‘हिंदुत्ववाद’ या शब्दाचा प्रयोग करणारे लोक हिंदू धर्माचे नाहीत, ते ब्राह्मणी धर्माचे लोक आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली या देशातील ८०% जनतेला आपल्या सत्तेखाली ठेवण्याचे त्यांचे एक षडयंत्र आहे. आता तर ते उघडपणे पुढे आलेले आहेत. या देशाचा प्रधानमंत्री ‘ब्राह्मण’ असावा, ही उघडपणे भाषा बोलू लागले आहेत. हाच का त्यांचा हिंदुत्ववाद? ब्राह्मण सोडून इतर हिंदू त्यांना दिसत नाहीत का? या देशातील मुस्लिम, ख्रिश्चन, कम्युनिस्ट व बौध्द यांना राष्ट्रद्रोही ठरवून ८०% हिंदू जनतेला संघटित करुन आपले नेतृत्व त्यांच्यावर लादणे, हा ब्राह्मणी धर्मीयांचा डाव आहे. या ब्राह्मणी धर्माचे लोक ‘सनातन’ सारखे नाव धारण करून समतेच्या विचाराचा पुरस्कार करणाराचे शिरकाण करीत आहेत. देशामध्ये एवढी प्रबळ संरक्षणात्मक व्यवस्था असूनही मारेकऱ्यांचा पत्ता का लागत नाही? यामागे ब्राह्मण धर्मीयांचे निश्चितपणे षडयंत्र आहे. या त्यांच्या कटकारस्थानात त्यांनी ब्राह्मण धर्माच्या विरूध्द असलेल्या आणि समतेचा पुरस्कार करणाऱ्यांनाही सोडले नाही. एवढा त्यांचा ‘परशुराम’ जागा झाला आहे.
या ब्राह्मणधर्मीय लोकांना खरोखरच या देशातील हिंदू जनतेचे कल्याण करावयाचे असेल तर हिंदू जाती-जमातीच्या सर्व वर्गांना शासनसंस्थेत जनसंख्येच्या प्रमाणात स्थान दिले पाहिजे. नाव घ्यायचे हिंदूंचे आणि स्थान द्यायचे ब्राह्मणांना, अशी एकूण स्थिती आहे. आरक्षणाच्या बाबतीत तेच झाले आहे. ते आरक्षण ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती इ. साठी खऱ्या अर्थाने नाही. ते आरक्षण ५% ब्राह्मणांच्या कल्याणासाठी आहे. ८०% हिंदू जनतेला जवळपास ५० टक्क्यांपर्यत आरक्षण देऊन या देशातील ब्राह्मणांनी ५०% आरक्षण स्वतःसाठी कुरण म्हणून ठेवलेले आहे. यासंबंधीचे प्रावधान संविधानात कुठेही नाही. ब्राह्मणी धर्माच्या पोशिंद्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. आरक्षणप्राप्त वर्गांना परस्परात लढविण्याचे आणि त्यांच्यात कलह निर्माण करण्याचे षडयंत्र हे ब्राह्मणी धर्माचे लोक करतात. आरक्षणप्राप्त वर्गातील परस्परात लढणाऱ्यांना आपण का लढत आहोत, हेही कळत नाही.
या देशातील ब्राह्मणवादी जनता सोडून कोणीही भारतीय संविधानाचा विरोध केलेला नाही. ब्राह्मणवादाच्या प्रभावात असलेले आणि ज्यांना संविधान काय चीज आहे याचे अजिबात ज्ञान नाही अशांचा विरोध भारतीय संविधानाला होता. भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य जातीचे होते आणि त्यांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या अंतर्गत आम्ही जगायचे काय, ही क्षुद्र भावना त्यांना संविधानाचा विरोध करण्यास प्रवृत्त करीत होती. परंतु ज्यांना संविधानाचे ज्ञान आहे, जो माणूस प्रबुद्ध आहे, मग तो कोणत्याही जाती-जमातीचा असो, अल्पसंख्यांक समाजाचा असला तरी त्यांनी भारतीय संविधानाचा सन्मानच केला आहे. कोणीही संविधानाचा विरोध केलेला नाही. विरोध करणारे फक्त ब्राह्मणवादीच. का ?