सामान्य माणसाच्या मनबुध्दीवरील देव धर्मविषयक गुलामगिरीचे ओझे भगवान बुध्दाने आपल्या विचार कार्याने उतरून ठेवले. आधुनिकता, विज्ञान आणि सत्य हा त्यांच्या शिकवणुकीचा पाया होता. ईश्वर, आत्मा, दैवी चमत्कार अशा अवैज्ञानिक बाबी त्यांनी नाकारल्या. त्यामुळे तत्कालीन प्रतिगामी मागासलेल्या विचारांच्या लोकांनी त्यांना नास्तिक म्हणून संबोधले.
जगामध्ये जर मानवाचे कल्याण करणारा देव-ईश्वर अस्तित्वात असेल तर माणसे खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारी, निंदक बकवास करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी का होतात? माणसाला जर बुध्दी देव देत असेल तर जगात दुर्बुद्धीने कार्य करून इतरांच्या जीवनात दुःख निर्माण करणाऱ्या लोकांचे दायित्व देवाकडेच जात नाही का ? माणसांकडून वाईट कृत्य करवून घेण्याचा देवाचा उद्देश तरी काय आहे? अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी उपस्थित करून देवाच्या अस्तित्वावर चर्चा करुन माणसाचा काहीही लाभ होणार नाही. असे त्यांनी समाजाला पटवून दिले आहे.
सृष्टीकर्त्याच्या न्यायी आणि दयाळूपणाबद्दल भगवान बुध्द म्हणतात, “जर कोणी महान सृष्टीकर्ता असेल आणि तो न्यायी व दयाळू असेल तर जगामध्ये इतका अन्याय का फैलावतो? ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवार किळसवाणं दृश्य दृष्टीस पडेल. ब्रह्म आपली रचना सुधारत का नाही? जिला मर्यादा नाही अशी त्याची शक्ती व्यापक असेल तर त्याचे हात कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाहीत? त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःखोपभोगात का बुडालेली आहे? तो सर्वांना सुख का देत नाही? अफरातफरी, चोरी, अज्ञान का फैलावत राहतो? असत्य सत्यावर मात का करते? सत्य आणि न्याय पराभूत का होतात?” भौतिक जगामध्ये सामान्य जनमाणसाला घेरुन असलेल्या व्यथा-वेदनांना, त्याच्या शोषणाला भगवान बुध्दांनी वाचा फोडलेली आहे.
Check Also
धम्मावरती बोलू काही (४)
मागील भागाहून पुढे____ आलारकालाम हा ध्यानमार्गा अंतर्गत येणाऱ्या तिन्ही प्रकारच्या पंथात/शिक्षण पद्धतीत प्रभुत्वसंपन्न (अधिकारिता संपन्न/master) ...