मुस्लिम किंवा इतर समुदायाच्या राष्ट्रप्रेमावर शंका घेणे आत्ताच का वाटते ?
डाॅ.झाकीर हुसेन, फक्रुद्दीन अहमद, डाॅ.अब्दुल कलाम यांना देशाच्या सर्वोच्च पदावर देशाने स्वीकारले आहे. या देशात मुस्लिम, शीख, ईसाई, जैन, बौध्द, आदिवासी, ठाकूर इत्यादींनी निरनिराळ्या राज्यात आपले वर्चस्व वेगवेगळ्या प्रकारे जपले आहे. ते सर्व हिंदू राष्ट्र या कडव्या हिंदुत्व संकल्पनेत येतील असे वाटते का? खलिस्तान, दलितस्तान अशा मागण्या पुढे आल्या होत्या हे त्यांना माहीत नाही काय? देशातील मुस्लिम पाकिस्तानात जाणार नाहीत, त्यांनाही वेगळे स्थान द्यावेच लागेल. भारतीय राज्यघटनेने वरील सर्व समुदायांना एकत्रित गुंफले आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. सर्वजण देशाप्रती एकनिष्ठ आहेत. एकटे हिंदुराष्ट्र ही संकल्पना वेडगळ आहे. हिंदू राष्ट्र संकल्पनेच्या विचाराचे सरकार काही राज्यांत अस्तित्वात आहे, तर तेथील अल्पसंख्य लोक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. झारखंडमध्ये एक खासदार आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतो आणि पाय धुतलेले ते पाणी तो कार्यकर्ता पितो. असले राष्ट्र आपल्याला आणायचे आहे का ?
स्वार्थापोटी हे लोक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात. हिंदू राष्ट्राची शिवशाही संपुष्टात का आली ? शिवशाही संपवून पेशवाईचे समर्थन करणारे दुष्ट विचारांचे लोक आजही अस्तित्वात आहेत याची प्रचीती येते. त्यांच्या विचारांच्या व्यक्तीने कितीही गंभीर गुन्हा केला तरी सरकार सहजतेने घेते असाही अनुभव येत आहे. देशात अनेक देशद्रोही घटना घडूनही त्यांना अभय मिळत आहे. सरकारविरोधात, न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लोक बिनधास्तपणे बोलत आहेत. कोणावर कार्यवाही करायची आणि कशी हे सरकार ठरवत अाहे. कडाडून विरोध होत आहे, तो दाबला जात आहे. एकूणच देशात अराजकतेची लक्षणे दिसत आहेत. आपापल्या लोकांना सांभाळत हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.