💥 आर.पी.आय. मुक्ती आंदोलन : काळाची गरज💥
मानवी जीवनाचे खरे तर दोनच भाग आहेत. एक त्याचे वैयक्तिक जीवन आणि दुसरे त्याचे सार्वजनिक जीवन. हे सार्वजनिक जीवन नेहमी ज्याद्वारे अधिनियमित, अधिशासित (govern) केल्या जाते, नियंत्रित केल्या जाते त्याला कारणीभूत असणारी बाब म्हणजे राजकारण ! मानवी जीवनाचा दुसरा भाग ज्यास सार्वजनिक जीवन म्हणतात ते खऱ्याखुऱ्या अर्थाने राजकीय जीवनच होय. बाबासाहेबांनी स्वत ‘राजकीय जीवन’ या अर्थाने त्याबाबत आम्हास मार्गदर्शनही केलेले आहे. यास्तव बाबासाहेबांनी आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षासाठी जगातील सर्वश्रेष्ठ अशी मानवी उद्धाराची सात तत्वे लिहिलीत. जी मानवी आयुष्यास अधिशासित करणारी तत्वे (Governing principles) आहेत. आजघडीला या आंबेडकरी बौद्ध समाजाच्या सार्वजनिक जीवनाची, तात्पर्याने राजकीय जीवनाची झालेली उध्वस्थावस्था पाहता मन खिन्न होते, उदास होते, निरुत्साही होतांना दिसते. एके काळी संघटीत राहून गौरवशाली इतिहास गाजवून स्वताचा उद्धार स्वताच करण्यात पुढारलेला हा समाज आज सांघिकदृष्ट्या अतिशय दयनीय अवस्थेत दिसतो आहे. समाजाची अशी दिशाहीन वाटचाल होण्यास अनेक कारणे जरी आपल्यास दिसत असलीत तरी त्यापैकी अति महत्वाचे एक कारण जे नमूद करावेसे वाटते ते म्हणजे या समाजात हव्या त्या प्रमाणत लोकशाहीची नितीमुल्ये न रुजविल्या जाणे होय.
सांघिक लोकशाही म्हणजे काय? सांघिक लोकशाहीत नितीमुल्यांचे काय महत्व आहे ? लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी कोणत्या अटींची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे ? इत्यादी बाबींना समजून घेतल्याशिवाय उध्वस्त झालेल्या समाजाने सांघिकतेकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करणे उचित म्हणता येणार नाही. समाज संघटीत ठेवण्यासाठी गरज असते ती पक्षसंघटनेची ! परंतु पक्षाची वाटचाल सुरळीत होण्यासाठी, पक्षांतर्गत लोकशाही हि समाज संघटीत ठेवण्यासाठी किती महत्वाची आहे, याकडे आजवर दुर्लक्षच करण्यात आले आणि त्यातूनच मग वाट्टेल तसा मनमर्जीचा कारभार सुरु झाला. कोणत्याही एखाद्या पक्षांतर्गत असणारा लोकशाहीचा अभाव हा इतर अनेक संघटनांना जन्म देण्यास कारणीभूत ठरतो हे आपण चांगलेच लक्षात घेतले पाहिजे. यातूनच जन्मास येणाऱ्या नानाविध संघटना समाजास तुकड्या-तुकड्यात विभागत जातात. अशातच मग अनेक संघटनांच्या रूपाने गटागटांत विभागलेला हा समाज, एकीकरणाच्या नावाखाली समाज एकसंघ होण्यासाठी आस लावून बसलेला दिसतो आहे. वास्तविकता हि आहे कि समाजातील जी माणसे अश्या विविध गटागटांत विभागलेली आहेत ती एकतर त्यांचे स्वहित जोपासण्यासाठी किंवा नाईलाजास्तव ती भिन्न भिन्न संघटनांच्या छत्रछायेखाली वावरत आहेत. बहुतेकांना असेच वाटते कि हि सर्व मंडळी स्वार्थ जोपासण्यासाठीच संघटना स्थापून करून बसलेली आहेत. परंतु बऱ्याच कमी लोकांना असे वाटते कि हा त्यांचा नाईलाजही असू शकतो. नाईलाजास्तव संघटना स्थापन करून कार्यरत असणे म्हणजे नेमके काय ? ज्याअर्थी बाबासाहेबांनी या समाजास संघटीत राहण्यासाठी संघटना दिलेल्या असतांना देखील समाजातील काही कार्यकर्त्यांना संघटना स्थापन करण्याचा नाईलाज का ओढवत असावा ? एवढेच नव्हे तर त्या-त्या संघटना कशा कार्यरत असाव्यात यासाठी संघटनांच्या घटनाही दिल्या आहेत. मग असे असतांनाही नेमकी अडचण आहे तरी कुठे? हि अडचण दुसरी तिसरी कोणतीही नसून ती एक कायदेशीर तांत्रिक अडचण आहे. तांत्रिक अडचण म्हणण्याला कारण असे कि घटनात्मक लोकशाही मूल्यांना प्राणप्रिय मानून संघटीत होण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासमोर उभा राहणारा पहिला प्रश्न म्हणजे कोणत्या संघटनेचे आपण रीतसर कायदेशीररित्या सभासद व्हावे? प्रत्येक संघटना आपण बाबासाहेबांनी सांगितलेलेच कार्य करतो आहोत अशा अविर्भावात मिरवितांना दिसतात आणि आजकाल तर बाबासाहेबांच्या बरोबरीत कोणत्याही सर्वसाधारण व्यक्तीस महापुरुष म्हणून बसविण्याची बहुजन मंडळीत जणू शर्यतच लागलेली दिसते आहे. तर सांगायचे ते एवढेच कि बाबासाहेबांना अभिप्रेत कार्य कोणते? या देशाला प्रबुद्ध भारत बनवायचा असेल तर कोणत्या संघटनेच्या माध्यमातून ते आम्हास करावयास त्यांनी सुचविले आहे? मग आज आम्ही त्या संघटनेप्रति सजग आहोत काय? प्रश्न असा आहे कि अनेक कार्यकर्त्यांना बाबासाहेबांनी जन्मास घालून दिलेल्या संघटनांच्या प्रती निष्ठा, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आहे. परंतु सार्वजनिक जीवन संघटीत करण्यासाठी ज्या राजकीय संघटनेची मुख्य गरज असते तिची सूत्रे समाजाच्या हाती नसून ती वास्तविकतेत घराणेशाहीच्या विळख्यात सापडलेली आहेत हे सत्य आहे. सार्वजनिक जीवन सदैव संघटीत राहण्यासाठी बाबासाहेबांनी जी संघटना जन्मास घालून या समाजाच्याच नव्हे तर सबंध भारतीयांच्या उद्धारासाठी दिली आहे ती ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ हि संघटना गेल्या कित्येक वर्षांपासून गवई-परिवाराच्या घराणेशाहीत बंदिस्त करून ठेवली आहे. अनेकांनी हेतुपुरस्सर या संघटनेस ‘ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)’ असे नामकरण करून जनमानसात प्रचार-प्रसारित केले जेणेकरून सर्वसामान्य जनतेस या संघटनेविषयी काहीएक घेणेदेणे असू नये. याचा परिणाम असा झाला कि बाबासाहेबांनी जन्मास घालून दिलेल्या आपल्या मुख्य संघटनेकडे समाजाचे दुर्लक्ष झाले आणि याचाच उतरोत्तर फायदा पक्षास घराणेशाहीच्या ताब्यात ठेवलेल्या लोकांनी समाजाच्या हितशत्रूंपक्षांशी वारंवार हातमिळवणी करून बाबासाहेबांच्या पक्षास डाग लावण्याचे महापाप करण्यात धन्यता मानली. या संघटनेची दारे लोकशाहीला प्राणप्रिय मानणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांसाठी कायमची बंद करण्यात आली. कारण लोकशाही हि घराणेशाहीद्वारे राबविण्यात येणाऱ्या हुकुमशाहीला शह देणारी सशक्त यंत्रणा आहे याची यांना चांगलीच कल्पना आहे. मात्र समाजात बुद्धीजीवी म्हटल्या जाणाऱ्या वर्गाने या घराणेशाही विरुद्ध कधीही बंड पुकारल्याचे ऐकिवात नाही. सर्वसाधारण कार्यकर्ते मात्र या बुद्धीजीवी वर्गाकडे मोठ्या आशेने बघत असतात. पण बुद्धीजीवी वर्गाने जर का इमानदारी बाळगली नाही तर समाज उध्वस्थ झाल्याखेरीज राहत नाही याचा प्रत्यक्ष अनुभव आजघडीला हा समाज घेतो आहे. एवढेच नव्हे तर सर्वसाधारण व्यक्ती स्वत: मुर्खासारखे वागून या बुद्धीजीवी वर्गास प्रश्न विचारण्याचे कधीच धाडस करीत नसल्याने समाजाचा ऱ्हास होतांना दृष्टीस पडतो आहे. याला यत्किंचित अपवाद असू शकतो.
सांगायचे ते असे कि, बाबासाहेबांनी जन्मास घालून दिलेल्या संघटनेची समाजास नितांत गरज आहे हे माहित असतांनाही त्या दिशेने पाऊले उचलण्याचे धाडस आम्ही का करीत नाही? देशात अस्थिरतेचे वातावरण दिवसागणिक वाढतेच आहे. यास रोखण्यासाठी सशक्तपणे संघटीतरित्या आपणास उभे राहायचे असेल तर तांत्रिकदृष्ट्या निर्माण झालेली संघटनेची अडचण आपण सर्वप्रथम दूर सारली पाहिजे आणि ती अडचण म्हणजे बाबासाहेबांनी या समाजाच्या उद्धारासाठी दिलेल्या संघटनेस घराणेशाहीतून मुक्त करून तिला घटनात्मक लोकशाहीचा श्वास घेऊ देण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घेणे होय. जेणेकरून बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीस आपल्या संघटनेचा सभासद बनून, पक्षांतर्गत होणाऱ्या लोकशाही निवडणुकीद्वारे, आपल्या पक्षाच्या ग्राम पातळी ते राष्ट्र पातळीपर्यंत कार्यकारणींची (CEC) संविधानिक संरचना करण्यासाठी हिरीरीने भाग घेता येईल. तेव्हा आता या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आपण धैर्याने सज्ज होण्याची वेळ आता आलेली आहे. प्रत्येक आंबेडकरी अनुयायास याद्वारे आवाहन करण्यात येते आहे कि त्यांनी तन मन धनाने बाबासाहेबांच्या संघटनेस घराणेशाहीद्वारे चालविल्या जाणाऱ्या हुकुमशाहीतून मुक्त करण्यासाठी, प्राणपणाने लढण्यासाठी या आंदोलनात सामील व्हावे. बाबासाहेबांच्या प्रत्येक शब्दाची जाणीव आपल्या मनमस्तिष्कात कोरून आता मरणाच्या तयारीनेच आपण समरांगणात उतरलो पाहिजे. बाबासाहेब म्हणतात, “ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य आहे अशी ज्यांना जाणीव आहे ते धन्य होत. गुलामगिरीवर हल्ला चढविण्यासाठी जे आपले तन-मन-धन आणि तारुण्य कुर्बान करतात ते धन्य होत.” तेव्हा आता घराणेशाहीच्या गुलामीत अडकलेल्या आपल्या उद्धारकर्त्या बापाच्या पक्षाला मुक्त करण्यासाठी मित्रांनो पुढे होऊ या ! आपणच आपली राजकीय अस्पृश्यता आता संपविली पाहिजे.
प्रशिक आनंद, नागपूर
दि. डिसेंम्बर 4, 2017
www.republicantimes.in