👑 शाहू छत्रपती आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर एक ऋणानुबंध 🎓
संकलन: इंजी. सुरज तळवतकर.
…..आपण पुढारी असा कोणासच घेऊ नये. सल्लागार म्हणून घ्यावे. पुढारी म्हणून घेतला की लगेच त्यांनी आपली अंमलबजावणी करुन घेतलीच. माझे न ऐकाल तर तुमच्या संस्थेशी माझा संबंध राहणार नाही. मी तुमचेविषयी पत्रात काही लिहिणार नाही. लेजिस्लटिव्ह कौन्सिलमध्ये प्रश्न काढणार नाही. गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाविषयी काही बोलणार नाही. अशा तऱ्हेच्या धमकावण्या घालून पुन्हा तुम्हांला गुलामगिरीच्या पायांत चांगलाच घालणार. पशूदेखील आपल्या जातीशिवाय पुढारी स्वीकारत नाही. मग मनुष्यांनी का स्वीकारावा? हरणाच्या कळपात कधी डुक्कर पुढारी नसते. किंवा डुक्कराच्या कळपात हरणे पुढारी नसतात. कबुतराचे कळपात कधी बदके पुढारी नसतात किंवा बदकाच्या कळपात कधी कावळे पुढारी नसतात. मग मनुष्याचे कळपात दुसऱ्या जातीचे पुढारी का असावेत? याचे कारण थोडक्यात आहे ते हे की पुढारीपणा घेतला की बकऱ्यासारखी किंवा ढोरासारखी स्थिती होते. बकऱ्याचा पुढारी धनगर असतो. त्या बिचाऱ्याचे नशिबी असते ते काय तर त्यांच्या पुढाऱ्याकरिता जीव देणे. विजातीय पुढारी असला म्हणजे हेच त्याच्या नशिबी यावयाचे. हरणासारखा स्वच्छंदीपणा कोठून येणार? गाई म्हशींचा पुढारी गवळी असतो. तो काय करतो तर बिचाऱ्या वासरास व रेडकास उपाशी मारून दूध विकून चैन करतो. दूध देण्याचे बंद झाल्याबरोबर कसाबाकडे लावून देतो. जे प्राणी आपला पुढारीपणा दुसऱ्याच्या हाती देतात त्यानांही अशीच दैन्यावस्था प्राप्त होते.
आम्ही क्षत्रिय, वैश्य, सोमवंशीय लोक तरी ब्राह्मण ब्युराॅक्राॅसीचे इतके गुलाम का झालो आहोत तर त्यांच्याकडे पुढारीपणा दिला. म्हणून ते आम्हांस बिचाऱ्या रेड्याबैलाप्रमाणे गाडीला जोडून आम्हांस बडवितात व आमच्या आईचे दूधही पितात.
आम्हास हा पुढारीपण मुळीच नको आहे. मोडका तोडका आपल्याच जातीचा पुढारी घ्यावयास पाहिजे आहे. ब्राह्मणास जर आमचा पुढारीपणा घेणेस पाहिजे असेल तर जातिभेद मोडून त्यांनी रोटीबेटी व्यवहार करावयास पाहिजे. तरच त्यांना पुढारी मानू नाहीतर माझ्यासारखी मंडळी दूर राहून यथाशक्ती सल्ला व द्रव्यसुध्दा मदत करतील. सल्ला पाहिजे त्याचा घ्यावा पण आपल्या मनास वाटेल ते करावे अशा मंडळींनाच मी सल्ला व द्रव्यद्वारा मदत देण्यास तयार आहे. मेंढरांसारखी व गाई बैलासारखे दुसऱ्या जातीवर अवलंबून राहणाऱ्या लोकांशी संबंधसुध्दा ठेवणे मला इष्ट वाटत नाही व मीही ठेवणार नाही.
राजर्षी शाहू गौरव ग्रंथ