🎓 साऊथबरो कमिटीपुढील कार्य 📋✒
👨👩👧👦 समाज एक होण्यासाठी दळणवळण हवे. 👨👩👧👦
प्रत्यक्षातील समाजस्थिती कशी आहे हे अचूकपणे समजावून घेण्यावर ‘लोकप्रिय सरकारचे’ भवितव्य अवलंबून आहे, असे सूत्र आपल्या निवेदनात भीमरावांनी नमूद केले आहे. भारतातील भिन्न भिन्न राष्ट्रीय गट; त्या प्रत्येक राष्ट्रीय गटातील पोट-गट; भिन्न धर्म; भिन्न भाषा; भिन्न रिवाज; त्यांच्यामधील भयंकर पक्षपात! त्यामुळे भिन्न असलेले राष्ट्रीय गट-पोटगट, परस्पर-विरोधी बनलेले. हिंदूंमध्ये शेकडो जाती-पोटजाती. शीख, रोहिले, पठाण, असामी, बलुची, डोंगर पर्वतावर राहणाऱ्या वन्य जमाती, ब्रह्मदेशीय, मोगलवंशीय लोक, बुध्दधर्मीय लोक, गोंड, महीर, भिल्ल, मध्य व दक्षिण भारतातील अनार्य, औद्योगिक व व्यापार क्षेत्रात पुढे सरकणारे पार्शी, त्याचप्रमाणे ज्यांना अजून संस्कृतीचा स्पर्श झालेला नाही अशा अवस्थेपासून अल्प संस्कृतीचे; नंतर मध्यम संस्कृतीचे, अशा अनेक सांस्कृतिक पातळ्यांवर असलेले मानव-समूह इत्यादींचे वर्णन भीमरावांनी आपल्या निवेदनात एक उतारा उद्धृत करून दिले आहे.
विषमतेने पोखरलेला भारत देश प्रातिनिधीक सरकारला म्हणजे लोकप्रिय सरकारला पात्र ठरू शकत नाही असे म्हणणाऱ्या ब्रिटिशांना भीमरावांनी सदर निवेदनात एक आव्हान दिले आहे. नानाविध राष्ट्रगटांनी व पोटराष्ट्रगटांनी बुजबुजलेली अमेरिका व असेच दुसरे इतर देश लोकप्रिय सरकारसाठी पात्र ठरू शकतात, तर भारत का पात्र ठरू शकत नाही? असा आव्हानात्मक प्रश्न त्यांनी निवेदनात विचारला आहे. भीमराव साऊथबरो कमिटीस आपल्या निवेदनात जणू असे बजावतात की, एक तर वरील प्रश्नाचे उत्तर द्या अगर भारतातील समाजरचनेतील विषमता ही इतर देशांतील सामाजिक विषमतेपेक्षा निराळ्या स्वरूपाची आहे हे तरी मान्य करा. कमिटीला ते सांगतात, तुमच्यापुढे पर्याय फक्त हे दोनच. तिसरा पर्याय नाही.
भारतातील सामाजिक विषमता एवढी भयंकर आहे की त्यामुळे तिचा राजकारणावरही जबरदस्त परिणाम झालेला आहे, असे भीमराव म्हणतात. सामाजिक विषमतेचा परिणाम राजकारणावर कसा होतो असे विचारणाऱ्याला भीमराव असा उलट प्रश्न करतात की, सामाजिक विषमतेचा कोणता परिणाम होत नाही हे सांगा. समान उद्दिष्टे, समान श्रध्दा, समान आकलन असणाऱ्या समाजातील अंतर्गत भेदाचा राजकारणावर परिणाम होऊ शकत नाही? थोडक्यात, समाजमन एक असावे लागते; मग भेद होत नाही. समाजमन एक कसे होते? तर एकमेकांत दळणवळण ठेवल्याने व एकमेकांच्या कार्यात समानतेने भाग घेतल्याने समान समाज मनाची प्रवृत्ती तयार होऊ शकते. केवळ शेजारी राहिल्यामुळे हे घडू शकत नाही. परंतु भिन्न समाज-मनाचे गट राजकारणात एकत्र आणले गेले म्हणजे त्यातून संघर्ष निर्माण होतो. आपल्या गटामध्येच लग्न करण्याची प्रथा ज्या समाज-घटकात असते, त्यांना राजकारणात एकत्र आणले तर त्यातून बखेडा उत्पन्न होत असतो. या कसोट्या भारताच्या समाजरचनेस लावल्या तर भारताच्या राजकीय उद्दिष्टांतील ते अडथळे ठरल्याशिवाय राहणार नाहीत, असे भविष्य भीमरावांनी १९१९ मध्येच केले होते.