‘संकीर्ण समालोचन‘ या सदराखाली प्रसिद्ध झालेल्या ‘ज्याचा त्याचा महारावर कटाक्ष‘ या आपल्या एका लेखात बाबासाहेब म्हणतात की, “काय असेल ते असो महार जात सर्वांच्या डोळ्यांत सलते. पेशवाईत अस्पृश्यता फार कडक होती. पण तिचा धग जितका महारांना लागला तितका कोणत्याही अस्पृश्य जातीला लागलेला नाही.”
पुढे बाबासाहेब म्हणतात, *”महारांना स्पृश्य हिंदूंनी उपद्रव दिला तेवढा अस्पृश्यांतील इतर जातींना कधीच दिला नाही. हिंदुंचा महारांवर एवढा कटाक्ष का याचे काही कारण उमगत नाही. पण उभयतांमधले हाडवैर अगदी पूरातन आहे हे निखालस खरे आहे. याचे कारण महार जात चळवळी आहे हे असू शकेल.* इंग्रज सरकारने राज्य झाल्यापासून तर महारांनी आपली चळवळ नेटाने सुरू केली. *अस्पृश्य उन्नतीचे भांडण भांडण्याचे कंकण तिने आपल्या हाती बांधले.* पुण्याला १८८६ साली काँग्रेस भरली असतांना हिंदु धर्माचा पुतळा उभा करून जाळला महारांनी ! अस्पृश्यांना गुलामगिरीत ठेऊन स्वराज्य मागण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे असा रोकडा सवाल याच काँग्रेसच्या अधिवेशनात विचारण्यास उभे राहिले ते महारच होते. यामुळे सनातनी हिंदुच्या विरोधाला राजकारणी हिंदुच्या विरोधाचीही जोड मिळाली. गांधींनी अस्पृश्योन्नतीची चळवळ हाती घेतल्यावर तरी महारांना हिंदु लोक जवळ करतील असे वाटले होते. परंतु ती आशासुद्धा निष्फळ झाली. गांधीने स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघाचे प्रणेते ठक्कर बाप्पा (ठक बापा नव्हे) यांनी मुंबई इलाख्यातील बॅकवर्ड क्लास बोर्डातर्फे तक्रार केली आहे की सरकारी सवलतीचा सर्व फायदा महारच घेतात तरी त्याला आळा घालण्यात यावा. खरा प्रकार काय आहे तो चौकशीअंती कळेलच. *पण महारांबद्दल हिंदुच्या पोटात किती विष आहे हे यावरुन स्पष्ट होते.”*
म्हणजे एकंदरीत स्पृश्य हिंदुच्या मनात महार लोकसमूहाबाबत किती तीव्र द्वेषभावनेचे विष भरलेले असायचे याचा त्यातून आपणांस प्रत्यय येतो. मात्र याहीपुढे आपल्या असे लक्षात येईल की नुसतेच स्पृश्य हिंदु हे महार लोकसमूहाचा द्वेष करीत असत असे नसून त्यात चांभार मांग जातींचा लोकसमूहदेखील कदापिही मागे नव्हता हे परखडपणे मांडतांना बाबासाहेब पुढे म्हणतात,
*”मागे आतापर्यंत निदान हिंदुच महारांचा द्वेष करीत. त्यांच्या रांगेत चांभार मांग शिरलेले दिसतात. त्यांनीही महारांचा द्वेष करण्याचे कार्य आरंभिलेले दिसते. नव्हे महारांचा द्वेष करण्यापलिकडे दुसरे काहीच त्यांच्या हातून होत असलेले दिसत नाही. चांभार मांगाची महारांविरुद्ध उठावणी हिंदु लोकांनीच केलेली आहे असा आम्हांस विश्वास वाटतो. पण महारांविरुद्ध उठलेल्या चांभार मांगांना आम्हाला इतकेच सांगावयाचे आहे की ज्या काही सवलती मिळाल्या आहेत त्या महारांच्या श्रमामुळे आणि चळवळीमुळे मिळाल्या आहेत. आणि महारांवर आरोप करावयाचे असतील तर जे खरे असतील असेच आरोप करावेत. भलते सलते वायफळ बोलू नये. हल्ली हे सत्र महारांविरुद्ध सर्वत्र चालू आहे.”*
बाबासाहेबांच्या वरील विधानांची प्रासंगिकता किती योग्य होती हे आजही *हिंदुहृदयसम्राट कांशीराम यांच्या, पूर्वाश्रमीच्या वीर महार लोकसमूहाने धर्मांतर करून बौद्ध ही ओळख धारण केल्यावरही त्यांना हेतुपुरस्सर हिनविण्यासाठी मरेपर्यंत त्यांच्याद्वारे करण्यात येणाऱ्या ‘महार-महार’ या शब्दोच्चारातून केलेल्या नीच कृत्यातून आपल्या निदर्शनास आल्यावाचून राहणार नाही.*
दि.११/०७/२०१८
चळवळीची उपराजधानी, चंद्रपूरहून
(टीप : पूर्वाश्रमीच्या वीर महार लोकसमूहाने धर्मांतर करून नंतरच्या काळात (१९५६) स्वाभिमानी बौद्ध ओळख स्वीकारल्याचा गौरवशाली इतिहास आहे.)