#भारतीय_संविधान भाग-१
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना परिषदेत प्रवेश सहज मिळाला नाही. ते सर्वप्रथम घटना परिषदेचे सदस्य म्हणून बंगाल प्रांतातून निवडून आले. महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल यांचे सहकार्य या निवडणुकीत अतिशय महत्वाचे ठरले.
९ डिसेंम्बर १९४६ रोजी घटना परिषदेची पहिली बैठक भरली तेव्हा एकूण २९६ सदस्यांपैकी फक्त २०७ सदस्य हजर होते. मुस्लिम लीगने घटना परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार घातला होता.
११ डिसेंम्बर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची घटना परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांनतर घटनेची उद्दिष्टये स्पष्ट करणारा प्रस्ताव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. त्याला बॅरिस्टर जयकर यांनी विरोध केला. मुस्लीम लीग आणि ५६० हून अधिक संस्थाने यांचे सहकार्य मिळवून भावी राज्यघटना तयार करावी, हे जयकरांचे म्हणणे होते. त्यांनी दुरुस्ती सुचवून प्रस्तावाचा विचार लांबणीवर टाकावा, अशी सूचना केली. या सूचनेला डॉ. आंबेडकरांनी पाठिंबा दर्शविला आणि पंडित नेहरूंनी मांडलेल्या प्रस्तावामध्ये आर्थिक-सामाजिक कार्यक्रमांचा अभाव असल्याचे स्पष्टपणे निर्देशित केले. डॉ. आंबेडकरांनी आपल्या भाषणात देशाच्या उद्धाराचे चित्र उभे केले आणि मार्गही सुचविले. त्यांची राष्ट्रीय भावना तेथील उपस्थितांना भावली.
१७ डिसेंम्बर १९४६ रोजी डॉ. आंबेडकरांनी जे भाषण दिले तेव्हा संपूर्ण सभागृह त्यांचे भाषण श्रवण करण्यास्तव सिद्ध झाले होते. या ऐतिहासिक घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार श्री. एन. व्ही. गाडगीळ निवेदन करतात त्यानुसार, ” त्यांचे भाषण मुत्सद्यासारखे होते. त्यांच्या भाषणात कटुतेला कोणतेही स्थान नव्हते. त्यांचे भाषण मूलगामी आणि विवेकाला आव्हान करणारे होते. त्यामुळे संपूर्ण सभागृह त्यांचे भाषण जीवाचे रान करून ऐकत होते. त्यांच्या भाषणानंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सभागृहाच्या परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा एवढा वर्षाव झाला की, त्यांना निश्चितच गुदमरल्यासारखे झाले असावे.” या भाषणाचा परिणाम असा झाला की, संविधान सभेने ‘ध्येय आणि उद्दिष्टांच्या’ प्रस्तावावरील चर्चा पुढील सत्रापर्यंत स्थगित केली. त्यामुळे आंबेडकर हे केवळ अस्पृश्यांचे/दलितांचे नेते नसून सबंध देशाच्या हिताचा विचार करणारे हाडाचे देशभक्त असल्याचा सुखद अनुभव समस्त काँग्रेसजनांना आला होता. त्यामुळे घटना परिषदेने त्यांची नियुक्ती मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक या दोन समित्यांवर केली होती.
डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. ते डॉ. आंबेडकरांचे विचार आणि कार्य पाहून अत्यंत प्रभावित झाले.
क्रमशः