🎓 संविधानाचा अभ्यास 📚📖✒
विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एक श्रेष्ठ संविधानतज्ज्ञ होते. त्यांनी जगातील अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास केला होता. कायदा आणि संविधानाबाबत त्यांचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास होता. अप्रतिम आणि अद्वितीय असे भारतीय संविधान लिहिल्याबद्दल अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने मानद पदवी देऊन त्यांचा उचित गौरव केला.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा अभ्यास कशाप्रकारे केला? या संदर्भातील एक घटना अत्यंत महत्वाची आहे. विद्यार्थी आणि अभ्यासकांनी अभ्यास कसा करावा? या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करणारी ही घटना आहे.
भारताला अधिक राजकीय अधिकार देण्याच्या संदर्भात विचारविमर्श करण्यासाठी एक आयोग नियुक्त करण्याची घोषणा इंग्लडचे प्रधानमंत्री स्टेनले बाल्डविन यांनी केली. आणि २६ नोव्हेंबर १९२७ ला भारतीय संविधानिक आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे अध्यक्ष सर जाॅन सायमन होते. म्हणून त्या आयोगाला ‘सायमन कमिशन’ असे संबोधले जाते. सायमन आयोगाशी विचारविमर्श करण्यासाठी राज्यस्तरावर विधिमंडळ सदस्यांच्या एका समितीची निवड करण्यात आली. या सात सदस्यांच्या समितीवर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची सदस्य म्हणून ५ आॅगस्ट १९२८ ला मुंबई विधिमंडळातून निवड झाली. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांचा सखोल व सूक्ष्म अभ्यास होता. त्यांनी राजकारणावरील काही पुस्तके वाचली होती. डाॅ.बाबासाहेबांना जाणीव झाली की, आता भारतीय राजकारणात संविधानाचा विषय फार मोठ्या प्रमाणात चर्चेत येईल. अशा वेळी मौन राहणे, अत्यंत धोक्याचे आहे. ते विचार करु लागले की, सायमन आयोगाशी विचारविमर्श करण्याची संधी मला मिळाली आहे. म्हणून अस्पृश्यांच्या राजकीय हितांची सुरक्षा करण्यासाठी आणि देशाच्या राजकीय अधिकारांकरिता आपण काही भरिव कार्य केलेच पाहिजे.
प्रदेश समितीवर निवडून आल्याचे जाहीर झाल्याबरोबरच बाबासाहेबांनी ६ आणि ७ आॅगस्टला आपल्या काही मित्रांकडून ४०० रुपये उधार घेतले. ८ आॅगस्टला तारापूरवाला बुकसेलर्सच्या दुकानातून ८५० रूपयांची संविधानाशी संबंधित पुस्तके विकत घेतली. ९ आॅगस्टपासून सकाळी आपल्या कार्यालयाच्या खिडक्या आणि दरवाजे बंद करुन विकत घेतलेल्या १५-२० ग्रंथांच्या अभ्यासाला ते बसले.
काही लोक यायचे आणि दरवाजा ठोठावत. डाॅ.बाबासाहेब आपल्या त्रासिक मुद्रेने त्यांना परत जायला सांगत. काही वेळानंतर आणखी दुसरे लोक यायचे. ते देखील दरवाजा ठोठावत. त्यांना देखील ते परत जायला सांगत. त्यामुळे संविधानाशी संबंधित ग्रंथाचा अभ्यास करण्यामध्ये अडथळा व्हायचा. आपल्या अभ्यासात लोकांचा त्रास होतो, ही बाब लक्षात घेऊन त्यांनी त्यांचे कार्यकर्ते मडकेबुवा यांना सांगितले की, ‘मडकेबुवा, दरवाजाला बाहेरून कुलूप लावा. सकाळी, दुपारी आणि सायंकाळी इराण्याकडून मला खिडकीतूनच चहा देण्याची व्यवस्था करा आणि दुपारचे व संध्याकाळचे जेवणदेखील खिडकीतूनच द्या.’
डाॅ.बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मडकेबुवांनी व्यवस्था केली. तसेच त्यांनी डाॅ.बाबासाहेबांना सांगितले की, ‘जर तुम्हांला काही कामासाठी माझी आवश्यकता वाटली तर मला बोलावून घ्या. मी कार्यालयाच्या बाहेरच्या बाकावर झोपून राहीन.’ अशाप्रकारे कार्यालयाच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावून डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी सतत दोन आठवडे अभ्यास केला. संविधानाच्या अभ्यासाची सुरुवात त्यांनी अशाप्रकारे केली. तारापूरवाला बुकसेलर्सकडून नंतरदेखील नवीन पुस्तके खरेदी केली. पुढे या दुकानाची पुस्तके खरेदीची इतकी उधारी झाली की, त्यांना उधारीचे पैसे परत करण्यासाठी १९३६ मध्ये ‘चारमिनार’ ही इमारत विकावी लागली.