💥 लोकशाहीतील विरोधी पक्ष 💥
राजकीय लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी बाबासाहेबांना ‘विरोधी पक्षा’चे अस्तित्व महत्त्वाचे वाटते. सत्तेवर नियंत्रण ठेवावयाचे असेल तर कायदेमंडळात विरोधी पक्षाची नितांत गरज आहे. कायद्यातील समता (Equality before Law) ही तर लोकशाहीची कसोटीच होय. तत्वतः कायदा सर्वांनाच सारखा आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी कायद्याची हेळसांड स्वार्थासाठी केली तर कायद्यातील समतेचा जो प्राण आहे तोच गुदमरून जाईल. डाॅ.बाबासाहेबांनी या संदर्भात अमेरिकेतील ‘स्पाॅईल सिस्टीम’ चा निर्देश केला आहे. ही अमेरिकेतील राज्यकारभाराची एक विचित्र पध्दती होती. निवडून आलेला पक्ष पूर्वीच्या शिपायासह सर्व कारकूनांना कामावरून कमी करीत असे आणि आपल्या मर्जीतील तसेच निवडणुकीत मदत केलेल्यांना वेगवेगळ्या पदांवर नेमत असे. आलटून पालटून निवडून आलेला प्रत्येक पक्ष हीच पध्दती अवलंबित असल्यामुळे अमेरिकेला कित्येक वर्ष लोकशाहीचा पोषक असा कारभार करताच आला नाही, हीच ती ‘स्पाॅईल सिस्टीम’ होय. म्हणून विरोधी पक्ष आणि कायद्यातील समता ही दोन्ही अंगे लोकशाहीच्या जीवनात महत्वपूर्ण अाहेत हे दुर्लक्षून चालणार नाही. बाबासाहेबांनी त्याकडे विशेषत्वाने लक्ष वेधले आहे.
कोणत्याही संसदीय राज्यपध्दतीत विरोधी पक्षाला अग्रिम स्थान असते. लोकशाहीच्या यशाचे ते गमक होय. एखाद्या प्रश्नावर कायदेमंडळाचा निर्णय हवा असेल तर त्या प्रश्नाची दोन्ही बाजूने चर्चा होणे व ती लोकांपुढे येणे आवश्यक असते. एकच पक्ष दोन्ही बाजू मांडू लागला तर ती हुकूमशाही ठरते. “हुकूमशाही टाळण्यासाठी दुसऱ्या पक्षाची जरूरी आहे.” असे बाबासाहेबांनी विशद केले ते याच अर्थाने. देशात उत्तम राज्यकारभार असावा अशी सर्वांचीच इच्छा असते. पण त्याचबरोबर आचारस्वातंत्र्य व भाषणस्वातंत्र्य निकडीची असतात. प्रबळ विरोधी पक्षाशिवाय त्याची फलनिष्पती होत नाही. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “विरोधी पक्ष नसल्यावर लोकांचे मूलभूत हक्क धोक्यात येतात. कारण मग या हक्कांची पायमल्ली करणाऱ्या सत्तारूढपक्षाला कोणीच जाब विचारू शकत नाही.” ज्या देशात संसदीय लोकशाही नांदते त्या देशात विरोधी पक्ष ही सरकारमान्य राजकीय संस्था (Recognised Political Institution) असते.
विरोधी पक्षासंबंधीचा अनेक बाजूनी विचार करुन संसदीय लोकशाहीतील त्याचे स्थान कसे आहे हे बाबासाहेबांनी वरील विवेचनात स्पष्ट केले आहे.