मागील भागाहून पुढे____
खरे तर, गृहत्यागाच्या या घटनेच्या काही दिवसानंतर शाक्य स्त्री-पुरुषांनी, मुलामुलींनी कोलियांप्रति मैत्रिभावनेस जागून व सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करून जी चळवळ राबविली तिचा परिणाम असा झाला की शाक्य संघास युद्ध निर्णयाबाबत फेरविचार करावा लागला व पुढे शाक्य व कोलीय यांच्यामध्ये समेट घडून आणण्याच्या बाजूने संघात बहुमत झाले. ही सुवार्ता सिद्धार्थास पाच परिव्राजकांद्वारे कळली असता त्याला आनंद झाला मात्र यासोबतच स्वगृही, आपल्या कुटुंबात परत जाण्याची संधीही आली असता सिद्धार्थाने ती नाकारली. त्याला कारणही तसेच होते. बाबासाहेब ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या बौद्धांच्या धर्मग्रंथात याबाबत फार सुरेख मांडणी करतात. त्यातील उतारा खालीलप्रमाणे आहे,
“त्याने स्वकीयांचा त्याग कशासाठी केला होता? त्याने स्वत:लाच विचारले. युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने घर सोडले होते. आता ज्याअर्थी युद्ध संपले आहे त्याअर्थी माझ्यापुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय? युद्ध संपले याचा अर्थ माझ्यापुढील प्रश्न सुटला असा होतो काय? खोल विचार केल्यावर तो सुटला नाही असेच त्याला वाटले. ‘युद्धसमस्या’ ही मूलत: ‘कलहसमस्या’ आहे. एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे. हा कलह फक्त राजे आणि राष्ट्रे यांच्यातच चालत आहे असे नव्हे; तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यात, कुंटुंब-प्रमुखात, मातापुत्रात, पितापुत्रात, भावाबहिणीत आणि सहकार्यांत देखील चालू आहे. राष्ट्रा-राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात्त असतो; परंतु वर्गावर्गांतील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो. हा संघर्षच जगातील सर्व दु:खाचे मूळ होय. युद्धामुळे मी घर सोडले हे खरे, पण शाक्य व कोलीय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की, माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या ‘सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर’ मला शोधून काढले पाहिजे.”
सिद्धार्थ गौतमाच्या मनमस्तिष्कात हे विचारचक्र फिरत असल्यानेच स्वगृही, आपल्या कुटुंबात न परतण्याचा त्याने निर्णय घेतला होता. येथून पुढे सिद्धार्थ गौतमाचा शोधप्रवास सुरू झाला. ‘सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर शोधून काढणे’ हेच त्याच्या जीवनाचे ध्येय झाले. त्याला पडलेल्या समस्येवर समाधान शोधण्यासाठी त्याकाळी प्रचलित व प्रस्थापित असलेल्या नानाविध मार्गांद्वारे तसेच तत्वज्ञानाच्या अभ्यासातून व अनुभवातून काही मार्ग सापडतो का याचा शोध घेण्यासाठी सिद्धार्थाने त्या विविध मार्गांना अनुसरण्याचे ठरविले.
(२) क्रमशः
www.republicantimes.in या वेबसाईटवर सर्व भाग उपलब्ध आहेत.