🕋 डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार 🧔🏻
संकलन: इंजी. सुरज तळवटकर.
मुस्लिम आक्रमकांनी ज्या हिंस्त्र विध्वंसक पद्धतीचा अवलंब केला होता, त्यांचे दुष्परिणाम हिंदू-मुस्लिम या दोहोतील संबंधावर किती खोलवर आणि दूरगामी झाले आहेत, याचा उल्लेख बाबासाहेबांनी अवश्य केला आहे. मंदिरे पाडणे, बळजबरीचे धर्मांतरे, अमानुष कत्तली, स्त्री-पुरूष बालकांची क्रूर हत्या, अत्याचार, गुलामी या पूर्वजांच्या पराक्रमांबद्दल शतकानंतरही मुस्लिमांनी गर्व बाळगणे आणि हिंदूंनी शरमिंदे होणे या दोन्ही प्रतिक्रिया बाबासाहेबांना दुर्देवी वाटत होत्या. मुस्लिम आक्रमकांनी जे केले, त्याचा बदला घेण्याच्या विकृत भावनेतून हिंदुत्ववाद्यांनी गुजरात राज्यात जो ‘सैतानी प्रयोग’ केला, त्याची भलामण बाबासाहेबांनी कधीच केली नसती. हिंदू संस्कृती आणि सभ्यता दीर्घायुषी आहे, हा हिंदुत्ववाद्यांना अभिमानास्पद वाटणारा मुद्दा उडवून लावताना बाबासाहेब म्हणतात, ‘केवळ टिकून राहणे महत्वाचे नसते. त्या टिकून राहण्याची गुणवत्ता तपासावी लागते. हिंदू समाज ज्या पद्धतीने टिकून राहिला, ते पाहता प्रत्येक हिंदूची मान खाली गेल्यावाचून राहणार नाही.’ असा अभिप्राय त्यांनी दिला आहे. ज्याची लाज वाटावी, तेही ‘गर्व से कहो’ म्हणणाऱ्यांशी बाबासाहेबांचे काडीमात्रही वैचारिक सख्य संभवत नाही, ही वादातीत वस्तुस्थिती आहे.
मुस्लिम आक्रमणामुळे येथील व जगातील इतरत्रचाही बौध्द धम्म लोप पावला, हे तथ्य सांगत असतानाच बाबासाहेब हेही आवर्जून नमूद करतात की, मुस्लिम आक्रमकांनी वास्तू पाडल्या असतील; पण ब्राह्मणीधर्माप्रमाणे धम्माची पाळेमुळे, तत्वे व सिध्दांत त्यांनी उखडून फेकले नाहीत. मुस्लिम आक्रमक सगळे एक होते, त्यांच्या प्रेरणा तद्दन धार्मिक होत्या आणि एकूण एक मुसलमान राष्ट्रद्रोही आहेत, यापैकी कोणतेच मत बाबासाहेबांनी कधीच मान्य केलेले दिसत नाही.
संघपरिवाराकडून बाबासाहेबांची केली जाणारी स्तुती व निंदा दोन्हींच्या मुळाशी त्याचा निहित स्वार्थ असतो आणि वस्तुस्थितीचा जाणीवपूर्वक केलेला विपर्यास असतो. बाबासाहेबांना प्राणप्रिय असलेल्या तत्वांचा व सिध्दांताचा मुडदा पाडण्यासाठी आंबेडकरी विधानांचा हत्यार म्हणून वापर करण्याचा अघोरी आटापिटा संघपरिवार नेटाने करीत असतो. बाबासाहेबांच्या क्रांतिकारी व मुक्तीदायी विचारांमुळे त्यांची पाचावरच धारण बसते. मुस्लिमद्वेषाच्या आधारावर त्यांनी सत्तेमत्तेचे मार्ग आज हस्तगत केले आहेत.
मुस्लिम, शीख व कनिष्ठ जाती यांनी आपले समान हितसंबंध ओळखून संघटित व्हावे आणि सवर्ण हिंदूंच्या विरोधात उभे राहावे, यातूनच सांप्रदायिक सलोख्याचा व सुसंवादाचा मार्ग दिसेल आणि या देशावर संभवणारे हिंदुराष्ट्राचे गंडांतर टळेल, अशी स्पष्टोक्ती बाबासाहेबांनी केली आहे.
भाग:- दोन
#क्रमश: