भारताचा अंधकारमय भविष्यकाळ कोठपर्यंत ?
बाबासाहेब लंडनहून भारतात आल्यावर त्यांनी ‘ग्लोब’ ला दिलेल्या मुलाखतीत (नोव्हेंबर १९४६) सुरूवातीस सांगितले की, त्यांनी लंडनमध्ये भारतीय राजकीय स्थितीबद्दल जे निवेदन केले होते, त्यामध्ये बदल करण्यासारखे काही कारण त्यांना दिसत नाही. मात्र, त्यांनी या आपल्या विधानास अत्यंत महत्वाची अशी एक पुस्ती जोडली होती. ती पुस्ती अशी होती की, भारताच्या जीवनातील जे जे महत्वाचे राष्ट्रीय घटक आहेत, त्या घटकांच्या प्रतिनिधींचे खरेखुरे मिश्र सरकार जोपर्यंत केंद्रस्थानी येणार नाही, तोपर्यंत भारताचा भविष्यकाळ अंधकारमय राहणार आहे. बाबासाहेबांनी ‘पाकिस्तान’ वरील एक विस्तृत व सुप्रसिध्द ग्रंथ प्रसिध्द केल्यानंतर एक वर्षभरानंतरची ही मुलाखात होती हे येथे लक्षात ठेवले पाहिजे.
💥 राजकीयदृष्ट्या आजारलेल्या भारतावरचा उपाय
बाबासाहेबांनी हे विधान ४२ वर्षापूर्वी केले होते. त्या विधानातील सामर्थ्य कोणालाही आजमवता येणार नाही इतके ते अफाट आहे. त्यातील प्रत्येक शब्द राजकीय व सामाजिकदृष्टया अर्थाने ओतप्रोत भरलेला आहे. आणि या एक वाक्यी विधानात भारताच्या सततच्या राजकीय आजारावरील प्रभावी असा उपाय आहे. काँग्रेसचे त्यावेळचे गांधी, नेहरू, पटेल पुढारी काय अगर सध्याचे राजीव गांधी काय, अगर त्यावेळचे जीना, लियाकत अली पुढारी काय, अगर सध्याचे बेनझीर भुत्तो इत्यादी काय; त्यांना बाबासाहेबांचे ४२ वर्षापूर्वीचे विधान मान्य कसे होणार? काँग्रेसला अखंड भारताची एकमेव सत्ता हवी आहे. त्याशिवाय इतर कोणाची सत्ता अगर त्यातील हिस्सा सहनसुध्दा होत नव्हता. भारताची फाळणी टाळण्याचा हा एक मार्ग होता खरा; परंतु असल्या प्रकारचे शहाणपण भारताच्या अखंडतेसाठी काँग्रेस पुढारी तेव्हा दाखवत नव्हते; आज दाखवीत नाहीत; की पुढेही कधी दाखवणार नाहीत. तीच गोष्ट मुसलमान पुढाऱ्यांची आहे.
बाबासाहेबांचे ४२ वर्षापूर्वीचे सामर्थ्यशाली शब्द जाहीर करतात की, जोपर्यंत भारताच्या राष्ट्रीय घटकांचे खरेखुरे मिश्र सरकार केंद्रात येणार नाही तोपर्यंत भारताचा भविष्यकाळ अंधकारमय राहील. गेली अखंड ४२ वर्षे तो अंधकारमय भविष्यकाळ आता भूतकाळाच्या रुपाने जगास दिसत आहे.
– अॅड.बी.सी.कांबळे