📰 पत्रकार:- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ✒
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे
संकलन: इंजी. सुरज तळवटकर.
कालक्रमानुसार डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्रांची मांडणी पुढीलप्रमाणे करता येईल.
१) मूकनायक ३१ जानेवारी १९२० ते २३ आॅक्टोबर १९२०
२) बहिष्कृत भारत ३ एप्रिल १९२७ ते १५ नोव्हेंबर १९२९
३) समता २९ जून १९२८ ते १५ मार्च १९२९
४) जनता २४ नोव्हेंबर १९३० ते २८ जानेवारी १९५६
५) प्रबुध्द भारत ४ फेब्रुवारी १९५६ ते १० डिसेंबर १९५६
‘बहिष्कृत भारत’ हे पाक्षिक बाबासाहेबांनी मुंबई येथे महाड क्रांतीदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरु केले होते. २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्याने क्रांतीचा पेट घेतला होता. सार्वजनिक चवदार तळ्यावर अस्पृश्यांनी पाणी पिण्याचे केवळ निमित्त झाले होते. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या वतीने घेतलेल्या ‘कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या’ दि.१९ व २० मार्च १९२७ च्या अधिवेशनात अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी विविध ठराव पास केले गेले होते. २० तारखेस अधिवेशन संपल्यावर दुपारी अस्पृश्यांच्या हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी महाड येतो चवदार तळ्यावर पाणी पिण्याचा एक ठराव विशेषत्वाने मांडला होता आणि अस्पृश्यांच्या महाड क्रांतीने पेट घेतला होता. अस्पृश्यांच्या स्पर्शाने चवदार तळे विटाळले गेले, अस्पृश्यांनी आपली पायरी सोडली, रूढ धर्माचाराचा भंग गेला, स्पृश्यांचा मानभंग झाला असे महाड येथील सनातन्यांना वाटले. त्यांनी परिषदेला जमलेल्या अस्पृश्यांना अमानुष मारहाण केली. दुसऱ्या दिवशी तळेही शुध्द करुन घेतले. बाबासाहेबांच्या समजुतीला जबरदस्त धक्का बसला. माणसाची किंमत पशूहूनही कमी लेखली जावी याचा त्यांना विषाद वाटला. अस्पृश्यांच्या जागृतीबरोबर स्पृश्यांच्या मनजागृतीचीही तेवढीच आवश्यकता त्यांना प्रकर्षाने जाणवली. ‘मूकनायक’ हे पहिले पाक्षिक वृत्तपत्र निघून व बंद पडून सहा वर्षाचा कालावधी झाला होता. मतप्रसारण व जनजागरणासाठी वृत्तपत्राची आता नितांत गरज होती. ही निकड लक्षात घेऊन बाबासाहेबांनी महाड क्रांतीदिनानंतर १४ व्या दिवशी ३ एप्रिल १९२७ रोजी ‘बहिष्कृत भारत’ ह्या पाक्षिक वृत्तपत्रास सुरुवात केली.
‘बहिष्कृत भारता’चा काळ १९२७ ते १९२९ चा काळ आहे. बाबासाहेबांच्या सामाजिक जीवनाला प्रारंभ होऊन गतिमानता आलेला हा काळ आहे. ह्या काळात बाबासाहेबांनी भारतीय सामाजिक व राजकीय घडामोडीचा व विविध स्थित्यंतराचा सखोल अभ्यास व चिंतन केलेला काळ आहे. ही चिंतनशीलता व अभ्यासक वृत्ती बाबासाहेबांना समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा विविध शास्त्रातील पदव्या मिळविण्यासाठी लिहिलेल्या प्रबंधांतून प्राप्त झाली होती. ह्या सगळ्यांचा उपयोग भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न हाताळताना बाबासाहेबांना खूप मोठ्या प्रमाणात होत होता.
वृत्तपत्राच्या ह्या मौलिकत्वाची पुरेपूर जाण बाबासाहेबांना होती. त्यानुसार बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतातून भारतातील बहिष्कृतांवरील अन्यायाचे व अत्याचाराचे आपल्या धारदार लेखणी द्वारा चित्रण केले, प्रखर शब्दांनी निर्भीडपणे स्वमते नोंदविली व अस्पृश्यांच्या चेतनाहीन मनात विचारजागृतीचे बीजारोपण केले. विविध लेखातून कधी चिंतनपर तर कधी प्रक्षोभक विचार मांडले. अग्रलेख लिहिले. स्फूटे लिहिली, विचारप्रेरक माहितीचे व लेखांचे संकलनही केले. संपादक या नात्याने बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत या पाक्षिकासाठी अक्षरशः आपले तन, मन, धन वेचले.