🌺स्वातंत्र्य, माणुसकी, समान हक्क मिळतील तेच स्वराज्य 🌺
संकलन: इंजी. सुरज तळवटकर.
ता.६ जानेवारी १९३९ रोजी महाड येथे सात हजार शेतकऱ्यांच्या पुढे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्भीड आणि मननीय भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले,
प्रिय भगिनींनो व बंधुनों,
मी नगर, खानदेश, निजामाचे राज्य या बाजूला दौऱ्यावर गेलो होतो, नुकताच परत आलो. त्रास झाल्यामुळे चार दिवस विश्रांती घेण्याचा विचार केला होता. तरीसुद्धा माझ्यावर या सभेत बोलण्याची पाळी आलीच. मी काही फार वेळ बोलणार नाही. दहा बारा मिनिटे बोलेन. आज मी फक्त तीन मुद्द्यांवर बोलणार आहे. सात प्रांतात काँग्रेसचे राज्य आहे. बंगाल, पंजाब या प्रांतात इतर पक्षाला नेस्तनाबूत करुन काँग्रेसचे राज्य स्थापण्याचा प्रयत्न चालू आहे. तीन-चतुर्थांश भागावर काँग्रेसचे राज्य आहे.
माझे एक मित्र थट्टेने म्हणाले, “काँग्रेसने अधिकारसूत्रे घेऊन आज १८ महिने झाले. एखादी बाई १८ महिन्यात दोन वेळा बाळंत झाली असती. पण ही बाई अजून गरोदरही राहिली नाही.” हे अगदी बरोबर आहे. या काळातील जनतेच्या सुखासमाधानाच्या गोष्टींची कल्पना देणे गैर होणार नाही.
पहिला महत्त्वाचा प्रश्न हिंदू-मुसलमानांच्या ऐक्याचा प्रश्न आहे. स्वतंत्र मजूर पक्षाच्या सभेत हा प्रश्न निघत नाही. आपण फक्त पोटाचा प्रश्न विचारात घेतो. आधी पोटोबा मग विठोबा असे आपण वागतो. परंतु इतर प्रश्नांचा उद्भव झाला की पोटाचा प्रश्नही बाजूला पडतो.
या देशात ८-९ कोटी मुसलमान आहेत. हे लोक मजुरी करणारे किंवा गुलाम नव्हेत. राजसत्ता ज्या काँग्रेसच्या हातात आहे तिच्यावर ही सारी जबाबदारी आहे. आमच्यावर नाही! हिंदू मुसलमान लढ्याबद्दल काँग्रेसने काय केले? जाणूनबुजून काहीही केले नाही.
दुसरा प्रश्न साम्राज्यशाहीस हाकून लावणे हा आहे. इंग्रजांचे साम्राज्य गेले तरी येथील गुजर, सावकार, खोत, गिरणीमालक जाणार नाहीत. ते तुमच्या रक्ताचे शोषण करणारच! साम्राज्यशाही जावी अशी माझीही इच्छा आहे. पण काँग्रेस काय करते? मध्यवर्ती सरकार (फेडरेशन) अत्यंत किळसवाणे आहे. म.गांधींच्या या मुग्धतेत काहीतरी पाणी मुरत आहे. गांधी हिंदुस्थानला (आजचा इंडिया अर्थात् भारत) साम्राज्यशाहीचे गुलाम बनविणार आहे.
तिसरा प्रश्न आम्हाला स्वराज्य पाहिजे ते आमच्या स्वातंत्र्यासाठी पाहिजे! सुखासाठी पाहिजे! आम्हाला देशात पोटभर अन्न मिळत नाही, घर नाही, सुखसंपत्ती नाही. ज्या राज्यात स्वातंत्र्य, माणुसकी वगैरे समान हक्क आम्हास मिळतील तेच स्वराज्य!
आमच्याकरिता काँग्रेसने काय केले? निवडणुकीपूर्वी शिक्षण देऊ, शेतसारा कमी करु, वगैरे आश्वासने दिली होती. पण त्याचे आता काय? काँग्रेसला तुमच्याकरिता काहीच करावयाचे नाही. …. सध्या आपल्यावर गुजरात राज्य करीत आहे. तीन गुजराथी दिवाण दळतात आणि बाकीचे पीठ भरून भाकऱ्या भाजून गुजरातेत पाठवितात. हे सारे दिवाण वल्लभभाईंच्या दारची कुत्रे आहेत.
ना.खेरांना गुजरातेत एका समारंभाला बोलावून त्यांचा वल्लभभाईंनी भयंकर अपमान केला. “मुख्यप्रधान म्हणून आम्ही तुम्हांला बोलविले नाही तर तुम्ही गांधीचे भक्त आहात म्हणून बोलविले. नाहीतर हाकलून लावले असते.” असे बोलून वल्लभभाईंनी एका महाराष्ट्रीयाचा भयंकर अपमान केला आहे. आमच्या या ना.खेरांच्या अपमानाचा सूड कोण घेणार? त्याचा सूड मी घेईन. माझ्याविषयी असे उद्गार काढू दे की, त्या वल्लभभाईला मी जोड्यांनी मारीन. त्यांच्या सभेत मी जातो. ताकत असेल तर त्यांनी माझ्या सभेत यावे.
एक दोन महिन्यात खोती बील चर्चेला निघेल, पण ते बील पास होणार नाही. काँग्रेसचे राज्य उलथून पाडल्याशिवाय हे होणार नाही. स्वतंत्र मजूर पक्षाचे, शेतकरी कामकरी पक्षाचे राज्य झाल्याशिवाय हे होणार नाही. खोत बेकायदेशीरपणे कुळांना लुटतात, त्यांचा तुम्ही प्रतिकार केला पाहिजे. अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे. सर्व अधिकारवर्ग खोतांच्या जातीचा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पक्षपात होत असता तुम्ही तुरुंगाची भीती बाळगू नका. तेथे घरच्यापेक्षा वाईट काहीच नाही. आम्ही तुमच्याबरोबर तुरुंगात येऊ पण तुमचा तुरुंगवास म्हणजे गांधीचा तुरूंगवास नव्हे. तो तुरूंगवास कसला? तुरूंगात रोज त्यांना अत्यंत प्रिय असे शेळीचे दूध, फळे, अंजीर, मोसंबी वगैरेच्या करंड्याच्या करंड्या त्यांच्याकरिता तयार असत. तुमचा तुरूंगवास यापेक्षा निराळा आहे.
डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड निवडणुका लढवा व आपली माणसे निवडून आणा. सत्तेच्या सर्व जागा काबीज करा.
शेतकऱ्यांचे कैवारी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
दि.६ जानेवारी १९३९, महाड
#टीप:- हे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग २ पा.नं. २३८-४१ पहा.