माझ्या ‘गर्व’वाल्या तरुण हिंदू मित्रानों!
माझ्या तरुण मित्रानों, गर्वाचा डिंडिभ यथेच्छ बडवून तुम्ही धर्माचा अभिमान सांगत आहात; परंतु एक गोष्ट तुम्हाला ठाऊक नाही, ती सांगतो. धर्म ही पूर्णतः वैयक्तिक बाब आहे. ‘समाजाची धारणा करतो तो धर्म’ ही धर्माची सोपी, सुटसुटीत व्याख्या पूर्वी केलेली असली तरी ही व्याख्या आता मागे पडत चालल्यासारखी वाटते आहे.
एखादा परधर्माची निंदा करुन गर्वाने स्वधर्मस्तुती करीत असेल तर तो एक शतमूर्ख! आपल्या धर्माचा इतिहास, आपली संस्कृती तुम्ही कधी नीट तपासून पाहिली आहे काय? तुमच्या गर्वामध्ये मला वस्तुस्थितीची जाण दिसत नाही. तुम्ही तरुण आहात. मान्य! परंतु तारुण्याचा अर्थ काहीही बरळणे असा नव्हे! तुमच्या धडावर ‘डोके’ नावाचे एक प्रकरण आहे ही गोष्ट कधी तुमच्या लक्षात आली आहे काय?
एखादा माणूस विद्वत्ताप्रचुर बोलत असला, लिहित असला तरी याचा अर्थ तो सत्यच सांगतोय या भ्रमात तुम्ही कधीही राहू नका. विवेकाच्या मूशीतून तुम्ही प्रत्येक विचार घासूनपुसून पारखायलाच हवा. तरच तुम्ही विचारी आहात असे मी म्हणेन!
या देशाची धर्मव्यवस्था कशी आहे त्याचा अभ्यास करा. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या गत बेचाळीस वर्षांत काँग्रेसचे शासन बेकारांच्या लोंढ्याला नोकऱ्या देण्याचे सत्कर्म करु शकले नाही. नव्हे तो त्यांचा विषयच नव्हता. म.गांधींचा ज्यावेळी खून झाला त्यावेळी भारतीय राजकारणातील नीतिमत्ता ढासळून पडली ती आजपर्यंत पुन्हा वर उठू शकली नाही. बेकारांची वाढणारी फौज आज बेफाम होत चाललीय.
मित्रानों, बेकारीचा प्रश्न पूर्णतः आर्थिक स्वरूपाचा आहे. परंतु या देशातील जातिव्यवस्थेमुळे हा प्रश्न जातीय संघर्षाशी निगडीत होऊ पाहत आहे. या आर्थिक प्रश्नाला जातीय रंग देणे आपल्या हिताचे ठरणार नाही. आपण जे प्रत्यही आरडाओरडा करुन सांगत असता की, हिंदू धर्म सहिष्णू आहे, ही सगळी पोपटपंची आहे. हा आपमतलबी बगलबच्च्यांचा डाव आहे. हिंदू धर्म कधीही सहिष्णू नव्हता आणि नाही. पांडुरंगाच्या मंदिराच्या शेवटच्या पायरीवर मागासवर्गीय संताची समाधी आहे याचा अर्थ तुम्ही हिंदू सहिष्णू आहेत असा घेता का? तसे असेल तर तुमच्या अकेलेचे दिवाळे निघाले आहे असे मी म्हणेन.
भाग:- एक
क्रमश:
💥 सूचना:- मी (लेखक) हे लिहिल्यानंतर बिचकू नका. तुमच्या धर्मातल्या विषारी जातिव्यवस्थेत उच्चवर्णीय म्हणूनच माझी गणना होते. मी (लेखक) स्वतः संघात अगदी गुरासारखा दहा वर्षे राबलो आहे. गुरासारखा या अर्थी की, संघात व्यक्तीला व्यक्ती या अर्थी कवडीचीही किंमत नाही. म्हणून त्यासंबंधी लिहीत असताना माझा दृष्टिकोन जास्तीत जास्त तटस्थपणाचा आहे.
मुकुंद शिंत्रे लिखित संघाचा बुरखा या पुस्तकातून
🚩 माझ्या ‘गर्व’वाल्या तरुण हिंदू मित्रानों!
…. राखीव जागांच्या प्रश्नाचेच घ्या ना! तुम्हाला नोकऱ्या नाहीत याला जबाबदार तुम्ही कोणाला धरता? सरकारला धरायला पाहिजे. तसे न करता ‘आर्थिक निकषाचे’ तुणतुणे लावून तुम्ही राखीव जागांना विरोध करता! ही गोष्ट माझ्या दृष्टीने मागासलेपणाची आहे. वस्तुस्थिती तुम्हाला ठाऊक नाही, परिस्थितीची तुम्हाला जाणीव नाही, म्हणूनच तुम्हाला असे बोलावेसे वाटते. परंतु ही गोष्ट लाजिरवाणी आहे. त्याचा तुम्ही गंभीरतेने विचार करायला हवा.
हिंदू धर्मात मतामतांचा गलबला आहे, हे तुम्हाला माहीत नाही. कारण तुम्ही शालेय अभ्यासाव्यतिरिक्त इतर वाचन करीत नाही. केले तरी ते तुम्हाला झेपत नाही. झेपले तरी ते कटु सत्य पचविण्याची तुमच्या मनाची तयारी नसते. या हिंदू धर्माने मागासवर्गीयांकडून जी कामे आजपर्यंत करून घेतली त्या नीचपणाला जगाच्या इतिहासात तोड नाही. असे असतानाही हे सर्व त्यांनी सहन केले, कारण आपल्या धर्मातला कर्मवादाचा अघोरी सिध्दांत! या सृष्टीच्या रचनेतील आपले स्थान नगण्य आहे हा परंपरागत संस्कार त्यांच्यावर प्रयत्नपूर्वक रुजविण्यात आला आणि त्यांची अक्षरशः नागवणूक करण्यात आली.
तुम्ही फक्त शहरात हिंडता. दोन-चार मागासवर्गीय पोरे स्कूटरवरून फिरताना पाहता. तेव्हा तुम्हांला वाटते की, साले, रिझर्व्हेशनमुळे हे मजा मारतात! आणि इथेच तुमचा परंपरागत धर्माभिमान/वर्णाभिमान उफाळून वर येतो. मी तुम्हाला वस्तुस्थितीची जाण नाही असे का म्हणतो? कारण खेड्यातले जातिविषमतेने बरबटलेले जीवन तुम्ही पाहिले नाही. म्हणूनच तुम्हाला गर्वाची शिरजोरी करावीशी वाटते. आपले बापजादे बदलले नाहीतच, पण आपणही बदललो नाही.
आपण बदलणारच कसे? बी.एस्सी झालेली एक तरुणी मला भेटली. तिला ‘चार्वाक’ म्हणजे कोण हे ठाऊक नव्हते आणि बी.एस्सी.ला तिला डिस्टिंक्शन होते. आता बोला! कदाचित तुमच्यापैकी काहीजणांना चार्वाक ठाऊक नसण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. मला असे म्हणायचे आहे की, ज्यावेळी तुम्ही शिक्षण घेता, पदवीधर होता किंवा द्बिपदवीधर बनता तेव्हा नकळत वस्तुस्थितीपासून दूर सरकता. मी विचार करतो, तुम्हांला म्हणावे तरी काय? नव्या विचारांचा अनुरोध आपण करणार आहोत की नाही, याचाही एकदा स्पष्टपणे फैसला करायला हवा. मागासवर्गीयांच्या दुःखस्थितीबाबत तुम्हाला काहीएक ठाऊक नाही आणि तरीही त्यांना सवलती मिळतात म्हणून तुम्ही आगपाखड करता. त्यांनी नरकाच्या कर्दमातच पडून राहावे असे तुम्हांला वाटते काय? तशाच तुमच्या धार्मिक भावना उफाळून येत असतील तर तुमच्या कथित धर्मावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून द्या. कारण हा धर्म मानवतावादाशी विसंगत वर्तन करतो आहे.
म.फुल्यांनी जी समताक्रांतीची ज्योत महाराष्ट्रात पेटवली होती ती तुम्ही विझवणार आहात काय? संपूर्ण देशात महाराष्ट्र हे एक असे राज्य आहे की, त्याबद्दल निखळ प्रेमाने बोलावे असे मला वाटे. परंतु आता वाटत नाही. कारण काही ‘गर्व’वाली मंडळी या फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला जातीयवादी बनवू पाहत आहेत.
भाग:- दोन
क्रमशः
💥 सूचना:- मी हे लिहिल्यानंतर बिचकू नका. तुमच्या धर्मातल्या विषारी जातिव्यवस्थेत उच्चवर्णीय म्हणूनच माझी गणना होते. मी (लेखक) स्वतः संघात अगदी गुरासारखा दहा वर्षे राबलो आहे. गुरासारखा या अर्थी की, संघात व्यक्तीला व्यक्ती या अर्थी कवडीचीही किंमत नाही. म्हणून त्यासंबंधी लिहीत असताना माझा दृष्टिकोन जास्तीत जास्त तटस्थपणाचा आहे.
