Thursday , June 19 2025
Home / Maharashtra / रिपब्लिकन चळवळ

रिपब्लिकन चळवळ

रिपब्लिकन चळवळ (RPI-SSD, BSI) : ब्राह्मणवाद विरुद्ध बौद्धवाद

   प्राचीन भारताच्या इतिहासाबाबत विवेचन करतांना बाबासाहेब म्हणतात, “प्राचीन भारताचा त्रयस्थपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला बुद्धपूर्व काळात दोन संघर्ष आढळतात. पहिला संघर्ष आर्य व नाग लोकातील व दुसरा ब्राह्मण व क्षत्रियातील.” आजमितीसही हा संघर्ष अविरतपणे सुरू आहे. सदर इतिहासाची विस्तृतपणे मांडणी त्यांनी ‘प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती’ या आपल्या ग्रंथात केलेली आढळते. त्या इतिहासाचे अवलोकन केल्यास आपल्या हे लक्षात येते की, एकूणच भारताच्या इतिहासासंदर्भात येथील संघर्ष हा ‘ब्राह्मणवाद विरुद्ध बौद्धवाद यांच्यातील मरणांतिक संघर्ष’ असाच राहिला आहे असे स्पष्ट मत बाबासाहेबांनी त्यात मांडले आहे. आर्य व नाग लोक यांच्यात झालेल्या लढाईत नाग लोकांनी आर्यांना पराभूत केले व समानतेच्या तत्वावर आधारित शांतताप्रिय समाजरचना प्रस्थापित केली.
याची सुरुवात मगध राज्याचा संस्थापक शिशुनाग नावाच्या नाग राजाने ख्रिस्तपूर्व ६४२ मध्ये (सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापूर्वी जवळपास आठ दशकपूर्व) केली. या शिशुनाग घराण्याच्या कारकिर्दीत छोट्या मगध राज्याचा विस्तार खूप मोठा झाला. या घराण्यातील पाचवा राजा बिंबिसार होय. हा सिद्धार्थ गौतमाचा समकालीन होता. राजा बिंबिसार याच्या कारकीर्दीत ‘मगध राज्याचे’ रूपांतर ‘साम्राज्यात’ झाले व त्याला ‘मगध साम्राज्य’ असे नाव प्राप्त झाले. शिशुनाग घराण्याचे राज्य ख्रिस्तपूर्व ४१३ पर्यंत अस्तित्वात होते. या वर्षी शिशुनाग घराण्यातील राजा महानंद यास नंद नावाच्या एका साहसी तरुणाने ठार केले. नंदाने मगध साम्राज्य बळकावले व नंद घराण्याची सत्ता सुरू झाली. या नंद घराण्याची सत्ता ख्रिस्तपूर्व ३२२ पर्यंत होती. नंद घराण्यातील अखरेच्या राजाला चंद्रगुप्ताने पदच्युत केले व मौर्य घराण्याची सत्ता मगध राज्यावर स्थापन केली. चंद्रगुप्त हा शिशुनाग घराण्यातील शेवटच्या सम्राटाचा नातलगच होता. याचा अर्थ असा होतो की चंद्रगुप्ताने पुन्हा नाग घराण्याचीच सत्ता मगध साम्राज्यावर स्थापन केली.
मौर्य घराण्याने त्यांच्या विजयी मोहिमांनी मगध साम्राज्याचा विस्तार प्रचंड प्रमाणात केला. अशोक सम्राटाच्या काळात हे मगध साम्राज्य इतके विस्तार पावले की, मगध साम्राज्याला ‘अशोकाचे साम्राज्य’ असे मानले जाऊ लागले. त्याकाळात प्रचलित धर्मांपैकी बौद्ध धर्म हा एक प्रमुख धर्म होता. सम्राट अशोकाने कलिंगच्या युद्धानंतर बौद्ध धर्म अंगिकारला होता व बौद्ध धर्मास राजधर्म (state religion) बनविले. ब्राह्मणी धर्माला हा फार मोठा धक्का होता. अशोकाच्या राज्यात ब्राह्मणांना राजाचा आश्रय राहिला नाही व त्यांची दुय्यम व दुर्लक्षित म्हणून गणना होऊ लागली. ब्राह्मणांनी राजाश्रय तर गमावलाच; शिवाय त्यांचा उपजीविकेचा धंदाही बंद झाला; कारण दक्षिण घेऊन यज्ञाचे पौरोहित्य करणे हा त्यांचा मूळ पेशा होता व दक्षिणा म्हणून त्यांना फार मोठी रक्कम मिळत असे. ते त्यांचे सर्वात महत्त्वाचे उपजीविकेचे साधन होते. मौर्य साम्राज्य अस्तित्वात होते तितकी १४० वर्षे ब्राह्मण हे दडपलेले व पददलित वर्ग म्हणून जगले. त्यामुळे बौद्ध शासनाविरुद्ध बंड करणे याशिवाय दुसरा कोणताही मार्ग हालअपेष्टा सोसणाऱ्या या ब्राह्मणांना राहिला नाही. पुष्यमित्राने मौर्य घराण्याविरुद्ध बंड केले. पुष्यमित्राचे शुंग हे गोत्र होते. शुंग हे सामवेदी ब्राह्मण होते. शुंगांचा प्राणिमात्रांच्या आहुतींवर सोमयज्ञावर विश्वास होता. सर्व मौर्य साम्राज्यात पशूंची आहुती देण्यावर बंदी होती. त्याविरुद्ध शुंग गोत्री यांचा राग असणे स्वाभाविक होते. त्यामुळे बौद्ध समाज नष्ट करून ब्राह्मणांची अवनती टाळावी हे सामवेदी ब्राह्मण म्हणून पुष्यमित्राचे ध्येय होते यात नवल नाही. बौद्धांच्या राज्यातील ब्राह्मणांच्या होणाऱ्या हालातून ब्राह्मणांना मुक्त करणे, ब्राह्मणी धर्माचे पुनरुज्जीवन करणे हे पुष्यमित्राचे ध्येय होते. सामवेदी ब्राह्मण पुष्यमित्र शुंग हा सम्राट अशोकाचा नातू-बृहदरथ याच्या सैन्यात सेनापती होता. त्याने बौद्ध सम्राट बृहदरथाची कपटाने हत्या केली. पुष्यमित्राने केलेल्या या राजहत्येचा उद्देश हा बौद्ध धर्माचे ‘राजधर्म’ म्हणून असलेले स्थान नष्ट करणे आणि ब्राह्मणांना भारताचे सार्वभौम शासनकर्ते बनवावयाचे हा होता. ब्राह्मणी धर्माच्या मागे राजसत्ता उभी केली तर ब्राह्मणी धर्माला बौद्ध धर्मावर विजय प्राप्त करता येईल हा पुष्यमित्राचा विचार होता.
बौद्ध सम्राट बृहदरथाची कपटाने हत्या करून सत्तेवर येताच पुष्यमित्राने अश्वमेध यज्ञ (घोड्याची आहुती देणे) केला जो केवळ सार्वभौम साम्राटाद्वारा करता येत असे. प्राणिहिंसा न करणे या बौद्ध धर्माच्या तत्वास अनुसरून सम्राट अशोकाने त्याकाळात कायदा करून रक्तमय आहुती देणाऱ्या यज्ञांवर बंदी घातली होती. मात्र पुष्यमित्राने केलेला अश्वमेध यज्ञ ही या प्राणिहत्या संदर्भांत असलेल्या कायदेशीर बंदीवरील ब्राह्मणी धर्माची पहिली प्रतिक्रिया होती. पुढे पुष्यमित्राने सत्तेवर आल्यावर बौद्धांवर व बौद्ध धम्मावर भयानक अत्याचाराची विषारी मोहीम सुरू केली. त्याने बौद्ध भिक्खूंबाबत एक जाहीर आदेश काढला व त्या आदेशानुसार प्रत्येक बौद्ध भिक्खूचे शिर (मुंडके) कापून आणणाऱ्यास सोन्याची १०० नाणी बक्षीस म्हणून देण्यात येईल असे जाहीर केले. अशाप्रकारे पुष्यमित्र शुंग या सामवेदी ब्राह्मण राज्याने बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार रोखून बौद्ध धर्म नष्ट करण्यासाठी एकूणच बौद्ध धर्मियांचा अमानुषपणे छळ केला. तो इतका भयंकर स्वरूपाचा होता की, चिनी अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे अजूनही चीन देशातील बौद्ध लोक पुष्यमित्राच्या नावाचा उच्चार शाप देऊन करतात. पुष्यमित्राने केलेल्या या राजकीय कृत्याचे मूळ उद्दिष्ट हे बौद्ध धर्म नष्ट करून त्याच्या जागी ब्राह्मणी धर्म प्रस्थापित करणे हेच होते. याचा पुरावा म्हणजे मनुस्मृतीला सार्वजनिक जीवनात कायद्याचा दर्जा देण्याची घोषणा केली जाणे हे होय. तेव्हापासून मनुस्मृतीराज या देशात फोफावले. असे असले तरीही बौद्ध धर्म या देशात जवळपास १२०० वर्षे तग धरून बसला होता कारण बौद्ध धर्माने जनमानसाच्या मनावर आपला तात्विक ठसा उमटविला होता. आणि या देशात विषमतावादी ब्राह्मणी धर्माविरुद्ध समतावादी बौद्ध धर्माचा संघर्ष हा अविरतपणे सुरू राहिला तो आजतागायत आपण बघतो आहोत. आज ब्राह्मणी धर्माची जागा हिंदू धर्माने घेतली आहे. त्यापूर्वी तो वैदिक धर्म होता. म्हणजेच वैदिक धर्माचे रूपांतर हे ब्राह्मणी धर्मात झाले व पुढे ब्राह्मणी धर्माचे रूपांतर हे हिंदू धर्मात झाले. हिंदू धर्मियांची समाजरचना ही चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर आधारित आहे. ही चातुर्वर्ण्य व्यवस्था म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशी समाजाची क्रमवार उभी विभागणी ज्यात ब्राह्मण वर्ग हा सर्वात वरचा तर शूद्र वर्ग हा सर्वात खालचा वर्ग गणल्या गेलेला आहे. या चातुर्वर्ण्य व्यवस्थेत मोडणारा समाज म्हणजे सवर्ण (वर्ण व्यवस्थेच्या आतील) वर्ग होय तर या वर्ण व्यवस्थेच्या बाहेर राहिलेला उपेक्षित, शोषित, पीडित बहिष्कृत वर्ग हा अवर्ण वर्गात मोडणारा. बाबासाहेबांनी या देशातील समाज रचनेची परंपरागत (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र) मांडणी जशी च्या तशी न करता तिची अगदी नेमकी मांडणी केली ज्यात त्यांना या देशात प्रामुख्याने दोन समाजवर्ग कार्यरत दिसले. एक, ज्यास सवर्ण म्हटलेले आढळते तर दुसरे अवर्ण होय. सवर्ण समाजात दोन वर्गांचा समावेश राहिलेला आहे. एक ब्राह्मण वर्ग तर दुसरा ब्राह्मणेतर वर्ग. मात्र याहून भिन्न असा, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या अगदीच शोषित, पीडित तसेच टोकाचा अन्यायग्रस्त राहिलेला लोकसमूह जो अस्पृश्य म्हणून हिनविल्या गेला त्या वर्गाची मांडणी बाबासाहेबांनी ‘अवर्ण’ वर्गात केली. एकीकडे स्ववर्गहीत जोपासणारी ब्राह्मणांची चळवळ (Movement of Brahmins) सुरू होती तर दुसरीकडे क्रांतिकारी ज्योतिबा फुल्यांनी जी ‘सत्यशोधक चळवळ’ राबविली ती ‘ब्राह्मणेतर चळवळ’ (Movement of Non-Brahmins) होती जी सुधारणावादी सवर्ण वर्गात मोडणारी होती. तर बाबासाहेबांनी राबविलेली चळवळ ही अग्रक्रमाने ‘अस्पृश्योद्धाराची चळवळ’ (Movement of Untouchables) राहिलेली आहे जी अवर्ण वर्गात मोडणाऱ्या अस्पृश्यांच्या स्वाभिमानाची राहिलेली आहे. तेव्हा त्यास कदापिही ‘ब्राह्मणेतर चळवळीकडून’ हस्तांतरित झालेली चळवळ (ट्रान्सफर ऑफ मूव्हमेंट) असे म्हणता येणार नाही. याऊलट आधुनिक भारतात ‘अस्पृश्यांच्या मुक्तीची चळवळ’ ही दि. १ जानेवारी १८१८ पासून सुरू वीर सिदनाक महाराच्या नेतृत्वात सुरू झाली जी पुढे बाबासाहेबांनी क्रांतीच्या शिखरावर नेऊन ठेवली व रिपब्लिकन चळवळीत तिचे रूपांतरण करून तिला ‘भारत राष्ट्र निर्मितीचे उदात्त ध्येय’ बाळगून अधिक व्यापक केले.
खरे तर, मागील दोन शतकांपूर्वी महाराष्ट्रात मराठेशाहीचा पाडाव करून ‘ब्राह्मणेतरराज’ संपुष्टात आणल्या गेले होते व पेशवाईद्वारे ‘ब्राह्मणराज’ प्रस्थापित करण्यात आले होते ते १८१८ च्या भीमा कोरेगावच्या लढाईने संपुष्टात आणले व ब्रिटिशराज स्थापन करण्याचा मार्ग जरी इंग्रजांना मोकळा झाला होता तरी अस्पृश्यांच्या मानवमुक्तीचा प्रथम लढा प्राणपणाने लढून यशस्वी करण्यात आला. याच मानव मुक्तीच्या लढ्याची सूत्रे बाबासाहेबांनी आपल्या हाती घेतलीत व पुढे एक नवा इतिहास रचला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या एका भाषणात म्हणतात की १९१९ सालापासूनच ते राजकारणात आहेत. म्हणजे अगदीच तरुण वयात त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी चळवळीत स्वतःला झोकून दिले होते. समाजाला शिक्षित करण्यासाठी, त्यांना चेतविण्यासाठी व चेतविलेल्या लोकांना संघटित करण्यासाठी त्यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ नावाच्या संघटनेस २० जुलै १९२४ साली प्रथमतः जन्म दिला व तिचे क्रांतिकारी ब्रीदवाक्य ठेवले ‘शिकवा, चेतवा व संघटित करा’ (Educate, Agitate & Organise). पुढे त्यांनी आपल्या क्रांतीच्या लढ्याची धार अधिकाधिक तेज केली. त्यासाठी आपल्या समाजात स्वाभिमान, तेज व जागृती निर्माण करण्यासाठी आंदोलनेही उभारलीत.
त्यापैकी महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह ही अस्पृश्यांच्या मानवी न्यायहक्क चेतनेची नांदी होती. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी जन्मास घातलेल्या संघटनांपैकी ‘समता सैनिक दल’ हे एक महत्वाचे संघटन राहिलेले आहे. जिच्या स्थापनेविषयी बोलतांना बाबासाहेब त्यांच्या भाषणात म्हणतात कि तिची स्थापना “महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने करण्यात आली.” म्हणजेच महाडच्या चवदार तळ्याचा जो सत्याग्रह करण्यात आला तो प्रामुख्याने या देशातील नागरिकांत ‘समान न्याय’ प्रस्थापित करण्याच्या उदात्त ध्येयाने प्रेरित होता. आम्हीही माणसेच आहोत आणि आम्हालाही इतरांसारखेच माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे हे प्रस्थापित व्यवस्थेला त्या सात्याग्रहातून निक्षून सांगितल्या गेले. याविषयी बाबासाहेब त्यांच्या भाषणात म्हणतात, “ या देशात जे अनेक धर्मीय समाज आहेत त्यात हिंदू समाजात अस्पृश्यांचा समावेश होत असल्यामुळे आणि या हिंदू समाजातील स्पृश्य बांधवांकडून अस्पृश्य मानलेल्या समाज बांधवांवर होणाऱ्या अन्याय, जोर-जुलूम, विषमतेची शिकवण व वागणूक वगैरे अनिष्ट आणि घातुक प्रकारांना आळा बसविण्यासाठी या दलाची प्रामुख्याने स्थापना करण्यात आली. ज्या समाजात माणुसकीने जगता येत नाही, नैसर्गिक हक्कांचा जिथे जिथे समतेने उपभोग घेता येत नाही; ज्या धर्मावर विषमतेचा कीट चढला आहे तो धर्म झुगारून देऊन खरी माणुसकी जाणणारा धर्म निर्माण करण्याकरिता जे कार्य करावे लागत आहे, त्या पवित्र आणि उज्वल कार्यासाठी या दलाची स्थापना झालेली आहे.” यावरून हे अगदीच स्पष्ट आहे कि समता सैनिक दलाचे कार्य हे उदात्त, उज्वल तत्वांचे लढे लढण्याकरिताच राहिलेले आहे. आजघडीला आपण इतरत्र अवलोकन केले तर आपणास समाजाचे जे काही विस्कळीत चित्र दिसते आहे त्याला एक प्रमुख कारण म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत मानवमुक्तीची तत्वे या समाजात अजूनही अपेक्षित प्रमाणात रुजलेली दिसत नाहीत किंबहुना ती तत्वे नेमकी कोणती आहेत, त्या तत्वांचा आपल्या आयुष्याशी काही सबंध आहे का? हेही पुरेसे अनेकांना कळलेले दिसत नाही. त्यांचा पुरेसा प्रचार प्रसार झालेला नाहीे. ही तत्वे त्यांनी मानव मुक्तीसाठी लिहिलेली जगातील सर्वश्रेष्ठ सात तत्वे आहेत जी प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे व त्यांना रुजविण्यासाठी धडपडले पाहिजे.
महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह ही अस्पृश्यांच्या मानवी न्यायहक्क चेतनेची नांदी होती. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी जन्मास घातलेल्या संघटनांपैकी ‘समता सैनिक दल’ हे एक महत्वाचे संघटन राहिलेले आहे. जिच्या स्थापनेविषयी बोलतांना बाबासाहेब त्यांच्या भाषणात म्हणतात कि तिची स्थापना “महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने करण्यात आली.” म्हणजेच महाडच्या चवदार तळ्याचा जो सत्याग्रह करण्यात आला तो प्रामुख्याने या देशातील नागरिकांत ‘समान न्याय’ प्रस्थापित करण्याच्या उदात्त ध्येयाने प्रेरित होता. आम्हीही माणसेच आहोत आणि आम्हालाही इतरांसारखेच माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे हे प्रस्थापित व्यवस्थेला त्या सात्याग्रहातून निक्षून सांगितल्या गेले. याविषयी बाबासाहेब त्यांच्या भाषणात म्हणतात, “ या देशात जे अनेक धर्मीय समाज आहेत त्यात हिंदू समाजात अस्पृश्यांचा समावेश होत असल्यामुळे आणि या हिंदू समाजातील स्पृश्य बांधवांकडून अस्पृश्य मानलेल्या समाज बांधवांवर होणाऱ्या अन्याय, जोर-जुलूम, विषमतेची शिकवण व वागणूक वगैरे अनिष्ट आणि घातुक प्रकारांना आळा बसविण्यासाठी या दलाची प्रामुख्याने स्थापना करण्यात आली. ज्या समाजात माणुसकीने जगता येत नाही, नैसर्गिक हक्कांचा जिथे जिथे समतेने उपभोग घेता येत नाही; ज्या धर्मावर विषमतेचा कीट चढला आहे तो धर्म झुगारून देऊन खरी माणुसकी जाणणारा धर्म निर्माण करण्याकरिता जे कार्य करावे लागत आहे, त्या पवित्र आणि उज्वल कार्यासाठी या दलाची स्थापना झालेली आहे.” यावरून हे अगदीच स्पष्ट आहे कि समता सैनिक दलाचे कार्य हे उदात्त, उज्वल तत्वांचे लढे लढण्याकरिताच राहिलेले आहे.
बाबासाहेबांनी राबविलेल्या एकंदरीत मानवमुक्तीच्या स्वाभिमानी चळवळीची आधारशीला ही तात्विक असल्याने त्या तत्वांना या समाजात रुजविण्याची फार मोठी जबाबदारी जी प्रामुख्याने समता सैनिक दलाच्या खांद्यावर बाबासाहेबांनी सोपविलेली आहे ती पार पाडण्यासाठी समाजातील तरुण वर्गाने पुढाकार घेणे हि काळाची गरजच नव्हे तर आपलीही नैतिक जबाबदारी आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. बाबासाहेब म्हणतात, “समता सैनिक दलाचा सैनिक म्हणजे समाजसेवेसाठी तळहातावर शीर घेऊन लढण्यासाठी सज्ज झालेला निर्भय योद्धाच म्हटला पाहिजे.” सद्यपरिस्थित बाबासाहेबांनी जी मानवमुक्तीची तत्वे आपल्या अनुयायांना या समाजात रुजवायला दिली ती आम्ही प्रामाणिकपणे या देशात रुजविण्यासाठी सैनिकी बाण्याने अविरत संघर्षरत राहिले पाहिजे हे आपण कदापिही विसरता कामा नये. बाबासाहेब समता सैनिक दलाच्या सैनिकांना उद्देशून सांगतात कि, “सैनिक हा शब्द मोठा आहे. आपण खात्रीने बाजारबुणगे नाहीत, हे सिद्ध करणारा हा शब्द आहे. आपले कार्य करीत असतांना तुम्ही सर्वजण प्रत्यक्ष फलटणीतच आहात, हि भावना मनात बाळगली पाहिजे.”
तेव्हा हा सैनिकी बाणा कायम ठेवून आपल्या चळवळीची गौरवशाली वाटचाल सुरू होती. पुढे १९४२ साली ‘स्टेफर्ड क्रिप्स’ भारतात आले तेव्हा भारतातील भावी संविधानिक समस्येच्या समाधानाकरीता त्यांनी क्रिप्स योजना मांडली. क्रिप्स यांच्या योजनेपुढे बाबासाहेबांनी अस्पृश्यांचे प्रश्न मांडले असता बाबासाहेब हे स्वतंत्र मजूर पक्षाचे नेते असल्यामुळे अस्पृश्य वर्गाच्या प्रश्नावर त्यांना आपल्या न्याय्य हक्काच्या मागण्या मांडता येणार नाहीत अशी भूमिका भारतात आलेल्या ‘क्रिप्स मिशनने’ घेतली त्यामुळे भारतातील अस्पृश्य वर्गाच्या लहानमोठ्या एकूणच संघटनांना एकसूत्रात बांधून एकच एक मोठी संघटना (फेडरेशन/महासंघ) करून अस्पृश्य हितासाठी लढणे त्यांना महत्त्वाचे वाटले व पुढे त्याचीच परिणती म्हणजे १९ जुलै १९४२ साली नागपूर येथे भरलेल्या तीन दिवसीय अखिल भारतीय अस्पृश्य वर्गाच्या परिषदेत झालेला आपल्या तत्कालीन नव्या संघटनेचा जन्म म्हणजे ‘अखिल भारतीय श्येड्युल कास्ट्स फेडरेशन’ (SCF) ! याच अधिवेशनात दि. २० जुलै १९४२ ला समता सैनिक दलाला उद्देशून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भाषणात आवर्जूनपणे हे सांगितले आहे कि आपल्या चळवळीच्या ध्येय धोरणाबरोबर समता सैनिक दलाच्या ध्येय धोरणातही बदल झालेला आहे आणि त्यात ते राजकीय समतेसाठी स्वतंत्र राजकीय हक्कांची आवश्यकता प्रतिपादित करतात. या पक्षाने अस्पृश्योद्धाराच्या ऐतिहासिक चळवळीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे. भारताच्या भावी राज्यघटनेचा आराखडाही याच संघटनेच्या वतीने सर्वप्रथम बाबासाहेबांनी देशापुढे मांडला होता.
पुढे देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची राज्यघटना लिहिण्याची महत्वाची जबाबदारी बाबासाहेबांनी निःपक्षपातीपणे आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर पार पाडली व हा देश २६ जानेवारी १९५० पासून ‘सार्वभौम लोकशाही गणराज्य’ झाला. आता या गणतांत्रिक देशात सत्तारूढ पक्षास लगाम घालणारा प्रबळ विरोधी पक्ष निर्माण करण्यासाठी, आपला अस्पृश्य वर्गाचा पक्ष शेकाफे (SCF) हा बरखास्त करून सर्वसमावेशक, व्यापक असा नवा पक्ष निर्माण करण्याची आत्यंतिक गरज बाबासाहेबांना वाटू लागली. तेव्हा मानलेल्या अस्पृश्य जाती, वन्य जमाती व इतर मागासलेला समाज हे समान अंतकरणाचे घटक असल्याने त्यांच्या परिषदा १९५७ च्या सार्वत्रीक निवडणुकापुर्वी व तदनंतरही घ्याव्यात, असा आदेशही शेकाफे (SCF) च्या कार्यकारीणीने दि. ३० सप्टेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सभेत पारित केला व या परिषदेद्वारा नवा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष (RPI) काढण्याचे कार्य करण्यात येईल असे स्पष्ट केले.
येथूनच पुढे रिपब्लिकन पार्टीच्या जन्माचा इतिहास सुरू झाला. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टीसाठी लिहिलेली जगातील सर्वश्रेष्ठ अशी सात मानवमुक्तीची तत्वे घटनेत अंतर्भूत केल्या गेलीत. पुढे धर्मांतर करण्यापूर्वी वार्ताहरांना दिलेल्या मुलाखतीत दि.१३ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या नव्या पक्षाच्या एकूणच भूमिकेबाबत बाबासाहेबांनी आपले विचार मांडले. त्यात त्यांनी रिपब्लिकन पक्षाची घटनाही लिहिल्याचे स्पष्ट केले. त्या घटनेत पक्षाची तत्वे, धोरण व कार्यक्रम अंतर्भूत केलेली आहेत. हाच आपल्या चळवळीचा राजमार्ग आहे. पुढे धर्मांतरानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांचे महापरिनिर्वाण झाले. मात्र तत्पूर्वी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धर्मांतर करून ‘प्रबुद्ध भारत’ निर्मितीच्या संकल्पाचे पहिले पाऊस टाकले व आपली पूर्वाश्रमीची ‘अस्पृश्यांची चळवळ’ आता ‘रिपब्लिकन चळवळीत’ रूपांतरित करून आपल्या अनुयायांना दिली हे आपण विशेषकरून लक्षात घेतले पाहिजे. या रिपब्लिकन चळवळीच्या महत्वपूर्ण अशा एकूण तीन संघटना आहेत. पहिली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दुसरी ‘समता सैनिक दल’ व तिसरी ‘भारतीय बौद्ध महासभा.’ यापैकी ‘समता सैनिक दल’ हे आपल्या रिपब्लिकन पार्टीसोबत संलग्नित असावयास हवे अशी मांडणी बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पूर्व संघटनेची संरचना व त्यांच्या भाषणातून स्पष्ट होते ज्यात ते म्हणतात, “राजकीय पक्षास एक सहकारी दलही असले पाहिजे.”
बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची नाळ आपल्या राजकीय पक्षाशी जोडलेली आहे ही बाब स्वतःला आंबेडकरांचे अनुयायी म्हणविणाऱ्या बहुतांशी लोकांना आजघडीलाही न पचणारी दिसते हे अनाकलनीय आहे. आजघडीला आपणास समाजाचे जे काही विस्कळीत चित्र दिसते आहे त्याला एक प्रमुख कारण म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत मानवमुक्तीची तत्वे या समाजात अजूनही अपेक्षित प्रमाणात रुजलेली दिसत नाहीत किंबहुना ती तत्वे नेमकी कोणती आहेत, त्या तत्वांचा आपल्या आयुष्याशी काही सबंध आहे का? हेही पुरेसे कळलेले दिसत नाहीये. त्यांचा पुरेसा प्रचार प्रसार झालेला नाहीे. ही तत्वे त्यांनी मानव मुक्तीसाठी लिहिलेली जगातील सर्वश्रेष्ठ सात तत्वे आहेत जी प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे व त्यांना रुजविण्यासाठी धडपडले पाहिजे. या कार्यासाठी समता सैनिक दलाचे अनन्यसाधारण महत्व महत्व आहे. अखिल भारतीय दलित फेडरेशनच्या (SCF) अधिवेशनास लागूनच अखिल भारतीय समता सैनिक दलाचे (SSD) दुसरे अधिवेशन दि. ३० जानेवारी १९४४ ला झाले. त्या अधिवेशनातील भाषणात बाबासाहेबांनी जे सांगितले आहे ते आम्ही विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवे ज्यात ते म्हणतात, “स्वयंसेवकांच्या संघटनेच्या (SSD) आवश्यकतेवर माझा पूर्णतः विश्वास आहे. हि संघटना चालू ठेवावी एवढेच नव्हे तर प्रत्येक प्रांतात तिच्या शाखा उघडाव्या व दलित वर्गातील प्रत्येक तरुण तिचा सभासद होईपर्यंत तिचा विस्तार करण्यात आला पाहिजे.” यावरून समता सैनिक दलाची अत्यावश्यकता आपल्या लक्षात येते. आपल्या रिपब्लिकन चळवळीचा समता सैनिक दल हा कणा होय. असे असतांनाही समाजातील स्वताला विद्वान समजणारे काही महापंडित अलिप्ततावाद स्वीकारून समाजाची दिशाभूल करण्यात अग्रेसर आहेत आणि चळवळीची दिवसागणिक उद्ध्वस्थावस्था करण्याकडेच यांचा कल आहे तेव्हा समाजबांधवांनी वेळीच सावध होऊन आपल्या चळवळीची योग्य दिशा समजून घेऊन त्याच दिशेने मार्गक्रमण करणे हितावह होईल. समाज प्रबोधन करणाऱ्या विद्वानांनी दलाकडे बघण्याची दृष्टी बदलवून बौद्धिकदृष्ट्या सक्षम वैचारिक लढवय्ये तयार करण्याच्या उदात्त कार्यात पुढाकार घ्यायला हवा. कारण आपले युद्ध आता वैचारिक आहे. समाजविघातक विचारसरणी आपले तोंड वर काढू इच्छित आहे तेव्हा रिपब्लिकन पार्टीची तत्वे अधिकाधिक भक्कमपणे या देशात रुजविण्यासाठी सामाजिक आणि राजकीय लढा मजबूत करणे गरजेचे आहे. आम्ही राजकीय दृष्ट्या कमजोर दिसतो आहे त्याला प्रमुख कारण म्हणजे समता सैनिक दलाची झालेली उपेक्षाच होय असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही राजकीयदृष्ट्या शक्तिशाली असण्यासाठी जो हुकुमवजा आदेश दिला आहे तो आम्ही पक्का ध्यानात ठेवला पाहिजे. ज्यात ते म्हणतात, “समता सैनिक दल हे आपल्या राजकीय पार्टीचे सामर्थ्य आहे. लढणाऱ्या सैनिकांशिवाय कोणतीही पार्टी सामर्थ्यवान होणार नाही. आपल्याला तर मोठमोठ्या संस्थांशी टक्कर द्यावयाची आहे. म्हणून समता सैनिक दल वाढविणे हे प्रत्येक पुढाऱ्याचे कर्तव्य आहे.” तेव्हा आपापल्या जबाबदाऱ्या ओळखून प्रत्येकाने रिपब्लिकन चळवळीशी इमाने इतबारे कार्यरत असले पाहिजे. समता सैनिक दलात तरुणांनी अधिकाधिक संख्येने भाग घेऊन शिस्त, संघटना आणि स्वार्थत्याग हा बाणा अंगिकारला पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीच्या जीवावर आता समाज परिवर्तनाची स्वप्ने पाहणे म्हणजे स्वतःच स्वत:ची गुलामगिरीकडे वाटचाल करवून घेणे होय.
बाबासाहेब सांगतात त्याप्रमाणे कोणी एकटा माणूस समाज परिवर्तन करू शकणार नाही तेव्हा समाज परिवर्तनाच्या लढाईत प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे व मरणाच्या तयारीनेच आता आपण समरांगणात उतरलो पाहिजे. याशिवाय दुसरा अन्य कोणताही मार्ग आपणापुढे नाही. समता सैनिक दलाची बांधणी करतांना तिच्या घटनेची पूर्ण जाण ठेवून तिच्या अंमलबजावणीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असलो पाहिजे. रिपब्लिकन पार्टी च्या उभारणीसाठी प्राणप्रणाने लढण्यासाठी तळहातावर शीर घेऊन निर्भय योद्ध्याची भूमिका बजावण्याची वेळ आता आलेली आहे. समता सैनिक दलाचे कार्यकर्ते-सैनिक या उदात्त कार्यात कुठेही कमी पडणार नाहीत या दुर्दम्य आशावादासहित रिपब्लिकन चळवळीच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी सज्ज होऊ या.

_____Prashik Anand

www.joinrpi.org

About republicantimes.in

Check Also

धम्मावरती बोलू काही (४)

मागील भागाहून पुढे____ आलारकालाम हा ध्यानमार्गा अंतर्गत येणाऱ्या तिन्ही प्रकारच्या पंथात/शिक्षण पद्धतीत प्रभुत्वसंपन्न (अधिकारिता संपन्न/master) ...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: