🎓 अर्थतज्ज्ञ डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार 💸💰
संपत्ती ही राष्ट्राच्या भरभराटीस कारणीभूत ठरणारी वस्तू आहे. त्यामुळे अर्थसंग्रह ही राष्ट्रजीवनात मूल्यात्मक ठरते. प्रश्न असा आहे की, काय या संपत्तीचा उपयोग देशातील साधनवंचितांच्यासाठी उपकारक असा होतो ? आणि तो जर होत नसेल तर संपत्तीच्या समान मूल्यांचे अधिष्ठान काय? डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, राष्ट्रातील संपत्तीचा उपयोग दरिद्री आणि गरीब जनतेस जखडून ठेवण्यासाठी होता कामा नये. ती देशावरील आपत्ती ठरेल. दुसरीही बाब महत्वाची आहे, ती अशी की, दरिद्री व गरीब जनतेचे शोषण करून संपत्ती वाढविण्याचा प्रयत्न झालाच तर तो मार्ग ‘अासुरी’ ठरेल. अशा मार्गांनी संपत्ती वाढल्यास प्रौढी व वर्चस्व मिरविण्याची वृत्ती बळावते. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात की, सर्वांना समानरीतीने आर्थिक स्वातंत्र्य उपभोगता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. याला राष्ट्रीय अर्थशास्त्राचा मूलस्त्रोत म्हणता येईल.
भारतात संपत्तीची वाटणी विषम प्रमाणात आहे आणि मूठभर लोकांच्या हाती कोट्यावधी लोकांचे जीव अडकलेले आहेत. ही विषमता निपटून टाकल्याशिवाय देशात आर्थिक संतुलन केवळ अशक्य आहे. संपत्तीची समान वाटणी आणि जनकल्याण हे अभिन्न असे समीकरण आहे. डाॅ.बाबासाहेबांचा त्यावर प्रगाढ असा विश्वास आहे.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थकारण हे केवळ माणसांच्या आर्थिक परिस्थितीचे किंवा उन्नतीचे सर्वसामान्य विवेचन नाही तर ते माणसांच्या माणुसकीच्या आणि माणूस जिथे जगतो, जे जगतो, जसे जगतो त्या सर्वांशी निगडीत अशा वास्तवतेच्या उत्थानाचे कारण आहे.
sir, thanks for your reply… will do it soon…
-Site Admin