👑🌹 प्रेम की सूड 🔥👶🏻
संकलन: इंजी. सुरज तळवतकर.
सर्पामध्ये एक जात अशी आहे की, तिच्या वाटेस कोणी गेल्यास त्याबद्दल सूड उगविण्याचा ती जिवंत असेपर्यंत आपला हव्यास सोडीत नाही. त्याचप्रमाणे कोकणातील ब्राह्मण म्हणणारांची जात आहे. आणि अशा प्रकारची एक म्हणही आहे की ब्राह्मणांच्या वाटेस कोणी जाऊ नये. कारण ती जात सर्पासारखी दावा धरून केव्हा आपल्याला दंश करील याचा नेम नाही. याचे प्रत्यंतर म्हणजे पेशवाईपासून मराठे आणि त्यातल्या त्यात ज्यांनी मुसलमानांपासून त्यांची शेंडी राखली त्या छत्रपतींच्या घराण्यावर तर त्यांचा विशेष दंश असल्याचे इतिहासही सांगू शकेल. छत्रपतींवर ब्राह्मण ही जात कशी जळफळत होती याचे उदाहरण म्हणजे कोल्हापूरची गादी नामशेष करण्याच्या इराद्याने त्या संस्थानच्या सभोवार गराडा घालून बसलेली ब्राह्मणी संस्थाने याकडे पाहिल्यास तेव्हाच समजेल. पण पेशवाईचा काळ निघून गेला तरी ब्रिटिश अमदानीतही एकोणिसाव्या शतकाच्या शेवटास कोल्हापूरास उपस्थित केलेल्या वेदोक्त प्रकरणावरुन आणि त्यावर जवळजवळ चोवीस वर्षे चालविलेला वाद हीच साक्ष देत आहेत.
अज्ञजनात व इतर बहुजनसमाजातील लोकांत फूट कशी पाडावी व आपली तुंबडी कशी भरावी याचे ब्राह्मण या जातीस बाळकडूच मिळालेले असते. अगदी र फ ठ करणाऱ्या खेडेगावातील भटभिक्षुकांपासून तो अगदी कायदेपंडित अशा वकील बरिस्टरापर्यंत तीच स्थिती.
या विसाव्या शतकांतील स्वयंनिर्णयाच्या काळात राजर्षी श्रीमन्महाराज शाहू छत्रपती यांनी ब्राह्मण जातीकडून नाडलेल्या ब्राह्मणेत्तर व बहिष्कृत वर्गाच्या चळवळीचा पुरस्कार केल्यावर बहुजनसमाजाकडून त्यांस मिळत असलेला धन्यवाद ब्राह्मण या जातीस न खपून त्यांनी बहिष्कृत व ब्राह्मणेत्तर या वर्गात खुद्द मराठ्यांत फूट पाडण्याचा अत्यंत घातक असा उपक्रम चालविला. आणि त्यांचे कडू फळ पुण्यातील श्रीशिवाजी सोसायटीच्या वार्षिक साधारण सभेच्या वेळी झालेल्या अनिष्ट प्रकाराकडे पाहिल्यास छत्रपतीस अपयश देण्याच्या कामी ही जात किती अव्याहत प्रयत्न करीत असते, हे सहज दिसून येण्यासारखे आहे.
त्या सभेत रा.गोळे यांच्या भाषणास इतर मराठ्यांनी जरी बंदी करण्याची आगळीक केली असली तरी तो धडा कोणाचा? अर्थात् जहालांचाच! मराठे अगर छत्रपती आपापसांतील तंटा मिटविण्यास समर्थ असता, ब्राह्मण जातीने मोरे अगर गोळे यांना पाठीवर घेऊन ‘रुलिंग प्रिन्स’ वर फिर्याद घेण्याची हरकत दूर करण्याची खटाटोप का करावी? श्रीशिवाजी महाराजांविषयी पूज्य बुध्दी दाखवून फंड जमवून आपली पोटे भरून त्यांच्या गादीविषयी वरकरणी प्रेम(?) व पूज्यभाव दाखवून त्या महात्म्याच्याच वंशजावर उलटून पडावे? हा काय छत्रपती शिवाजींवरील पूज्यभाव अगर सूड? याला कोणीही समंजस माणूस सूडच म्हणणार! वेदोक्त प्रकरणापासून तो आजपर्यंत छत्रपती शाहू महाराज यांचा संपूर्ण भरतखंडावर होत असलेला जयजयकार या दिवाभितांस सहन न होऊन त्यांनी आता त्यांच्यावर भुंकण्यास सुरूवात केली आहे. पण त्यांनी हेही लक्षात ठेवले पाहिजे की, सूर्यावर थुंकण्याप्रमाणे हास्यास्पद प्रकार केल्यावर छत्रपती आणि त्यांचे खेळगडी जे अस्सल मराठे किंवा छत्रपतींस पूज्य मानणारा सबंध ब्राह्मणेत्तर आणि बहिष्कृत वर्गाकडून या जातीची संभावना कोणत्या प्रकारे केली जाईल?
आमची अशी खात्री आहे की, ज्या मराठ्यांच्या अंगी मराठ्यांचेच रक्त खेळत असेल, तो या ब्राह्मण-लीलांचा धिक्कार केल्याशिवाय केव्हाही राहणार नाही.
पत्रकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर 📰✒
मूकनायक
शनिवार ता.२३ आॅक्टोबर १९२०