🎓📓✒ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि देशाची उभारणी
देशाच्या सामाजिक आणि संवैधानिक जडणघडणीतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाइतकेच देशाच्या उभारणीतील त्यांचे योगदानही मोलाचे आहे. जल आयोग ते नॅशनल थर्मल पाॅवर काॅर्पोरेशन, मोठ्या धरणांचे नियोजन ते तंत्रज्ञाननिपुण मनुष्यबळाची आवश्यकता, कामगार कल्याणाचे आणि हक्कांचे कायदे यांचा विचार केला तर बाबासाहेबांचे द्रष्टेपण सामोरे येते.
भारताच्या सामाजिक आणि संवैधानिक जडणघडणीमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले योगदान सर्वश्रुत झाले. परंतु देशाच्या उभारणीतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाची माहिती दुर्लक्षितच राहिली. दुसऱ्या महायुद्धानंतर देशाच्या पुर्नउभारणीचा कार्यक्रम आखण्यात आला. त्याला पोस्टरवर रिकन्स्ट्रक्शन कार्यक्रम म्हटले जाते. देशात पायाभूत संरचना निर्माण करण्याचा हा कार्यक्रम होता. देशाच्या औद्योगिक विकासातील वीज निर्मिती, शेतीकरिता पाण्याचे व्यवस्थापन आणि मूलभूत उद्योगांची उभारणी असा हा कार्यक्रम होता. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी १९४२ साली व्हाइसरॉयच्या मंत्रिमंडळात मजूरमंत्री म्हणून प्रवेश केला. त्यांनी वीज, पाणी, पाटबंधारे, वाहतूक, आणि तंत्रज्ञान असे महत्वाचे विभाग सांभाळले. या काळात त्यांनी पायाभरणी केलेले सेंट्रल वाॅटर कमिशन, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अॅथोरिटी, सेंट्रल इरिगेशन अॅण्ड नेव्हिगेशन कमिशन, फायनान्स कमिशन, लेबर कमिशन, नॅशनल थरमल पाॅवर कमिशन, दामोदर व्हॅली काॅर्पोरेशन, भाक्रा नांगल हे सर्व उपक्रम डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तुत्वाची प्रतीके आहेत. भारताचे अाधुनिक तीर्थक्षेत्र म्हणून भाक्रा नांगल धरण हे संबोधले जाते. पंजाब राज्याच्या सुबत्तेत या धरणाचे महत्व कोणी नाकारू शकत नाही. या धरणाचा प्रशासकीय निर्णय आॅक्टोबर १९४३ साली डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला.