💧 पाणी:- पूर समस्या ⛈🌧
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना विश्वास होता की, पाण्याचा बहुउद्देशीय उपयोग केला तर खूप फायदा होईल. दामोदर प्रकल्प हा एक बहुपयोगी प्रकल्प आहे. पुराच्या समस्येपासून त्यामुळे सुटका होईल. तसेच सिंचन, वीज आणि जलवाहतुकीसाठी फायदा होईल. दामोदर नदी खोरे प्रकल्प हा पहिला प्रकल्प होता. दामोदर प्रकल्पाप्रमाणेच सोन नदी प्रकल्पसुध्दा बहुउद्देशीय होता. ते म्हणाले, अमेरिकेप्रमाणे ओरिसाने पाण्याच्या साठवणुकीबाबत काहीतरी ठोस उपक्रम राबवावा. अशाप्रकारे पाण्याच्या साठवणुकीचा सिंचन व वीज प्रकल्पात उपयोग होईल. परंतु अंतर्गत नेव्हीगेशनसाठी सुध्दा होतो. खोऱ्यातील पाण्याचे एकात्मिक आणि सर्वंकष नियोजन व्हावे आणि विकासाचा एकात्मिक विचार होऊन त्यावर अंमल व्हावा अशी कार्यपद्धती दामोदर खोरे प्राधिकरण स्थापन करून बाबासाहेबांनी या देशात सुरूवात केली होती.
सर्व पातळ्यांवर डाॅ.बाबासाहेबांच्या नेतृत्वामुळे दामोदर खोरे प्रकल्पाला चांगली गती मिळाली होती. कारण दामोदर खोरे योजनेच्या संदर्भात पहिल्या तीन परिषदांमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते, त्यांनी या परिषदांमध्ये मार्गदर्शन केले आणि सक्रिय पुढाकार घेतला होता.
ओरिसा राज्यात सतत पुरामुळे मोठ्या प्रमाणावर प्राणहानी, वित्तहानी होत होती. सन १९२८ ते १९४२ च्या दरम्यान या प्रश्नांवर उपाय सुचविण्यासाठी अनेक समित्या नेमण्यात आल्या होत्या. या सर्व समित्यांनी वेळोवेळी जे अहवाल शासनास दिले होते, त्यापैकी एकही अहवाल डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना योग्य आढळून आला नव्हता. त्यांच्या मते हे सर्व अहवाल एकांगी स्वरूपाचे होते. एकही अहवाल बहुआयामी स्वरूपाचा नव्हता. दि.८ नोव्हेंबर १९४५ रोजी कटक येथे यासंबंधी मार्गदर्शन करताना बाबासाहेबांनी आपले अत्यंत मौलिक विचार देशाला दिले. त्यांच्या मते पाणी आणि महापूर हे विनाशकारक आहेत, असे गृहीत धरून उपायधोरण सुचवू नका. देशात एवढे जास्त पाणी उपलब्ध नाही, की जे हानिकारक ठरू शकेल. “भारतीय जनेतस पाण्याच्या कमतरतेमुळे जास्त कष्ट सोसावे लागतात, जास्त पाण्याच्या उपलब्धतेमुळे नव्हे.” पाणी राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे आणि पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण असमतोल आणि अविश्वासार्ह असल्यामुळे पुराच्या जास्त पाण्याविषयी तक्रार करण्यापेक्षा या पुराच्या पाण्याचा मनुष्याच्या विकासासाठी धरणे बांधून कसा वापर करता येईल, हा दृष्टिकोन बाळगला पाहिजे. आणि त्यासाठी जिथे पुरामुळे नेहमी नुकसान होत असते, त्या नद्यांवर ठिकठिकाणी धरणे बांधून हे पाणी समुद्राला जाऊ न देता विकासासाठी वापरणेच इष्ट ठरेल.
डाॅ.बाबासाहेबांनी म्हटले होते की, फक्त पूरनियंत्रणासाठी नदीवर धरण बांधणे हेच उद्दिष्ट असावे काय? बहुउद्देशीय खोरे प्रकल्पाचा विचार करावा की ज्यामुळे विद्युतनिर्मिती होईल, जलसिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल, त्याचप्रमाणे नौकानयनाच्या सुविधा उपलब्ध होतील. पाण्याच्या बहुउद्देशीय वापरामुळे त्याच्या संभाव्य वाईट परिणामांचे रूपांतर चांगल्या शक्तीमध्ये होते यावर डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वास होता.
डाॅ.बाबासाहेबांनी कलकत्ता येथील पहिल्या अधिवेशनात (जानेवारी १९४४) केलेले विधान ज्या विधानाचा प्रत्यय आजही आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळतोय, “जलसंपत्तीच्या विकासासाठी संपूर्ण भारतात सकारात्मक धोरणाचा अभाव दिसतो, अशा प्रकारचे विधान केल्यास अतिशयोक्ती होणार नाही.”
आजघडीला या देशातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर/समाधान/निराकरण डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांत [लेखन, भाषण व इतर ग्रंथसंपदेत] आहे, गरज आहे ती फक्त अंमलबजावणीची !