….हिंदू म्हणून मरणार नाही.
संकलन : प्रशिक आनंद, नागपूर
अस्पृश्य (SC) हे हिंदु नाहीत.
(संदर्भ : जातीय निवाडा)
प्रश्न : मग बाबासाहेबांनी स्वतःला हिंदु का मानून घेतले? (संदर्भ :१९३५ साली केलेली धर्मांतराची घोषणा)
एका बहुजन व्यक्तिद्वारे वरीलप्रमाणे प्रश्न विचारण्यात आला असता त्यांना खालीलप्रमाणे उत्तर देण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे मित्रांनो ! शक्य असल्यास आपल्याला ज्ञात असलेल्या बाबी मांडून त्या उत्तरात भर टाकण्याचे करावे किंवा मांडलेल्या उत्तरातील चुका माझ्या निदर्शनास आणून देण्याचे करावे जेणेकरून मला त्यात सुधारणा करता येतील.
उत्तर : पूर्वी अस्पृश्यांना हिंदू धर्माचाच भाग मानल्या जात असे. मात्र बाबासाहेबांनी ‘अवर्ण अस्पृश्य वर्गास’ (१५%) एकसंध करून ‘सवर्ण हिंदू वर्गासोबत’ (८५%) त्यांच्या न्यायहक्कांचा लढा उभारायला विशेषतः १९२० पासून सुरुवात केली. मृतवत अस्पृश्य समाजात स्वाभिमान निर्माण करण्यासाठी चौदार तळ्याचे आंदोलन (१९२७) ते काळाराम मंदिराचे आंदोलन (१९३०) उभारले. हे करीत असतांना अस्पृश्यांना हिंदू धर्माचा भाग समजणाऱ्या ‘सवर्ण हिंदू’ लोकांद्वारे कशी अमानवीय व तुच्छ वागणूक दिल्या जाते हे प्रखरपणे त्यांच्या व तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या वेळोवेळी लक्षात आणून दिले व अस्पृश्य वर्गास हे कळून चुकले की हिंदू धर्मात सुधारणा होणे शक्य नाही व त्यांचा भाग राहण्यात काहीएक हशील नाही. पुढचा काळ हा या देशात ब्रिटिशांनी आपले पाय काढते घेऊन देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी हालचाल करण्याचा ठरला. त्याअनुषंगाने १९३०-१९३२ दरम्यान इंग्लंडममध्ये ‘गोलमेज परिषदा’ झाल्यात व त्यात अस्पृश्यांच्या वतीने बाबासाहेबांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या न्यायहक्कांची मागणी ठेवली व न्यायप्रिय इंग्रजांना त्यांचे म्हणणे पटले व ‘कम्युनल अवॉर्ड’ च्या स्वरूपात ती इंग्रजांद्वारे मान्य करून आपल्या पदरात पाडून घेतली.
याद्वारे भारतात हिंदू, मुस्लिम लोकसमूह ज्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे हिंदू धर्म व्यवस्थेचा (वर्णव्यवस्था) भाग नसलेलाही एक वर्ग आहे आणि तो म्हणजे ‘अवर्ण अस्पृश्य वर्ग’ असून त्यांचेही भारतीय समाजात स्वतंत्र अस्तित्व आहे हे कायदेशीररित्या मान्य झाले. आणि यामुळेच त्यांना ‘स्वतंत्र मतदारसंघही’ मिळालेत. पुढे ‘कम्युनल अवॉर्ड’नुसार मिळालेल्या ‘स्वतंत्र मतदारसंघा’ विरोधात श्री. गांधी या चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या पुजाऱ्याद्वारे पुणे येथील येरवडा तुरुंगातच आमरण उपोषण पुकारण्यात आले. त्यावेळी ते तुरुंगवासी असल्याने तुरुंगातच हे कृत्य करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नव्हता. उपोषणास कारण काय? तर म्हणे अस्पृश्य हे हिंदुहून वेगळे नसून ते हिंदू धर्माचाच भाग आहेत. यावरून श्री. गांधींसारखा ‘चातुर्वर्ण्यप्रिय कट्टर हिंदू’ त्याकाळी नव्हताच हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. ‘भौतिक उद्धार’ होण्याच्या अस्पृश्यांच्या मार्गात श्री. गांधी हे मोठाच अडसर ठरलेत. पुढे श्री. गांधी यांचे प्राण वाचविणे हे महाकारुणीक बाबासाहेबांना लोकहितार्थ व बुद्धिसंगत वाटले व त्याचीच परिणती म्हणजे ‘पुणे करार’ होय. जरी हा करार केल्या गेला तरी त्यातून “अस्पृश्य हे हिंदू धर्माचा भाग नसून त्यांचे या देशात स्वतंत्र अस्तित्व आहे ही बाब या देशातील बेदरकार हिंदू समाजास मान्यच करावी लागली असल्याने तो आपला विजयच होय.” असे बाबासाहेब म्हणतात.
यापुढील लढाई आता अधिक तीव्र होणे गरजेचे होते आणि एकीकडे अस्पृश्य वर्गाचा ‘भौतिक उद्धार’ (शिक्षण, रोजगार इत्यादी) करण्यासाठी बाबासाहेबांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होती तर दुसरीकडे त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे अस्पृश्य वर्गाचा ‘मानसिक उद्धार’ करणे त्यांना कैक पटीने श्रेष्ठ वाटत होते. अस्पृश्यांना ‘मानसिक स्वातंत्र्याशिवाय’ तरणोपाय नाही याची त्यांना पक्की खात्री पटली होती. हिंदू धर्म हे व्यक्तीस ‘मानसिक गुलाम’ करण्याचे मोठेच षड्यंत्र राहिलेले आहे ही बाब ओळखून यातून मानसिक स्वातंत्र्य ‘केवळ धर्मांतरानेच’ मिळणे शक्य होते यावर त्यांचे निश्चित मत बनले. आणि म्हणूनच पुढील काळात (१९३५) त्यांनी ही घोषणाच केली की, “मी हिंदू म्हणून जन्मास आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही.” या देशातील अस्पृश्य वर्गास राजकीय बॅनरखाली (ILP-SCF) एकसंध करून या राजकीय शक्तीचे रूपांतर पुढे धर्मांतरणाद्वारे धार्मिक शक्तीत करून ‘प्रबुद्ध भारताकडे’ वाटचाल करण्याचे त्यांनी योजिलेले दिसते व त्याचीच प्रथम पायरी म्हणजे १९३५ ला केलेली हिंदू धर्मत्यागाची घोषणा (सम्यक संकल्प) १९५६ साली त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत केलेल्या धर्मांतराद्वारे (बौद्ध धम्मदीक्षाग्रहण) पूर्ण केली जाणे होय. असा हा बाबासाहेबांनी राबविलेल्या अस्पृश्योद्धाराच्या चळवळीचा (Movement of Untouchables होय जी पुढे ‘रिपब्लिकन चळवळ’ झाली. Movement of Bahujans नाही हे विसरता कामा नये) प्रवास लक्षात घेता त्यांनी योजलेल्या रणनीती व कार्यनीती कशा स्वरूपाच्या होत्या याचे आपणांस आकलन होऊ शकेल.
जय आरपीआय
जयबुद्ध जयभीम
टीप : अधिक माहितीसाठी ‘बहुजन सोडून’ नजीकच्या वैचारिक बौद्ध व्यक्तीस जो खऱ्या अर्थाने ‘रिपब्लिकन’ असेल त्यास तात्काळ गाठून आपल्या शंकांचे निरसन करावे.