हिंदुत्ववादाचा अजेंडा या देशात चालवणारे लोक आता प्रचंड चेकाळले आहेत. कायदा हातात घ्यायला लागलेले आहेत. राज्यघटनेपेक्षा त्यांचा झुंडशाहीवर, हुकूमशाहीवर अधिक विश्वास आहे. प्रधानमंत्र्याच्या गुजरातेतील ऊना गावात गाईला मारल्याच्या संशयावरून चार तरुणांची अर्धनग्न धिंड काढली जाते. त्यांना बेदम मारले जाते. प्रत्यक्षात घटना वेगळेच काही सांगते. जवळच गिर जंगल आहे आणि तिथल्या गाईची शिकार केल्याचे पुढे आले. तोपर्यंत या दलित तरूणांना बेदम मारले गेले. प्रश्न हा नाही की, गाय मारली अथवा मारली नाही. प्रश्न हा आहे की, या हिंदुत्ववाद्यांना माणसापेक्षा गाय महत्वाची वाटते. देशात कोणाच्या तरी घरी बीफ सापडते आणि हे बीफ गाईचे आहे असा संशय आल्यानंतर जमाव एका असहाय्य वृध्दाला ठेचून मारतो. मोहम्मद अखलाक नाव धारण केलेल्या या माणसाला देशभक्ती शिकविली जाते. या मोहम्मद अखलाकचा मुलगा सैन्यामध्ये असताना त्याला देशभक्ती शिकविली जाते. ज्यांना देशभक्तीची नीट व्याख्या करता येत नाही असे अाता देशभक्तीचे कोचिंग क्लासेस घ्यायला निघाले आहेत. हिंदुत्ववाद्यांच्या या छळाला आजपर्यंत अनेकांना सामोरे जावे लागले. ‘द क्विट’ च्या रिपोर्टनुसार २०१५ ते २०१८ या कालावधीत भारतात ९७ जणांना जमावानं ठेचून मारलं. ‘माॅब लिंचींग’ चा हा प्रकार नव्याने या हिंदुत्ववाद्यांनी जन्माला घातला आहे आणि त्यातून असे अघोरी प्रकार ते करत सुटलेले आहेत. काय सुरु आहे या देशात?
हिंदू समाजातील अनिष्ट चालीविरुध्द बोलणे म्हणजे राष्ट्रद्रोह, मुस्लीमांविषयी चांगले बोलणे म्हणजे राष्ट्रद्रोह अशी राष्ट्रद्रोही लोकांची सोपी व्याख्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी केलेली आहे. गुरमेहेर कौर ही १९९९ साली कारगील युध्दात शहीद झालेल्या कॅप्टन मानदीप सिंह यांची कन्या आहे. दिल्ली विद्यापीठातील लेडी श्रीराम काॅलेजात ती शिक्षण घेते. दिल्ली काॅलेजात झालेल्या एका प्रसंगात अभाविप च्या दादागिरी विरोधात, बेबंदशाही विरोधात जेव्हा ती बोलते तेव्हा भाजपचे मंत्री, खासदार, अभाविपचे विद्यार्थी तिला लक्ष्य करतात. ट्रोलींग ब्रिगेडकडून सुध्दा तिला प्रचंड मानसिक यातना दिल्या जातात. फेसबुक, ट्विटर, व्हाॅट्सअॅप, इंटरनेट या माध्यमातून अभिव्यक्तीवर हल्ले करण्याचा आता काही रिकामटेकड्यांचा उद्योगच झालेला आहे.
परिवर्तनवाद मांडणाऱ्या, शासनाची चुकीची धोरणे समोर आणणाऱ्या लोकांच्या विरोधात उपरोक्त माध्यमांमधील झुंडशाहीला उत आलेला आहे. अर्थात ही झुंडशाही, हुल्लडबाजी संघटित स्वरूपाची आहे. आज ‘भारतमाता की जय’ म्हणण्याची सक्ती केली जाते. ‘वंदे मातरम्’ म्हणण्याची सक्ती केली जाते. कुणालाही जबरदस्तीने कुठलीही सक्ती करणे हे राज्यघटनेच्या विरोधी आहे. परंतु बेबंदशाहीला, मुजोरशाहीला जर राज्यघटनाच मान्य नसेल तर असे प्रकार नित्याने घडतच राहणार. ज्यांनी कधी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाही, जे स्वतः इंग्रजांच्या छायेत स्वतःची सुरक्षितता शोधत होते, तेही आज स्वतःला शहाजोगपणे देशभक्त म्हणवून घेत आहेत.
Check Also
धम्मावरती बोलू काही (४)
मागील भागाहून पुढे____ आलारकालाम हा ध्यानमार्गा अंतर्गत येणाऱ्या तिन्ही प्रकारच्या पंथात/शिक्षण पद्धतीत प्रभुत्वसंपन्न (अधिकारिता संपन्न/master) ...