पहिले विश्वविद्यालय बौध्दधर्मीय लोकांनी स्थापन केले. नांलदा विश्वविद्यालयात तेरा हजार विद्यार्थी व एक हजार अध्यापक होते. ब्राह्मण धर्म हा एकांगी होता. अन्य कारणांमुळे मुसलमानाच्या तडाख्यातून त्याचा बचाव झाला. बौध्द धर्माविरुध्द ब्राह्मणांची कारस्थाने चालू होती. त्यामुळे तो खाली पडला. बुध्द धम्मावर मी इंग्रजीतून पुस्तक लिहित आहे. हे पुस्तक दोन महिन्यांनी प्रकाशित होईल. या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करुन ते छापण्यात येईल. तुमचा बौध्द धर्म एवढा चांगला होता तर त्याचा ऱ्हास का झाला? असे माझे काही मित्र मला प्रश्न विचारतात तेव्हा मी त्यांना असे विचारतो की, हा धर्म वाईट आहे म्हणून ऱ्हास झाला असे म्हणावे तर चीन, जपान, कंबोडिया, सिलोन या देशामध्ये या धर्माचा ऱ्हास झाला नाही. तेथे अजून तो का टिकून आहे?
या देशात हा धर्म नाहीसा झाला नाही तर त्याला निराळी वाळवी लागली असेल. कारस्थाने झाली असतील, सांगण्याचा मतलब असा की, त्याच्या निर्मितीपासून साडे बाराशे वर्षापर्यंत तो यच्चयावत चालला होता. हा इतिहास इतिहासकारांनी लपवून ठेवला आहे. यावेळी मी संबंध भारताविषयी बोलणार नाही. फक्त महाराष्ट्रा संबंधी सांगणार आहे. आपला महाराष्ट्र प्रदेशसुध्दा शंभर टक्के बौध्दधर्मीय होता आणि त्याला पुरावा म्हणून महाराष्ट्रातील पुरातनकाळाच्या कोरीव लेण्यांची उदाहरणे देता येतील. भारतातील दीड हजार लेणी महाराष्ट्रातच आहेत. ही लेणी म्हणजे बौध्द भिक्खूंची राहण्याची ठिकाणे होती. हेच त्यांचे निवाऱ्याचे स्थान होते. महाराष्ट्रात जी काही लेणी आहेत ती पांडवांची आहेत असे सांगण्यात आले. परंतु विराटनगरी कोठे आणि व पांडवांचे राज्य कोठे?
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
दि.२५ डिसेंबर १९५४, पुणे