🕋 डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार 🧔🏻
संकलन: इंजी. सुरज तळवटकर
हिंदुराष्ट्राच्या निर्मितीची संकल्पना ही या देशावर संभवणारी सर्वात गंभीर आपत्ती ठरवून सर्वशक्तीनिशी त्याचा प्रतिवाद केला पाहिजे, असे नि:संदिग्ध शब्दांत बजावणाऱ्या बाबासाहेबांना हिंदुत्वसमर्थक ठरविण्याचे कारस्थान संघपरिवार गेल्या वीसके वर्षांपासून वाढत्या कुटिल मार्गांनी पुढे नेत आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या तिन्ही शिरोधार्य मूल्यांना पायदळी तुडविणारे हिंदुत्व लोकशाहीशी पूर्णपणे विसंगत असल्यामुळे बाबासाहेबांना स्वाकारार्ह वाटण्याची सपशेल शक्यता नव्हती आणि त्यांनी ते वारंवार स्पष्ट केले आहे. हिंदुत्वाचे राजकारण पूर्वापार मुस्लिमविरोधाभोवतीच चालत अालेले असल्यामुळे बाबासाहेबांना मुस्लिमविरोधक ठरविणे, हा त्यांच्या हिंदूकरणाच्या प्रकल्पाचा मध्यवर्ती कार्यक्रम असतो. त्यासाठी बाबासाहेबांच्या विपुल लिखाणातून काही सुटी वाक्ये, त्यांच्या विचारांच्या गाभ्यापासून तोडून, जनतेसमोर ठेवण्याचा उपद्व्याप संघपरिवारातील अभ्यस्त व अनभ्यस्त दोघेही नेटाने करत असतात.
हेगडेवार आणि आंबेडकर जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, सावरकर आणि आंबेडकरांनी जणू एकत्र बसूनच द्विराष्ट्र सिध्दांत लिहिला, हिंदू व मुस्लिम यांचे सहअस्तित्व हिंदुत्ववाद्यांप्रमाणेच आंबेडकरांनाही अशक्य वाटत होते, हिंदुत्ववाद्यांची सगळी मुस्लिमविषयक पूर्वग्रहदूषित ठोकळेबाज मते जणू आंबेडकरांना मान्य होती- असे अनेक जावईशोध संघपरिवारातील कमी-अधिक अाक्रमक मंडळींनी लावले आहेत. बाबासाहेब हिंदुत्वाचे समर्थक तर नव्हतेच, उलट कट्टर विरोधक होते, हे नीट समजून घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे हेही ध्यानात ठेवायला पाहिजे की इस्लाममधील समतातत्वाचे बाबासाहेबांना आकर्षण होते. काहीकाळ त्यांची भूमिका दलितांनी हिंदुधर्म सोडून इस्लामचा स्वीकार करावा अशी होती.
मुसलमानांच्या पडदाप्रथेबद्दल बाबासाहेबांनी घणाघाती टीका केली असून, मुस्लिम स्त्रियांच्या बुरख्यामुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक, सामाजिक वगैरे दुष्परिणामांची इत्यंभूत चर्चाही त्यांनी केली आहे. मुस्लिमांचे राजकारण धर्मनिरपेक्ष प्रश्नांवर आणि आर्थिक विषमता, मागासलेपणा, बेकारी वगैरे समस्यांवर केंद्रित होण्याऐवजी केवळ धार्मिक मुद्द्यांभोवतीच घोटाळत राहते, याबद्दल त्यांनी नापसंतीही व्यक्त केली आहे; पण म्हणून मुस्लिम समाज सुधारणाविरोधी आहे, इस्लामची शिकवणूक मूलतः परिवर्तनविरोधी आहे किंवा इस्लाममध्येच आक्रमकतेची व दहशतवादाची पाळेमुळे सामावलेली आहेत, ही संघपरिवाराकरवी सतत उधळली जाणारी मुक्ताफळे बाबासाहेबांच्या लेखनात कोठेही आढळत नाहीत.
जगातील इतर इस्लामी देशांनी सुधारणा स्वीकारल्याचे सांगून भारतीय मुस्लिमांच्या स्थितिप्रियतीचे मूळ येथील हिंदू वर्चस्वापायी त्यांना वाटणाऱ्या असुरक्षिततेत आहे, असे वस्तुनिष्ठ निदान बाबासाहेबांनी केले होते. या त्यांच्या निष्कर्षाची प्रस्तुतता आज, पूर्वी कधीच नव्हती, एवढी वाढली आहे. कारण नव्वदीच्या दशकात हिंदुत्वशक्तींच्या आक्रमकतेत जसजशी भर पडत गेली, तसतशी मुस्लिमांमधील सुधारणावादी प्रवाहांची ताकद क्षीण होत चालली आहे. त्यांच्यातील स्थितीवादी शक्ती बळावत चालल्या आहेत. अशावेळी डाॅ.बाबासाहेबांनी केलेले समाजशास्त्रीय विवेचन जनतेसमोर येणे उपयुक्त ठरणार आहे.
भाग:- एक
#क्रमशः