औरंगाबाद येथे रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकर्त्यांची चिंतन बैठक संपन्न
दि. 10 डिसेंम्बर 2017 रोजी सुभेदारी विश्रामगृह, औरंगाबाद येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या 50 पेक्षाही अधिक संख्येने हिरीरीने भाग घेतलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकर्त्यांची चिंतन बैठक आयु. नगराळे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीचे सूत्रसंचालन आयु. नानासाहेब बागुल यांनी केले. बैठकीत रिपब्लिकन चळवळीला सशक्त करण्यासाठी तिच्या पुनर्बांधणी विषयक चर्चेला हात घालण्यात आला. या अनुषंगाने समता सैनिक दल तसेच भारतीय बौद्ध महासभा यांच्या बळकटीकरणाबाबत प्रथमतः मुद्दे मांडून त्यावर चर्चा करण्यात आली.
सोबतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या पुनर्बांधणी संदर्भात एकंदरीत समाजास भेडसावणारी बाब ही मुख्यतः तांत्रिक स्वरूपाची असल्या कारणाने जोवर समाज तिची सोडवणूक करणार नाही तोवर तिची पुनर्बांधणी ही संभ्रमात्मक अवस्थेतच राहील ह्यावरही चर्चा करण्यात आल्या आणि ह्या संभ्रमातून सुटका करून रिपब्लिकन पार्टीला सुस्थापित करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या श्री.गवई यांच्या घराणेशाहीच्या विळख्यात हेतुपुरस्पर अडकवून ठेवलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, या संस्थेस समाजाने मुक्त करून तिला समाजाभिमुख करण्यासाठी, तिची घटनात्मक लोकशाही मार्गाने पुनर्बांधणी करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे यांवर उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे एकमत झाले.
याच मुद्द्यांबाबत नागपूर येथेही विदर्भातील कार्यकर्त्यांची सहमती असल्याची आठवण आयु. रमेश जीवने, अमित भालेराव, जयबुद्ध लोहकरे इत्यादींनी उपस्थितांना करवून देऊन आंदोलनाची अपेक्षित नेमकी भूमिका विशद केली. एकंदरीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या मुक्ती आंदोलनास गतिमान करूनच रिपब्लिकन चळवळीची पुनर्बांधणी यशस्वीरीत्या करता येऊ शकते याबाबतचा आशावाद उपस्थित सदस्यांनी दाखवून पुढील राज्यस्तरीय बैठक नागपूर येथे घेऊन रीतसर मुक्ती आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आला.