मुकुंद शिंत्रे लिखित संघाचा बुरखा या पुस्तकातून
🚩 माझ्या ‘गर्व’वाल्या तरुण हिंदू मित्रानों!
माझ्या ‘गर्व’वाल्या तरुण हिंदू मित्रानों, तुम्हाला ही गोष्ट ठाऊक आहे का की, डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी आधी निव्वळ धर्मांतराची घोषणा केली, परंतु सुमारे २० वर्षे थांबूनच त्यांनी ही घोषणा प्रत्यक्षात अंमलात आणली. का? कारण त्यांना वाटत होते की, हिंदू अजूनही बदलू शकतील. पण नाही बदलले. नाहीतरी आपले बापजादे तसे हेकटच होते म्हणा! आणि मग डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्म स्वीकारला. डाॅ.बाबासाहेबांच्या या घटनेचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा असे वाटते की बौध्द धर्मांतराने हिंदुस्थानात (आजचा इंडिया अर्थात् भारत) खळबळ जरूर माजली, परंतु अस्पृश्यतेचा प्रश्न सुटू शकला नाही. कारण हिंदू विचारधारा काळाशी सुसंगत राहून आपले वर्तन सुधारु शकली नाही. डाॅ.बाबासाहेबांनी इस्लाम किंवा ख्रिश्चनांचा अनुनय करायला हवा होता, म्हणजे या धर्मांधांच्या नाकाला चांगल्या झणझणीत मिरच्या झोंबल्या असत्या आणि आपल्या देशातल्या कथित धर्ममार्तंडांनी आपल्या समाजव्यवस्थेत कदाचित काहीतरी मूलभूत बदल केला असता.
गतदशकात मीनाक्षीपुरमला जे १२०० दलित मुस्लिमांमध्ये धर्मांतरित झाले त्याने हिंदू समाजाचे डोळे उघडले. हिंदू धर्मीयांनी बराच गिल्ला केला. परंतु मूळ प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला. स्वातंत्र्यानंतरसुध्दा तुम्ही दलितांना चांगली वागणूक देऊ शकत नाही. त्यांनी तुमच्या या हवाई धर्मकल्पनेवर विश्वास तरी कसा ठेवायचा?
‘गर्व’वाल्या मित्रानों, तुम्ही महाराष्ट्राबाहेर कधी गेला आहात का? काय परिस्थिती आहे हे कधी तुम्ही इतरांकडून जाणून घेतले आहे का? डाॅ.बाबासाहेबांमुळे फक्त महाराष्ट्रातला युवक, जो तुमच्या धर्मात लिखित स्वरूपात नीच, चांडाळ म्हणून गणला जातो तो थोडासा लिहायला, बोलायला लागला आणि क्रांतिकारी गोष्टीत सामील व्हायला लागला, समतेची भाषा बोलायला लागला तेव्हा त्याला तुम्ही धर्माचा अभिमान किंवा ‘गर्व’ सांगणार का? तो कसे ऐकून घेईल? किमान तुम्हाला तरी कळायला हवे की, आपण हे कोणत्या तोंडाने सांगणार म्हणून? या देशातले धर्मसुधारक बोटचेपेच निघाले. अगदी म.गांधींचे उदाहरण घेऊ. ‘हरिजन सेवक संघ’ हा हरिजनांची सेवा करायला निघाला. परंतु ही वर्णव्यवस्था लाथाडून द्यावी असे गांधींना वाटले नाही. त्यांनी तसे करायला हवे होते. कारण लाखोंचा जनसमुदाय त्यांच्या पाठीमागे होता. त्यांना ही गोष्ट सहजच करता आली असती. परंतु म.गांधी हे समतेचे पुरस्कर्ते नव्हते, तर धार्मिक भूतदयावादी होते. जशा नोबेल प्राइजविजेत्या मदर तेरेसा आहेत. अशा लोकांकडून कुठल्या क्रांतीची अपेक्षा करणार?
भाग:- तीन
क्रमशः
💥 सूचना:- मी हे लिहिल्यानंतर बिचकू नका. तुमच्या धर्मातल्या विषारी जातिव्यवस्थेत उच्चवर्णीय म्हणूनच माझी गणना होते. मी (लेखक) स्वतः संघात अगदी गुरासारखा दहा वर्षे राबलो आहे. गुरासारखा या अर्थी की, संघात व्यक्तीला व्यक्ती या अर्थी कवडीचीही किंमत नाही. म्हणून त्यासंबंधी लिहीत असताना माझा दृष्टिकोन जास्तीत जास्त तटस्थपणाचा आहे.
