🎓 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आद्य चरित्रकार तानाजी बाळाजी खरावतेकर 📓✒
(१९४६ साली कराची येथून प्रसिध्द झालेले पहिले चरित्र)
-इंजी. सुरज तळवटकर….
तानाजी बाळाजी खरावतेकर हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील खरवते या गावचे. त्यांचे बालपण व शिक्षण कराची येथेच झाले. मराठा जनरल एज्युकेशन सोसायटीच्या मराठी हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाल्यानंतर उच्च शिक्षणाकरिता त्यांनी दयाराम जेठमल सिंध काॅलेजात प्रवेश घेतला. १९४५ साली इतिहास हा विषय घेऊन मुंबई विद्यापीठाची बी.ए पदवी संपादन केली. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनंतरचे कोकणातील ते पहिले पदवीधर. पुढे एल.एल.बी. करिता त्यांनी अभ्यास सुरू केला. खरावतेकर हे धडपडे तरुण होते. त्या काळी कराची येथे ‘सिंध मराठा’ व ‘रविकिरण’ ही साप्ताहिके दर रविवारी प्रसिध्द होत. महाराष्ट्रातीलही मासिके कराची मध्ये उपलब्ध होती. खरावतेकर हे चौकस, व्यासंगी विद्यार्थी होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सामाजिक चळवळीचे त्यांना भान होते. विद्यार्थीदशेत त्यांनी कथा, लेख लिहिल्याचा उल्लेख त्यांच्या पत्रात आढळतो. परंतु त्यांचे साहित्य आज उपलब्ध नाही. १९४७ च्या फाळणीत त्यांची वैयक्तिक कागदपत्रे नष्ट झाली. तत्कालीन मराठी नियतकालिकांच्या संशोधनातून कराचीत त्यांच्या लिखानाविषयी माहिती मिळू शकेल.
६ मे १९४५ रोजी मुंबईत आॅल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे तिसरे अधिवेशन भरले होते. त्या अंतर्गत विद्यार्थी परिषद घेण्यात आली होती. या परिषदेत कराची येथील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून खरावतेकर यांनी प्रतिनिधित्व केले होते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ‘राजगृह’ येथील ‘डाॅ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर’ मधील जुनी कागदपत्रे पाहताना खरावतेकर यांनी कराचीहून दि. २१-५-१९४३ रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना दिल्ली येथे पाठविलेले पत्र मिळाले. त्यावेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व्हाइसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य होते. रिसर्च सेंटरचे मानद संचालक आ.जी.रुके यांच्याकडून त्या ऐतिहासिक पत्राची झेराॅक्स प्रत मिळाली. सदर पत्र या पुस्तकासोबत छापण्यात आले आहे. १९४३ साली खरावतेकर अवघे २२ वर्षाचे विद्यार्थी होते. पत्रातील मजकूर वाचल्यानंतर, तत्कालीन अस्पृश्य तरुण डाॅ.बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाने, नेतृत्वाने कसे भारावले होते याचे दर्शन घडते. त्यामुळेच खरावतेकर यांच्या सारखे तरूण कोणताही संकोच न करता, निर्भयपणे डाॅ.बाबासाहेबांना पत्र लिहिण्याचे धाडस करु शकले. त्या पत्रात, खरावतेकर मुंबई विद्यापीठाच्या इंटर आर्टस् परीक्षेस बसले असून उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणार असे आत्मविश्वासपूर्वक लिहितात. पत्रात आपण, महाराष्ट्रातील लढवय्या महार जमाती पैकी असल्याचा उल्लेख स्वाभिमानपूर्वक करतात.
