संकलन : प्रशिक आनंद, नागपूर
रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून सुरू झालेली युद्धसमस्या ही मानवी जीवनकलहाची, मानवी जीवन संघर्षाची परिणती होती जीचा परिणाम असा झाला की, सिद्धार्थास गृहत्याग करून परिव्रज्या स्वीकारणे हा मार्ग निवडावा लागला. त्याला कारणही तसेच घडले. शाक्यांनी कोलियांविरुद्ध युद्ध केले पाहिजे असा बहुमताने शाक्य संघात ठरावच पारित झाला होता. मात्र सिद्धार्थ हा या युद्ध करण्याच्या प्रस्तावाविरोधात होता. खरे तर त्याला कारणही तसे सबळ होते. युद्धाच्या ठरावाला धीरगंभीरपणे विरोध करतांना शाक्य संघाच्या सभेत सिद्धार्थ आपली मानवतावादी मते निर्भीडपणे मांडतांना म्हणतो,
‘‘या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. या युद्धाने दुसर्या युद्धाची बिजे रोवली जातील. जो दुसर्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसर्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसर्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो.’’
यातून हे स्पष्ट होते की युद्ध करणे हे काही समस्येचे समाधान होऊ शकत नाही. युद्धाने युद्ध वाढते, वैराने वैर वाढते हे सिद्धार्थ गौतमाने अगदी तरुण वयातच जाणले होते. केवळ याच कारणासाठी नव्हे तर आणखी एक महत्त्वाचे कारणही या युद्धास विरोध करण्याच्या बाबतीत आपण लक्षात घेतले पाहिजे ते असे की, वयाची वीस वर्षे पूर्ण झाल्यावर सिद्धार्थाने शाक्य संघाचा (शाक्यांची संघटना) सभासद होतांना, संघाप्रति असणाऱ्या त्याच्या कर्तव्याची प्रतिज्ञाही घेतली होती. त्यातील पहिलीच प्रतिज्ञा ही, “मी शाक्य संघाच्या हितसंबंधांचे संरक्षण तनमनधनपूर्वक करेन.” अशी होती. सिद्धार्थ गौतम आपल्या कर्तव्याप्रति सजग होता. शाक्यांच्या हितसंबंधांस बाधा पोहोचेल असे कोणतेही अकुशल कर्म आपल्या हातून घडता कामा नये, तसे कोणतेही विचार आपल्या मनात डोकावता कामा नये, तशा विचारांशी आपण कदापिही सहमत होता कामा नये याची पुरेपूर खबरदारी घेऊन सिद्धार्थाने मोठ्या जबाबदारीने त्या युद्धास विरोध केला होता. त्या युद्धात केवळ कोलीयच नव्हे, तर रक्तपात होऊन शाक्यही मारल्या जातील हे त्याने ओळखले होते. युद्ध हे काही समस्येचे समाधान होऊ शकत नाही यावर सिद्धार्थ ठाम होता. मात्र संघाच्या लोकशाही यंत्रणेत अल्पमतात असलेल्या सिद्धार्थाचा ‘युद्ध न करण्याचा’ प्रस्ताव पारित होणे शक्यच नव्हते. तेव्हा सेनापतीने टाकलेला ‘युद्ध करण्याचा’ प्रस्ताव बहुमताने त्या सभेत संमत झाला, पारित झाला. पुढे युद्धात सामील न होण्याचा सिद्धार्थाचा निर्णय व ही एकूणच घटना, सिद्धार्थ गौतमाच्या जीवनास कलाटणीच देणारी ठरली. त्या निर्णयाची परिणती सिद्धार्थास परिव्रज्या घेण्यास कारणीभूत ठरली. या घटनेने सिद्धार्थ गौतमास विचार, चिंतन-मनन करण्यास भाग पाडले की, या जगात हा जो काही ‘सामाजिक संघर्ष’ आहे त्याचे ‘समूळ उच्चाटन’ करता येईल काय? त्यासाठी कोणता मार्ग असू शकतो?
(१) क्रमशः