🎓 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज 🚩
१९१८ साली प्रथमच साऊथबरो कमिटीच्या वेळी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी मराठ्यांसाठी आरक्षणाची मागणी केली होती. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना महाराजांच्या दूरदृष्टीची कल्पना असल्यामुळे त्यांनी या मागणीचे समर्थन केले होते. त्यांनी २७ फेब्रुवारी १९१९ रोजी साऊथबरो कमिटीला दिलेल्या लिखित साक्षीमध्ये मताधिकाराच्या संदर्भात मराठा जातीला विशेष सवलत द्यावी, असे आग्रही मत व्यक्त केले होते. त्यात ते म्हणतात, “जरी मराठ्यांची संख्या ब्राह्मणांपेक्षा अधिक असली तरी मतदार यादीत त्यांच्या मतदाराची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे वैयक्तिक प्रतिनिधीत्व मिळविण्याच्या बाबतीत ते अयशस्वी ठरतील. हा मुद्दा लक्षात घेता मराठा समाजासाठी विशेष व्यवस्था करणे योग्य ठरेल.”
सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या-जिल्ह्यात मराठा समाजाचे मूक मोर्चे मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येत शांततेत निघाले. या मोर्च्यांना कोणत्याही राजकीय पक्षाचे नेतृत्व नव्हते तर हे मोर्चे स्वप्रेरणेने निघाले. या मोर्च्यामध्ये ना गडबड, ना गोंधळ. ते अगदी शांततेने कायद्याचे पालन करून काढले गेले. परंतु या मोर्च्यातील बहुसंख्य लोकांना आपण काय करत आहोत व कशासाठी करत आहोत याची फारशी कल्पना नव्हती. यातील बहुतांशी लोक अनभिज्ञ आहेत. सत्ताकारणाच्या शतरंजपटावर आपण कुणाची तरी प्यादी बनत आहोत, याचे भान अजून त्यांना आलेले नाही. भारतीय समाज अधिक प्रगत वा प्रगल्भ करीत नसून अगोदरच विस्कटलेल्या भारतीय समाजाला अधिकच खोल गर्तेत ढकलत आहोत. मुख्य म्हणजे हे सारे सत्ताकारण आहे, समाजकारण नव्हे याची कल्पनाच आलेली दिसत नाही. वास्तविक मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी छत्रपती शाहू महाराज यांची पण मागणी यशस्वी केली ती डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी. याची जाणीवच आजच्या मराठा समाजाला नाही.