१९२७ साली महाड येथील ‘कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदे’त सामाजिक समतेची मुहूर्तमेढ रोवण्याकरिता चवदार तळे सत्याग्रहाने जो ‘संगर’ उभा केला, त्या प्रारंभीच्या भाषणात, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या वैभवशाली लष्करी परंपरेचा आढावा घेऊन अस्पृश्य हे निपित्तर नाहीत तर लढाऊ जमात आहे याची सर्वांना जाणीव करुन दिली. या क्रांतिकारक विचारांतून अस्पृश्यांच्या मानसिकतेत परिवर्तन होऊ लागले व त्यांना आत्मभान आले. त्याचा प्रत्यय खरावतेकरांच्या पत्रात जाणवतो. खरावतेकर हे डाॅ.बाबासाहेबांना या पत्रात सल्ला विचारतात – ‘मिलिटरी कमिशन स्वीकारू की शिक्षण घेऊ?’ या पेचात खरावतेकर सापडलेले असतात.
महाडच्या परिषदेत व आपल्या अनेक भाषणातून व बहिष्कृत हितकारिणी सभेच्या स्थापनेपासून, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सातत्याने सांगत आले. खरावतेकर यांनी वयाच्या २२ व्या वर्षी लिहिलेल्या सदर पत्राची डाॅ.बाबासाहेबांनी दखल घेतली आणि त्या पत्रावर “Tell him to take education and not bother about commissions, etc.” हा अत्यंत मौलिक असा संदेश दिला. तो केवळ खरावतेकरांपुरताच मर्यादित नव्हता तर सर्वच तरूणांना पथदर्शक होता. खरावतेकर बी.ए. नंतर एल.एल.बी चा अभ्यास करीत असतानाच त्यांना एका असाध्य अाजाराने गाठले. उपचार चालू असताना विश्रांती करिता मिरज येथे गेले. त्यानंतर त्यांना मुंबई येथे के.ई.एम. रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वयाच्या २६ व्या वर्षी ऐन तारूण्यात दि. ५-९-१९४६ रोजी त्यांचे निधन झाले. खरावतेकर हे अभ्यासू, बुध्दिमान, सामाजिक जाण असलेले, उदयोन्मुख नेतृत्व होते.
डाॅक्टर आंबेडकर हे तानाजी बाळाजी खरावतेकर, बी.ए. यांनी लिहिलेले संक्षिप्त चरित्र दिनांक २९-३-१९४६ रोजी कराची येथून प्रकाशित झाले. हे चरित्र लेखन १९४३ सालीच पूर्ण झाले होते. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, कागद टंचाईमुळे चरित्र प्रकाशनात अनेक अडचणी आल्या. खरावतेकर यांचे चाहते रविकिरण प्रेसचे व्यवस्थापक व्यंकटराव ठाकूर यांना कागद परवाना मिळाला व त्यांनी तत्परतेने १९४६ मध्ये चरित्र छापले. त्यावेळी चरित्र लेखक आजारी पडले व त्यांना विश्रांतीसाठी मिरजेस जावे लागले. यांच्या अनुपस्थितीत, त्यांचे गुरूवर्य काकासाहेब नानल यांनी मुद्रिते तपासण्याची जबाबदारी स्वीकारून चरित्र प्रकाशनास सहाय्य केले.
डाॅ.बाबासाहेब यांच्या वाढदिवशी चरित्र प्रकाशित व्हावे, अशी चरित्र लेखकाची इच्छा होती. त्यामुळे मूळ हस्तलिखितातील निम्म्यापेक्षा अधिक मजकूर गाळावा लागला व संक्षिप्त स्वरूपात चरित्र प्रकाशित करावे लागले. १९४६ पूर्वीचा कालखंड हा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जीवनातील वादळी, संघर्षमय प्रवास होता. लेखकाने डाॅ.बाबासाहेबांचे बालपण, शिक्षण व सार्वजनिक जीवनातील महत्त्वाचे टप्पे यांचे अत्यंत समर्पक दर्शन घडविले. सुभेदार रामजी यांनी आपल्या मुलाला उच्च शिक्षण देण्याची इच्छा, गुरूवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांची मध्यस्थी व श्रीमंत सरकार सर सयाजीराव गायकवाड यांनी विद्यार्थी आंबेडकर यांची घेतलेली मुलाखत, परदेशी उच्च शिक्षणातील दैदीप्यमान प्रगती, स्वभाव, ग्रंथलेखन, सार्वजनिक कामगिरी यातून प्रकट होणारे डाॅ.बाबासाहेबांचे विविधांगी संपन्न व्यक्तीमत्व याचा चरित्र लेखकाने थोडक्यात पण मार्मिकपणे मागोवा घेतला आहे.
