जाणारा एकेक दिवस आपल्यासाठी गुलामीच्या अंधार कोठडीत ढकलणारा आहे. आम्ही हेवेदावे विसरून, आरपीआय च्या घटनेला प्राणप्रिय मानून, तिच्या अंमलबजावणीला हात घालून संघटितरित्या आपली मोट बांधलीच पाहिजे. दुसरा अन्य मार्ग या कठीण प्रसंगी आपणांस तारू शकणार नाही, संघटनेशिवाय तरणोपाय नाही.
दि.०८/०३/२०१८
प्रशीक आनंद,
दीक्षाभूमी नागपूर,