🌺 रमाई 🌺
पहाटे साडेपाचचा सुमार असावा. हा काळ १८९९ सालचा असावा. वणंद गावच्या गावकुसाबाहेरील वस्तीत एका चंद्रमोळी झोपडीत, एका गोऱ्या गोऱ्या, मुलायम अर्भकाचा जन्म झाला. तसं त्या अर्भकाचे माता पिता…. भिकू आणि रूक्मिणी (धोत्रे). कुणी त्या माऊलीला रखमा म्हणत….. रखमा आपल्या मुलीकडे एकटक पाहू लागली. सुईण बोलली, “अगं अशी एक टक लावून काय बगतेस? शंभर नंबरी सोनं हाय सोनं..ही ईवली ईवली मुलगी म्हंजी, भारताची भरली भरली कणगी हायं….आईला मिळणार सोन्याचा घागरपेटा नि बापाला मिळणार जरीचा मंदील…. लेक म्हंजी रत्नाची खाण. या या खाणीतून ही….ही रत्न जन्माला येत्यात. खाणच नसेल तर कुठली हि रत्न….. का कुणास ठाऊक, घरादारात, शेजारपाजारच्यांत, मुलामुलींत, रखमाच्या मुलीच्या जन्मापासून कसा आनंदी आनंद चाललेला. घरापुढील मोगऱ्यावर रात्रीतून एखादं टपोरं फुल उगवावं, त्याचा सुगंध साऱ्या वातावरणात पसरावा तसं रखमाला ‘एक सुंदर मुलगी’ झाल्याची गंधीतवार्ता साऱ्या वणंद गावच्या गावकुसाबाहेरील वस्तीत कशी दरवळली. सारे जण तिला पाहून असेच म्हणत असतं,
“रखमा, तुझी ही मुलगी राजाची राणीच होणार बघ.”
आणि खरंच स्वप्नातल्याप्रमाणे, एक दिवस ती मुलगी वयात येते. तारुण्यांन मुसमुसते, मग तर ती अतिशय सुंदर दिसू लागते. जणू स्वर्गाची स्वप्नील परीच… “पोरगी मोठी भाग्याची हो…. सगळी माणसं कशी झुलत्यात हो तिच्यासाठी.” बारशाचा तो शुभ दिन. शुभ सोहळ्याचं मंगल आमंत्रण देतच उगवला. बारस अर्भकाला पाळण्यात घालून नाव ठेवण्याचा मंगल दिवस, आई बापाच्या सौख्याचा, मोठ्या आनंदाचा दिवस.
मुलीच्या मामानं “पार्वती” नाव ठेवा असं सांगून गेलायं. गावच्या भिकंभटान हीचं पोथीतील नाव “भागीरथी” सांगितलं आहे. आम्ही दोघांनीबी हेच नाव ठेवायचं ठरवलंय….पाळण्यातलं नाव भागीरथी. नथवर मुलगी रानी नाव घेतल्यागत बोलली,
“पाळण्यातल नाव “भागीरथी” नामी,
आमी मात्र म्हणणार रामी….रामी”
‘रामी’ (रमाई) सुंदर, सदाफुली, नित्य हसतमुख टवटवीत, त्यामुळे सर्वांचे लक्ष तिच्यावर खिळलेलं. रखमा भिकूच्या चंद्रमौळी घरात रामीची चंद्रकोर कलाकलानं वाढीस लागलेली.