🎓📚📖✒ एकला चलो रे! 🔥
काय वाटले असेल त्या तडफदार आणि महत्वाकांक्षी तरुणाला! त्या स्वाभिमानी आणि कर्तबगार तरुणाच्या अपमानाची आपल्याला कल्पना तरी करता येईल का? काय वाटले असेल हिंदुसमाजाविषयी त्यांना? या जखमा आपण कशाने भरून काढू शकू? उच्च शिक्षण घेतलेला हा तरुण, आयुष्यामध्ये नुकतेच पदार्पण करीत होता. प्रत्येक पावलागणिक हिंदू समाज त्याला जाणीव देत होता की, “अरे ए तू कितीही विद्या मिळवलीस तरी तू हिंदू समाजातील अस्पृश्य आहेस. तुझे स्थान दिवाणखान्यात नाही, तर दाराबाहेरच्या पायपुसण्याजवळ आहे!” अरे अशा रीतीने आपणास पायदळी तुडविणाऱ्या धर्माबद्दल आणि समाजाबद्दल प्रेम, आदर आणि जिव्हाळा डाॅक्टरसाहेबांना वाटत नसला तर त्यांना दोष द्यावयास आपल्याला तोंड आहे का?
डाॅक्टर आंबेडकरांची खात्री होऊन चुकली की, या देशात स्वाभिमानाने आपल्याला पोट भरणे महाकठीण आहे. म्हणून वकिलीच्या स्वतंत्र धंद्यामध्ये पोट भरण्याचा यत्न करुन पाहावा, असे त्यांना वाटले. ते विलायतेस गेले आणि बॅरिस्टरची परिक्षा देऊन परत आले. ते परळला अस्पृश्यवस्तीमध्ये सिमेंटच्या चाळीतील तळमजल्यावरील एका खोलीत आपले बॅरिस्टरचे आॅफिस उघडून बसले. आता काम कोण देणार? याच चिंतेमध्ये या बाणेदार जवानाने आपल्या आयुष्यास प्रारंभ केला. आॅफिसचा थाट म्हणजे एक स्टूलवजा छोटेसे टेबल; बिनहाताची खुर्ची व एक गवताची चटई! या अफाट जगात विनाआधार आपले नशीब काढायला निघालेला हा मुसाफिर!
‘एकला चलो रे’ हे कविवर्य टागोरांचे काव्य डाॅ.बाबासाहेबांसारख्या महान व्यक्तींच्या जीवनातील अग्निदिव्याला अनुलक्षून तर लिहिलेले नसेल ना? पुष्कळ वर्षे वाट पाहिल्यावर डाॅ.आंबेडकरांना थोडे थोडे काम मिळू लागले. त्यांच्या समाजाचे काम मिळत असे, परंतु ते केवळ समाजसेवेचे काम. त्यात पैसे कितीसे मिळणार? बॅरिस्टरांच्याकडे काम नेहमी साॅलिसिटरांच्या मार्फत जात असे. साॅलिस्टरांमध्ये गुजराथी आणि पारशी यांची संख्या मोठी असे. त्या मानाने दक्षिणी फार थोडे असत. एक दोन अपवाद सोडले तर हे साॅलिसिटर्स डाॅ.आंबेडकरांकडे काम पाठवीनात. इकतेच नाही तर सुरूवातीला डाॅ.आंबेडकरांना काम मिळू द्यावयाचे नाही, असा पद्धतशीर कट एकदा त्यांच्या चाहत्याने उघडकीस आणला.
नवयुग, आंबेडकर विशेषांक, १९४७