🎓 बाबासाहेबांची तपश्चर्या 📚📖✒
बाबासाहेबांची व माझी पहिली दृष्टादृष्ट १९२४ साली झाली. मी नाशिकात प्रोबेशनर डेप्युटी कलेक्टर असताना त्यावेळचे कलेक्टर सी.ए.बेटस (आय.सी.एस.) हे व मी नाशिक स्टेशनवर सरकारी कामाकरिता गेलो होतो. नाशिक गावाकडे येताना नगरपालिकेच्या जकात नाक्याजवळ एक दांडगा, धडधाकट, सावळा, मध्यम उंचीचा, रूबाबदार व नखशिखांत इंग्रजी पोशाख केलेला अनोळखी तरणाबांड गृहस्थ एकाकी उभा असलेला मला दिसला. आमची मोटार त्या नाक्यावरून जाताना मला या इसमाचे दर्शन झाले. हा कोणीतरी मोठा गृहस्थ असावा व कोणाची तरी मार्गप्रतीक्षा करीत हा रस्त्याचे कडेला उभा राहिला असावा असा मी तर्क केला. सदर इसम हे दुसरे तिसरे कुणी नसून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर होत. त्यांचेशी माझी ओळख नसल्याने व त्यांना यापूर्वी कधीही पाहिलेले नसल्याने मी त्यांना ओळखले नाही. पण त्यांची कीर्ती व लौकिक माझ्या कानी ह्यापूर्वीच आला होता. बाबासाहेब हे समाजसेवक व राजकीय पुढारी झाल्यावर समाजातील हजारो स्त्रिया, पुरूष व मुले १०-१२ मैलांची मजल मारून व दोन तीन दिवसांची शिदोरी पाठीला अडकवून डाॅ.बाबासाहेबांच्या दर्शनाचा नुसता दुरूनही लाभ व्हावा म्हणून त्यांच्याभोवती गराडा पडे. हे स्थित्यंतर होण्यास डाॅ.बाबासाहेबांना महान तपश्चर्या करावी लागली. लोखंडाचे चणे खावे लागले. टाकीचे घाव सोसावे लागले. त्यांनी अस्पृश्य समाजाचे पांग फेडले, त्यांना माणसाच्या कोटीत आणले. बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे आज हा समाज जिवंत झाला असून त्याला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
शं.बा.चव्हाण, प्रबुध्द भारत