भारतीयांकडून अपेक्षा 👨🏽👳♀👶🏻👨👩👧👦
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त खास प्रकाशित केलेल्या साप्ताहिक नवयुग या १३ एप्रिल १९४७ च्या अंकात संपादक प्र.के.अत्रे यांनी व्यक्त केलेली अपेक्षा या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. ते लिहितात, “डाॅ.आंबेडकरांबद्दल बहुसंख्य समाजाला काही एक माहिती नाही. डाॅ.आंबेडकर हे हिंदू धर्माला, काँग्रेसला आणि गांधीना शिव्या देतात, वेद, पुराणे, मनुस्मृती जाळून टाका असे म्हणतात आणि हिंदू धर्म सोडून आपण दुसऱ्या धर्मात जाणार असे अधूनमधून सांगतात, एवढेच काय ते सामान्य माणसांना ठाऊक आहे. म्हणून राजकीय पूर्वग्रहाचा काळा चष्मा डोळ्यावरुन काढून टाकल्याशिवाय डाॅ.आंबेडकरांच्या जीवनाचे आणि व्यक्तीमत्वाचे दैदीप्यमान स्वरूप जनतेला कळणार नाही. आणि हे तेजस्वी दर्शन झाल्याशिवाय स्पृश्य समाजाच्या अंत:करणात प्रेम आणि आदर निर्माण होणार नाही.”
हे लक्षात घेऊन स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तरी प्रत्येक भारतीयाने आपल्या डोळ्यावरील जातीय आणि राजकीय चष्मा बाजूला काढून मानवी मूल्यांवर आधारित नवभारत निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय कार्याचे मूल्यांकन केले पाहिजे. आणि घटना बदलण्याचे दुष्ट स्वप्न पाहणाऱ्यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे. अन्यथा देशातील लोकशाहीला भवितव्य राहणार नाही असे वाटते.