समकालीन विद्वान व ग्रंथप्रेमी श्रीपाद आबाजी ठाकूर, रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक, डाॅ.श्रीधर भांडारकर, न्यायमूर्ती काशिनाथ तेलंग, बॅरि.मुकुंदराव जयकर, पं.जवाहरलाल नेहरू यांच्या ग्रंथसंग्रहाचा उल्लेख करुन प्रतिकूल परिस्थितीही डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले ग्रंथप्रेम कसे जतन केले हे दाखवून दिले अाहे. महाडचे स्वातंत्र्य युध्द, सायमन कमिशन, गोलमेज परिषद, पुणे करार, १९३५ चा भारत सरकारचा कायदा, सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स योजना आदी संदर्भात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेचे वर्णन लेखकाने केले आहे. म.गांधी, बॅरि.जीना, राजगोपालाचारी, सर तेजबहाद्दूर सप्रू, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वगुणाचा आढावा घेऊन डाॅ.बाबासाहेबांचे गुणविशेष नमूद केले आहेत. हे चरित्र वाचताना, तरुण चरित्र लेखकाचा भारतीय सामाजिक वराजकीय घडामोडीचा सापेक्ष अभ्यास, व्यासंग व जिज्ञासूवृत्ती याचा प्रत्यय येतो व ते एक उदयोन्मुख बुद्धिमंत असल्याची जाणीव होते.
‘डाॅक्टर आंबेडकर’ हे चरित्र प्रकाशित होण्यापूर्वी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. अनेक विशेषांक ही निघाले. परंतु १९४६ पूर्वी डाॅ.बाबासाहेबांवर चरित्र लिहिल्याचा संदर्भ सापडत नाही. चांगदेव खैरमोडे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र खंड प्रकाशित करण्याची महत्त्वपूर्ण योजना आखली व १९५२ साली “स्वतंत्र भारताचे घटनाकार डाॅ.भीमराव रामजी आंबेडकर – खंड पहिला” प्रकाशित केला. खैरमोडे यांनी प्रथमच अतिशय परिश्रम घेऊन ‘चरित्रे साधने’ गोळा केली. व चरित्र खंड प्रकाशित केले. त्यांची ही आंबेडकर चरित्र लेखनातील कामगिरी ऐतिहासिक आहे. डाॅ.धनंजय कीर यांचा “Dr.Ambedkar: Life and Mission” हा चरित्र खंड १९५४ साली प्रकाशित झाला. हा ही डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांवरील चरित्र लेखनातील महत्वाचा टप्पा आहे.
आतापर्यंत डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांवर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चरित्र लेखन झाले आहे. आज आंबेडकर हे विश्वचिंतनाचा विषय झाले आहेत. भारत व परदेशातील विश्वविद्यालयात या विषयावर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. त्यांच्या चळवळीची चिकित्सा करणारे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. सद्यस्थितीचा संदर्भ देऊन विचारमंथन सुरु आहे. सुरूवातीच्या काळात झालेले व आजचे चरित्र लेखन यांत पुष्कळ अंतर आहे. अजूनही आपण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या Intellectual Biography च्या प्रतिक्षेत आहोत. चरित्र लेखनाचा मागोवा घेताना खरावतेकर लिखित ‘डाॅ.आंबेडकर’ हे १९४६ साली प्रसिध्द झालेले संक्षिप्त चरित्र महत्वाचे वाटते. तो आंबेडकरी चरित्रलेखनाचा प्रारंभबिंदू आहे आणि तानाजी बाळाजी खरावतेकर हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आद्य चरित्रकार आहेत.
सूचना:- ‘डाॅक्टर आंबेडकर’ हे चरित्र १९४६ च्या आवृत्तीप्रमाणे पुनर्प्रकाशित केले आहे. मूळ पुस्तकातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे कृष्णधवल छायाचित्र या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर रंगीत स्वरूपात छापले आहे.