मुकुंद शिंत्रे लिखित संघाचा बुरखा या पुस्तकातून
🚩 माझ्या ‘गर्व’वाल्या तरुण हिंदू मित्रानों!
तुम्ही जोपर्यंत निखळ विचारी बनत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटू शकणारा नाही. मात्र तुमचा गर्व खूपच उफाळून येत असेल तर माझा नाइलाज आहे. मग आपल्याच टिर्ऱ्या बडवून घ्या आणि आपली कथित संस्कृती आणि धर्म महान आहे म्हणून गिल्ला करा. माझी ना नाही. कारण प्रवाहाच्या विरूद्ध पोहण्याची ताकद तुमच्यात नाही हेच इथे सिध्द होते.
विद्वत्तेचा मक्ता विशिष्ट जातीकडे असतो हा भ्रम पहिल्यांदा मनातून काढून टाका. तुम्हांला काळाच्या बरोबर धावायलाच पाहिजे. तुम्ही असे धावला नाहीत तर काळ तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही.
‘गर्व’वाल्या मित्रानों, परिस्थिती बदलली आहे असे मानायचे काही कारण नाही. कपडे बदलल्याने विचार बदलत नाहीत. स्वधर्माची कठोर चिकित्सा करण्याचे सामर्थ्य तुम्हाला प्राप्त व्हायलाच हवे, तरच तुम्हाला मी तरुण म्हणेन. अन्यथा आरडाओरडा करुन कुणाच्याही मागे जाण्यात कुठलेही शहाणपण नाही. तसे तुम्ही करु नका. कारण तुमच्या मेंदूला पूर्णपणे फाटा दिला जाऊन तुमची बुध्दी तुम्ही गहाण टाकता आहात आणि हे धोकादायक आहे.
गुजरात मध्ये राखीव जागांवरुन जो वाद पूर्वी पेटला होता त्यात दलितांच्या झोपड्या षंढ जातीयवादी गिधाडांनी पेट्रोल टाकून जाळून टाकल्या, भस्मसात केल्या. तेव्हा तुमचा ‘गर्व’ कुठे पाणी भरायला गेला होता का? मराठवाड्यात ही हाच प्रकार झाला. तेव्हा तुमचा हा अविवेकी गर्व कुठे झोपा काढत बसला होता? तुम्हाला हवे तरी काय? तुमच्या धर्मांध दुष्टतेच्या घाणेरड्या कथा खूप आहेत. त्या सांगून माझी जीभ मी विटाळून घेणार नाही. तरी तुमचा गर्व धार्मिक आहे. म्हणून मला भीती वाटते– कदाचित एखादा धर्मग्रंथ लिहून त्याला गर्वग्रंथ म्हणून प्रतिष्ठित करायलाही तुम्ही मागेपुढे पाहणार नाही.
उदारतेचा आणि तुमचा काही संबंध राहिला आहे असे मला वाटत नाही. म्हणूनच तुमच्या गर्वात मला क्रूरपणा दिसतो. धर्माचा अभिमान जेव्हा गर्वाच्या स्वरूपात प्रकट होतो. त्यावेळी त्या धर्माला उतरती कळा लागते. म्हणूनच हा धर्म प्राचीनतेच्या वृथा कल्पनांनी सजवून तुम्ही विज्ञानाविरोधी आणि विचारविरोधी बनू नका. पहिल्यांदा तुम्ही माणूस आहात आणि माणसासारखे जगायला शिका.
भाग:- चार
क्रमशः
💥 सूचना:- मी हे लिहिल्यानंतर बिचकू नका. तुमच्या धर्मातल्या विषारी जातिव्यवस्थेत उच्चवर्णीय म्हणूनच माझी गणना होते. मी (लेखक) स्वतः संघात अगदी गुरासारखा दहा वर्षे राबलो आहे. गुरासारखा या अर्थी की, संघात व्यक्तीला व्यक्ती या अर्थी कवडीचीही किंमत नाही. म्हणून त्यासंबंधी लिहीत असताना माझा दृष्टिकोन जास्तीत जास्त तटस्थपणाचा आहे.
मुकुंद शिंत्रे लिखित संघाचा बुरखा या पुस्तकातून
🚩 माझ्या ‘गर्व’वाल्या तरुण हिंदू मित्रानों!
तुमच्या गर्वात भंपकगिरी आहे. क्रूरता आणि धर्मांधता आणि जातिव्यवस्थेचे समर्थन तुमच्या गर्वात अध्याहृत आहे. या गर्वात कुठलीही मानवतेची झाक नाही, प्रेमाचा अंश नाही. अभिमान हा अंतत: धर्मविरोधी असतो. आणि गर्वाचे म्हणाल तर छोटी पोरेही ओरडतात की, ‘गर्वाचे घर खाली’ तोच गर्व तुम्ही कपाळी लावता. तुम्हाला अखेर झाले तरी काय? हिंदूनी गर्व करुन घेण्यासारखे काहीही नाही. ज्या ज्ञानेश्वराला तुम्ही संत म्हणून प्रसिद्धी देता त्याच ज्ञानेश्वराच्या आईवडिलांना तुम्ही जलसमाधी घ्यायला लावली. ज्यांनी ती घ्यायला लावली तेच आज ज्ञानेशाची स्तुती करताहेत. तुमचा धर्म खरोखरच छान आणि महान आहे काय? तुम्ही बदलायला पाहिजे. अत्याधुनिक वेशभूषा केली आणि इंग्लिश बोलायला आले की, तुम्ही आधुनिक म्हणून गणले जाणार नाही. तुमच्या धर्माची तुम्ही कठोर चिकित्सा करायला हवी. आमचा सगळा इतिहास पराभवाचा, मानभंगाचा आणि क्रूरतेचा आहे. शूद्रांना गावकुसाबाहेर ठेवणारी आमची संस्कृती महान असूच शकत नाही. आणि याच संस्कृतीचे गोडवे गाणारा धर्म आणि देशही महान बनू शकत नाही. हे तुम्हाला बोचणारे आहे, पण खोट्या दंभाने स्वतःची पाठ थोपटून घेण्यात कुठले हाशील आहे?
ज्या धर्मात तुम्ही जन्माला आला तो ‘तुमचा धर्म’ होऊ शकत नाही. कारण केवळ रुढी-परंपरा आणि संस्कृतीउपासना म्हणजे धर्म होऊ शकत नाही. म्हणूनच धर्म ही अत्यंत विचारणीय, चिंतनीय बाब आहे. त्याला बाजारी स्वरूप देऊन धर्माला एवढे स्वस्त स्वरूप देऊ नका. पूर्वजांचे गोडवे गाण्याच्या नादात तुमच्या हातून खूप मोठ्या चुका घडू शकतील, तेव्हा हे सर्व तुम्ही टाळा.
तुम्हांला धर्मच हवा असेल तर फक्त स्वतःच्या हृदयाला विचारा. तुमच्या हृदयातून येणारा तुमचा धर्म असेल.
जो धर्म जाती-जातींत विभागला गेला आहे तो धर्म चांगला कसा असेल? ज्या धर्मात कोणालातरी सेवाकर्म करायला लावून शूद्र ठरविले जात असेल तो धर्म गर्व मिरविणाऱ्यांचा आधारस्तंभ कर्मवादाचा सिद्धांत कसा होऊ शकतो. त्या धर्मात कुठले माणूसपण आहे? या धर्मात जातिभेदाला ग्रंथित केले आहे. त्याचा कुठला आलाय गर्व? माझ्या समस्त कथित ‘गर्व’वाल्या तरुण हिंदू मित्रानों, बघा बरं सापडतात का या प्रश्नांची उत्तरे! या प्रश्नांची उत्तरे तुम्ही ठाऊक असूनही दिली नाहीत तर म्हणू का वेताळासारखे– तुमच्याच डोक्याची शंभर शकले होऊन तुमच्याच पायाशी लोळण घेतील? तेव्हा म्हणाल का, ‘गर्व से कहो हम हिंदू है!’
भाग:- पाच
समाप्त!
💥 सूचना:- मी हे लिहिल्यानंतर बिचकू नका. तुमच्या धर्मातल्या विषारी जातिव्यवस्थेत उच्चवर्णीय म्हणूनच माझी गणना होते. मी (लेखक) स्वतः संघात अगदी गुरासारखा दहा वर्षे राबलो आहे. गुरासारखा या अर्थी की, संघात व्यक्तीला व्यक्ती या अर्थी कवडीचीही किंमत नाही. म्हणून त्यासंबंधी लिहीत असताना माझा दृष्टिकोन जास्तीत जास्त तटस्थपणाचा आहे.
मुकुंद शिंत्रे लिखित संघाचा बुरखा या पुस्तकातून